Type to search

ब्लॉग

स्वयम्देव योगेश्‍वर श्रीकृष्ण

Share

आज गोपाळकाला. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकला हे माझ्यासाठी मोठे पर्व असते. जन्माष्टमीच्या दिवशी मी २४ तास पूजा करतो. त्या दिवशी अखंडितपणे बासरीवादन करतो. फक्त श्रीकृष्ण हाच माझा श्रोता असतो.श्रीकृष्ण हेच माझे आराध्य दैवत. त्या बासरीवाल्याला मी माझ्या बासरीची सुरावट ऐकवतो. श्रीकृष्णाच्या जन्मदिवशी माझ्या मंदिरात केवळ मी आणि श्रीकृष्ण दोघेच असतो. त्या दिवशी दुसर्‍या कुणाचीही गरज नसते. मी आणि माझा गिरीधर! आत्म्याची भेट परमात्म्याशी होते. माझी दोन गुरुकुले आहेत. एक मुंबईत आणि दुसरे भुवनेश्‍वरमध्ये. दोन्ही ठिकाणी जन्माष्टमीच्या दिवशी २४ तास न थांबता बासरीवादन केले जाते. आजच्या काळातही प्रत्येक क्षणी श्रीकृष्ण माझ्या समवेत आहेत. श्रीकृष्णावाचून मी एक क्षणही राहत नाही.

श्रीकृष्ण सर्व कलांमध्ये निपुण आहेत. चौसष्ट कलांचे स्वामी. ते ईश्‍वरांचे ईश्‍वर ‘परमब्रह्म परमात्मा’ आहेत. महाभारत युद्धाची कल्पना आणि निवारण श्रीकृष्णांशिवाय होणे असंभव होते. शांतिदूताच्या स्वरुपात असोत किंवा अर्जुनाच्या सारथ्याच्या रूपात असोत, श्रीकृष्णाच्या जीवनातील एकेका प्रसंगाबद्दल जेव्हा मी विचार करतो, मनन करतो तेव्हा त्यांच्यासारखा दुसरा कुणीच आढळत नाही. आपल्या निळ्या अभेमुळे श्रीकृष्णांना त्यांचे भक्त ‘नीलमणी’ नावाने ओळखतात.

भक्ती तर्काच्या नव्हे तर विश्‍वासाच्या आधारे केली जाते. श्रद्धा, भक्ती आणि प्रेमाच्या त्रिवेणी संगमाद्वारे श्रीकृष्णांना समजून घेणे आणि मनातील कल्पनांच्या आधारे त्यांच्या विश्‍वात प्रवेश करणे शक्य आहे. श्रीकृष्ण त्यांच्या संपूर्ण जीवनात कुठेही गुंतलेले दिसत नाहीत. श्रीकृष्णासारखा जीवनपट इतर कुणाचाच दिसत नाही. ते राजकारणी आणि महान कलाकारही होते. हे दोन्ही गुण एकत्रितपणे श्रीकृष्णांच्या अंगी दिसतात.

माझे गुरू, माझे देव सबकुछ श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्णाचे केवळ एक देवता म्हणून मी पूजन करत नाही. त्यांची शिकवण अंगीकारण्याचा प्रयत्न करतो. आपण मोक्षाची कामना करण्याऐवजी अमरत्वाची कामना करतो. श्रीकृष्णाची आपण पूजा करतो, परंतु त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी नव्हे तर त्यांच्याकडून आपल्या इच्छांच्या पूर्तता करून घेण्यासाठी. पण वस्तुस्थिती अशी की, ना श्रीकृष्ण आपल्याला समजले ना त्यांचा कर्मयोग समजला. त्यामुळे जीवनभर आपण मोहाच्या बंधनात गुंतून पडतो आणि दुःखाने वेढले जातो. श्रीकृष्णाचे टीकाकार आणि विरोधकसुद्धा त्यांना समजून घेऊ शकलेले नाहीत. श्रीकृष्णाचा विषय निघताच ते कंसाच्या वधाचा उल्लेख करत नाहीत.

महाभारतीय युद्धापूर्वी श्रीकृष्णांनी केलेल्या कूटनीतीबद्दलही बोलत नाहीत. गीतेतल्या महान उपदेशाबद्दलही ते बोलत नाहीत. केवळ लोण्याची चोरी, राधा आणि गोपिका तसेच १६००८ पत्नी याचीच चर्चा जास्त रंगते. त्यात श्रीकृष्णांचा दोष नाही, दोष असलाच तर तो श्रीकृष्णाच्या टीकाकारांच्या समजुतीचा आहे.

कला, संगीत असो वा चित्रकला सर्व ठिकाणी आपल्याला श्रीकृष्णाचेच रूप दिसते. श्रीकृष्णांचे वेड संपूर्ण जगाला लागले आहे.

माझ्या गुरुकुलाचे नाव वृंदावन आहे. त्या ठिकाणी १५० देशी आणि परदेशी शिष्य बासरीवादन शिकतात. मी तर लोकांना असे सांगतो की, योगी ज्या ईश्‍वराचे ध्यान करतात, ज्यांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तप करतात तो योगेश्‍वर श्रीकृष्णच आहे. ऋषी-मुनी आणि योगीच नव्हे तर त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनाही श्रीकृष्णाच्या भेटीची आस असते, असे सांगितले जाते. म्हणूनच श्रीमद्भागवत महापुराणात म्हटले आहे की, कृष्णस्तु भगवान स्वयम् म्हणजे श्रीकृष्ण साक्षात देव आहेत. म्हणजेच योगेश्‍वर श्रीकृष्ण हे देवाचा अवतार नव्हेत तर स्वयम् देव आहेत.

जन्माष्टमी आणि गोपाळकाल्यानिमित्त योगेश्‍वर श्रीकृष्णाच्या पदपथावरून चालण्याचा संकल्प आपण अर्जुनाप्रमाणे करायला हवा. तरच श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केल्याचे सार्थक होईल. योगेश्‍वर श्रीकृष्णाचे उपदेश आजच्या युगातही तेवढेच प्रासंगिक आहेत जेवढे द्वापारयुगात होते. श्रीकृष्ण सदैव आपल्या सोबत आहेत आणि राहणार आहेत.
हरिप्रसाद चौरसिया

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!