स्मार्ट नाशिक कागदावरच

0

नवीन नाशिक | दि. १२ प्रतिनिधी- स्मार्ट नाशिकचे स्वप्न बघताना ‘स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक’ ही संकल्पना प्रत्यक्षात कार्यान्वित होणे अपेक्षित असताना ही संकल्पना फक्त कागदोपत्रीच राहिली असल्याचे चित्र नवीन नाशिकसह इंदिरानगर परिसरात दिसून येत आहे.

नवीन नाशिक व इंदिरानगर हे दोन स्वतंत्र विभाग असले तरी आमदारकीच्या एकाच मतदारसंघातील आहेत. सद्यस्थितीत या दोन्ही परिसरात कचर्‍याचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य रामभरोसे सोडण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकांचे कारण राहिले नसूनही पालिका प्रशासनाकडून स्वच्छता व आरोग्य सुविधांकडे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळेच उघड्यावर कचरा जळणार्‍यांचे प्रमाण वाढले असून मनपाचेच कर्मचारी बंदी आदेशाला केराची टोपली दाखवत सर्रासपणे उघड्यावर कचरा जाळताना दिसत आहेत.

इंदिरानगर परिसरातील नळे मळा येथील नाल्याशेजारी नागरिकच राजरोसपणे कचरा फेकत असून नाशिक महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. मनपाचेच स्वच्छता कर्मचारी गोळा केलेला कचरा रस्त्याच्या कडेला पेटवून देतात. परिणामस्वरूप परिसरात धुराचे लोळ निर्माण होऊन स्थानिक रहिवाशांचे आरोग्य बाधित होत आहे.

नगरसेवकांच्या प्रयत्नांनी येथून जवळच अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. दुर्गंधी, डास व धूर यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

अशा स्थितीत मनपाचा आरोग्य विभाग एकप्रकारे येथील नागरिकांच्या जिवाशी खेळत असून हा काळा डाग येथून कायमचा घालवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. येथे मोकाट जनावरांचा वावरदेखील वाढलेला असून गायी, म्हशी या कचर्‍यातील प्लॅस्टिकच्या पिशव्या खात असल्याने मुक्या जनावरांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे.

नाशिक महापालिका प्रशासनास नागरिकांनी वेळोवेळी सूचित करूनही येथील कचर्‍याची जागा हालत नाही. रात्रीच्या सुमारास इथे मोठ्या प्रमाणावर पडलेला कचरा बघून इतर नागरिकदेखील कचरा फेकतात. मनपाचे कर्मचारीदेखील उघड्यावरच कचरा जळतात. नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे.
– गणेश काळे (नागरिक)

LEAVE A REPLY

*