स्वाधार योजनेला 31 पर्यंत मुदतवाढ ; वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

0

नाशिक : शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार्‍या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त काशिनाथ गवळे यांनी दिली.

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्या नंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान या योजनेतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ही योजना सुरू झाल्यानंतर प्रारंभी 16 मार्चपर्यंत व नंतर 23 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु अनेक विद्यार्थी अद्याप या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याने तसेच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास वेळ लागत असल्याने आता पुन्हा या योजनेत अर्ज भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10वी, 12वी ,पदवी, पदविका परीक्षेमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.

या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के गुणांची असणार आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसणार्‍या व बाहेरगावी शिकण्यास असणार्‍या विद्याथ्यार्ंना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. जे विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता या योजनेचा लाभ घेत असतील त्यांना या योजनेतील निर्वाह भत्त्याचा लाभ मिळणार नाही.

या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधारकार्डशी लिंक करून घेणे बंधनकारक आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जांचा विहित नमुना व सविस्तर अटी, शर्तींचा तपशील समाज कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तो संकेतस्थळावरून डाऊनलोड करून अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह त्या त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे समक्ष अथवा टपालाद्वारे 31 मार्च 2017 पर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन गवळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*