Type to search

आवर्जून वाचाच जळगाव विशेष लेख

स्वानुभवांचा उत्स्फूर्त अविष्कार : बाप माझा सांगून गेला. जग’

Share

कविता अनुभवांचं सारामृत असतं असं म्हणतात. ती स्वानुभवांनी अधिक उजळून निघते. आपण आपल्या अनुभवांशी प्रामाणिक असलो तर कविता प्रभावी होते आणि ती इतरांना आपलीच वाटायला लागते. कवितेचं असं सार्वत्रिक होणं हे कवी आणि कवितेचं यश असतं. कविता हा अंतर्मनाचा उत्स्फूर्त भावाविष्कार असतो. अशीच कविता उल्हासनगरचे दिलिप रविंद्रनाथ मालवणकर गेली 35 वर्ष लिहित आहेत. शब्दांशी आणि अनुभवांशी प्रतारणा न करता कवितेवर मनस्वी प्रेम करणारा आणि तिला संयमाने समाजासमोर आणणारा हा जेष्ठ कवी युवा लेखक, कवींसमोर एक आदर्श आहे. तो सद्य परिस्थितीवर शब्दांनी कोरडे ओढतो तर ममत्वाने जगण्याचा मार्गही उलगडून दाखवतो.

दिलिप मालवणकर यांची आतापर्यंत कवडसे, प्रभंजन हे काव्यसंग्रह तर मालवणी मसाला, आपले उल्हासनगर, हार प्रहार लेखसंग्रहासह दहा पुस्तकं प्रकाशीत झाली आहेत. ते गेल्या 35 वर्षांपासून लेखन करीत असले तरी त्यांच्या लेखनात बहुप्रसवता, उताविळपणा आणि अतीउत्साहीपणा दिसून येत नाही. लेखनाला वैचारीक बैठक असावी आणि त्यातून समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडायला हवी हा त्यांचा ध्यास असून त्यासाठी ते सतत अग्रही आणि प्रयत्नशील असतात. त्यांच्यातील ही जिद्द आणि कार्यप्रवणता युवकांना लाजवेल अशी आणि दिशा दाखवेल अशी आहे असे मला वाटते. ते संकटाला थेट भिडतात. त्याच्याशी संघर्ष करतात. तो जगजाहीर करण्यासाठी लेखणीचा, कवितेचा वापर करतात. लेखक, कवीची खरी ओळख त्याच्या कृतीतून होते. त्याचं लिहिणं आणि प्रत्यक्ष जगणं एकरुप झालं असेल तर तो खरा साहित्यिक. मालवणकर या कसोटीवर शब्दशः खरे उतरतात.

