‘स्वाभिमानी शेतकरी’तर्फे सातबार्‍याची होळी

0

नाशिक | दि. १२ प्रतिनिधी
राज्यात महायुती सत्तेत येऊन अनेक महिने उलटूनही त्यांनी कर्जमाफीचे दिलेले आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. अनेक वेळा आंदोलने करूनही कर्जमाफी नाही. परिणामी शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर सातबारा उतारे कोरे करावेत याकडे लक्ष वेधण्यासाठी आज होळीच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ सातबारा उतार्‍यांची होळी करण्यात आली.

राज्यात विविध भागात गेल्या तीन वर्षांपासून कधी दुष्काळ, कधी गारपीट तर कधी अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी बेजार झाला आहे. त्यातच यावर्षी शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

राज्य शासनाने सत्तेत येण्यापूर्वी शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊ, असे आश्‍वासन दिले होते. मात्र आश्‍वासनाची पूर्तता अद्यापही झालेली नाही. शेतकर्‍यांचे सातबारा कोरे होत नाहीत. कर्जमाफी करावी याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सातबार्‍याची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.

यावेळी शासनाविरोधात शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, स्वामिनाथन आयोग लागू झालाच पाहिजे, कर्जमाफी करा नाही तर खुर्च्या खाली करा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात महानगरप्रमुख नितीन रोठे पाटील, कार्याध्यक्ष शरद लभडे,

हॉकर्स युनियनप्रमुख नीलेश कुसमोडे, मनोज भारती, योगेश कापसे, पुंडलिक चव्हाण, दीपक दहिकर, सचिन पवार, सचिन चौघुले, बाळासाहेब सोनवणे, दीपक मोरे, राजेश ढाकणे, शुभम सोनवणे,कैलास घन, धोंडीराम कोंबडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी होळीत सातबारे टाकून शेतकर्‍यांनी राज्य शासनाचा निषेध केला.

LEAVE A REPLY

*