स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
नंदुरबार । स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन दिले.

लोकसेवा आयोगाची परीक्षा घेवून अधिकारी व्हावे व राष्ट्रसेवा करावी ही राज्यातील तरूणाची नोकरी मिळविण्यासाठी जिव्हाळयाची इच्छा असते.

या नोकरीच्या प्राप्तीसाठी अनेक वर्षांपासून पदवीधर विद्यार्थी अभ्यासाची पराकाष्ठा करीत आहेत. मात्र अनेक अडचणींमुळे पदरात काहीही पडले नाही. सर्व प्रश्नांच्या बाबतीत जाणीव करून देण्यासाठी विविध मागण्यांसाठी मोर्चारूपी आंदोलन करण्यात आले. राज्यसेवेच्या प्रसिध्द झालेल्या जाहिरातीत जास्त जागा वाढविण्यात याव्यात, संयुक्त परीक्षा रद्द करून पुर्वीप्रमाणे पीएसआय, एसटीआय, एएसओ स्वतंत्र परीक्षा घेवून जास्त जागांची जाहिरात काढण्यात यावी, एमपीएससीतर्फे बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी घेण्यात यावी, एमपीएससीने परीक्षा केंद्राभोवती मोबाईल जॅमर बसवावेत, राज्यशासनाने प्रत्येक पदासाठी प्रतिक्षा यादी लावावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तामिळनाडू पॅटर्न राबवावा, तलाठी या पदाची परीक्षा लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात, एमपीएससीने सीएसएटी या विषयाचा पेपर युपीएससीच्या नियमानुसार पात्र करावा, स्पर्धा परीक्षेतील तोतया परीक्षार्थी प्रकरणाची तपासणी सीबीआयमार्फत करण्यात यावी, आयोगाकडून अनावधानाने जे प्रश्न चुकतात ते रद्द करण्यात येतात.

त्याची आयोगाने संदर्भासह स्पष्टीकरण द्यावे, राज्यपातळी वरील रिक्त जागा तसेच 23 हजार शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात, पोलीस भरतीची 100 टक्के रिक्त पदांची महाभरती लवकरात लवकर काढण्यात यावी, जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात आरोग्य व शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर विशाल माळी,नितीन घोडके,जगतसिंग गिरासे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

*