संतांनी सांगितलेला उतू नको मातू नकोसा संदेश जेव्हा बापाच्या मुखातून येतो तेव्हा बापच कवीला कवितेत मांडावासा वाटतो. आपल्या जीवनावर बापाच्या विचारांचा किती खोलवर परीणाम आहे हे सांगतांना कवी म्हणतो…
बाप माझा सांगून गेला
उतू नको मातू नको
अहंकार तू करु नको
जमिनीशी नातं तोडू नको
अहंकार माणसाला नष्ट करतो. तर जमिनीशी जुळलेल्या ती मायेने आंजारते गोंजारते. मायबापाचं ऋण कुणालाच फेडता येत नाही. जो त्यांना अंतर देतो तो दरिद्री समजावा असं कवी म्हणतो.
माता पित्याला अंतर
जो जो देईल तयाले
दारिद्र्याहून दरीद्री
त्याला खुशाल म्हणावे
दानधर्म करुन खोटी प्रतिष्ठा मिळवण्यापेक्षा मायबापाची सेवा करा. कारण त्यातच सर्वार्थ आहे ही कवीची शिकवण युवकांना दिशादर्शक आहे.
माता असे तिर्थ
माताच सर्वार्थ
दानधर्म व्यर्थ
तिच्याविना
कवीला सामाजिक भान देखील आहे. शहरंची शहरं विकणार्‍या राजकारण्यांना ते श्वास कसा घेणार असा प्रश्न विचारायला मागेपुढे पहात नाहीत.
मोकळा श्वास घेता येईल
अशी उद्यानं मैदानं हवीत
कोणी घेता कां ठेका
या शहराचं….
टेंडर काढायचं आहे !
निवडणुका देशाचं भलं करतील यावर कवीचा विश्वास नाही. त्यांना तो काळच वाटतो. तो सोकावतोय आणि देशात झुंडशाही येतेय असं ते परखडपणे मांडतात.
निवडणूक हा काळ आहे
तो असाच सोकावणार
लोकशाहीच्या नावाने
झुंडशाही येणार आहे
सत्ताधारी मुजोर आणि विरोधक मौन झाले तर सामान्य माणसालाच बोलावे लागते. तरी आम्ही बोलू नये ? हा प्रश्न सार्‍यांचेच मत मांडतो.
रक्षक झाले भक्षक
विरोधी पक्ष मौन झाला
तरी आम्ही बोलू नये !
यशाने बेभान झालेल्यांना अजिक्य कोणीच नाही असे सूचक विधान करुन सत्ताधर्‍यांविरोधात जिंकण्याचा मंत्रही ते सांगून जातात.
अजिक्य कोणीही
येथे नाही झाला
त्वेषाने लढला
तो जिंकला.
आपलं वागणं बोलणं सरळ आणि सत्याची कास धरणारे आहे. आणि हाच आपला गुन्हा आहे कां असं कवीला वाटतं.
चालतो सरळ
बोलतो सच्चाई
हीच का बुराई
माझ्यासाठी ?
माणुस हा स्वार्थी, लोभी, लोचट झालेला आहे. त्याला माणूस होण्याचा सल्ला कवी देता. पावसासारंखं निस्वार्थपणे रीतं होता आलं पाहिजे ही माणूस होण्याची सुरवात आहे असं कवीला वाटतं.
तू आधी…..
माणूस होवून तर बघ.
पावसासारखा….
निस्वार्थ होवून तर बघ.
कविता म्हणजे काय हे सांगतांना कवी जगण्याला कागद व बोच, वेदनेला शब्दांची मुक्त लाट मानतो. तेव्हाच कविता जन्माला येते ही कवितेची व्याख्या अभिनव आहे.
कवितेची ही पहाट,
मुक्त अक्षरांच्या लाटा.
जगण्याच्या कागदाला,
बोचे वेदनेचा काटा.
निशस्त्र, निराधारांनाही शब्दांचा आसरा, आधार असतो. तेच त्यांचे बाण, अस्त्र असतात. मात्र त्यांना जपून वापरायला हवं असा सूज्ञ सल्ला द्यायला कवी विसरत नाही.
शब्द हेच बाण,
भात्यात ठेव मित्रा.
शब्द हेच शस्त्र,
जपून वापर मित्रा !
मालवणकर यांची कविता अशी जगण्याशी नातं सागते. जगण्याचं मर्म उलगडून दावते. जगणंच श्रीमंत करुन टाकते. त्यात प्रतिमा, प्रतिकांचा बडेजाव नाही. साधे, सोपे, सुलभ शब्द मात्र त्यांना अनुभवांचा लेप आहे. यामुळे ते हितोपदेश होतात. त्यांची कविता नेत्यांचे बेगडी चेहरे उघडते. लढण्याचे डावपेच शिकवते. आणि महत्वाचं म्हणजे सत्य, कष्ट आणि संस्कारांचं नातं दृढ करते. त्यांच्या कवितेत मुक्तछंद, गेय, अभंग, फटका आणि भीमगीतांचे वैविध्य दिसून येते.

अस्मिता प्रकाशनाने प्रकाशित केलेला बाप माझा सांगून गेला या काव्यसंग्रहात एकूण शंभर कविता, शंभर पानं असून त्याचे मुल्य शंभर रुपये आहे. संग्रहाचे मुखपृष्ठ नंदू गवादे यांनी समर्पक रेखाटले असून ते संग्रहाबद्दल बरंच काही सांगून जाते. आकर्षक बांधणी आणि सुबक टाईप सेटिंग संग्रहाच्या जमेच्या बाजू आहेत. दिलिप मालवणकर हे पत्रकार असून राजकारणीही आहेत. यामुळे राजकारणाचं अंतर्बाह्य स्वरुप ते जाणून अआहेत. त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या काव्यात दिसून येते. त्यांच्याशी (9822902470) संवाद साधला तर त्यांच्या मनातील स्पंदन आपण सहज जाणून घ्याल. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी आभाळभर शुभेच्छा व्यक्त करतो.
देवरुप, नेताजी रोड, धरणगांव जि.जळगांव. 425105.
प्रा.बी.एन.चौधरी, मो. 9423492593

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!