Type to search

आरोग्यदूत

स्वाईन फ्लू कोणाला होतो?

Share

स्वाईन फ्लू समाजातील सर्व घटकांना आपल्या कवेत घेऊ शकतो. याची बाधा कोणालाही होऊ शकतो. स्त्री असो वा पुरुष असो, लहान असो वा वयस्कर, गरीब असो वा धनाढ्य, कुठल्याही धर्माचे असो वा जातीचे, देशी असो वा विदेशी – सर्व स्तरातील लोकांना हा आजार होऊ शकतो. पण स्वच्छतेचा अभाव, स्वच्छ व खेळत्या हवेचा अभाव, कोंदट व प्रदूषणयुक्त वातावरण असलेले राहणीमान, तसेच ‘विशेष काळजी गट’ म्हणजे – मधुमेह, कर्करोग, एड्स व क्षयग्रस्त रुग्ण, डायलिसीसवर असणारे रुग्ण, आत्यंतिक स्थूलता, व्यसनी (धूम्रपान, मद्यपान इत्यादी), अति लहान वा अति वयस्कर, अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण, पशुविकार तज्ज्ञ, आरोग्य  सेवक आणि डुकरांच्या मासाचे व्यावसायिक ह्या लोकांमध्ये स्वाईन फ्लू होण्याची व तो जीवघेणा होण्याची शक्यता अधिक असते.

स्वाईन फ्लू स्वत:च कसा ओळखावा : वर नमूद केलेले कुठलेही लक्षण दिसून आल्यास आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा त्वरित सल्ला घ्यावा. कुठलीही टाळाटाळ जीवघेणी ठरू शकते, हे कायम लक्षात ठेवावे. तसेच वर नमूद केलेल्या कुठल्याही आजार वा परिस्थितीत आपण मोडत असल्यास अधिक काळजी घेणे अनिवार्य आणि आवश्यक आहे. अन्यथा अनर्थ होऊ शकतो.

साधारणत: दिसून येणार्‍या लक्षणांवरून आणि शारीरिक व काही रक्ताच्या आणि घशातील व नाकातील स्त्रावांच्या तपासण्या करून डॉक्टर स्वाईन फ्लूचे निदान करतात. त्यावरून आजाराचे स्वरुप व गांभीर्य लक्षात येते. आणि त्यानुसारच औषधोपचार योजला जातो. काही वेळा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्लाही देण्यात येतो. रुग्णाच्या विषाणू तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉयरॉलॉजी- एन.आय्.ए.) पुणे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस- एन.आय.सी.डी.) दिल्ली येथील प्रयोगशाळेत तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे. इलेक्ट्रोन सूक्ष्म दर्शकाखाली हे विषाणू खाली दर्शविलेल्या चित्राप्रमाणे दिसतात.

स्वाईन फ्लू- उपचार

स्वाईन फ्लूवर सर्वोत्तम उपाय म्हणजे तो टाळण्याचा प्रयत्न करणे. ह्या करता आरोग्यवर्धक राहणीमानाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे व नियमित लसीकरण करणे गरजेचे आहे. खास स्वाईन फ्लूच्या लसीही उपलब्ध आहेत. ह्या लसीपण आजाराप्रमाणे दर मोसमात नवीन तयार केल्या जातात. जेणेकरून बदललेल्या विषाणूंचा मारा पण त्या यशस्वीपणे परतवून लावू शकतील. वर्षातून एकदा ही लस घेणे आवश्यक आहे. विशेषत: ‘विशेष काळजी’ गटामध्ये मोडणार्‍या लोकांसाठी ही लस अनिवार्य आहे.

एकदा आजाराचे निदान झाले की, सर्वसाधारणपणे लक्षणांनुसार औषधोपचार केले जातात. स्वाईन फ्लूच्या विशेष घसा व नाकातील स्त्राव तपासणीत एच १ एन १ चे विषाणू आढळून आल्यास काही रुग्णांमध्ये अँटीव्हायरल औषधे दिली जातात. तोंडाने घ्यायची ही औषधे फक्त आणि फक्त वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावीत. स्वत: होऊन घेऊ नयेत. टॅमी फ्लू आणि झनमवीर अशी ह्या औषधांची नावे आहेत. ती सर्व सरकारमान्य औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. ह्या औषधांचा वापर मात्र अत्यंत जपून करावा. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे , डॉक्टरांच्या सांगण्यावरून घ्याव्यात. अन्यथा ही औषधे आपली परिणामकारकता गमावून बसतील आणि नंतर स्वाईन फ्लूच्या विषाणूंचा बीमोड करण्यासाठी करण्यासाठी पुढच्या काळात आपल्याकडे कुठलेही शस्त्र (औषधे) उपलब्ध राहणार नाहीत. गर्भवतींसाठीपण ही औषधे सुरक्षित व निर्धोक आहेत. विषाणू प्रतिबंधक औषधे हा आजार काही प्रमाणात कमी करू शकतात. त्यामुळे रोग्यास लवकर बरे वाटू शकते. लवकरात लवकर (लक्षणे दिसून आल्यावर दोन दिवसात) उपचार सुरू केल्यास औषधांचा खूप फायदा होतो.

आहार- स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णांनी भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करावे. पाणी भरपूर प्यावे. भरपूर झोप घ्यावी व आराम करावा. पौष्टिक आहार घ्यावा. सार्वजनिक जनसंपर्क कटाक्षाने टाळावा. स्वाईन फ्लू बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले नातेवाईक, आप्तेष्ट, दवाखान्यातील सेवक इ. लोकांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लू प्रतिबंधक औषधे जरूरीप्रमाणे घ्यायला हवीत.

डॉ. प्रशांत शेटे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!