स्टॅलिन यांच्यापुढे आव्हानांचा डोंगर

0
करुणानिधींच्या निधनानंतर द्रमुक पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षात पुनरागमन करण्यास इच्छुक असलेले त्यांचे थोरले बंधू एम. के. अलागिरी यांनी त्यांना उघड आव्हान दिले असून ते बंडाच्या पवित्र्यात आहेत. रजनीकांतसारख्या लोकप्रिय अभिनेत्याने तामिळनाडूत नव्या पक्ष स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय पक्षही राज्यात जम बसवण्यास इच्छुक आहेत. आव्हानांचा हा डोंगर स्टॅलिन कसा पार करणार?

तामिळनाडूतील राजकारण गेल्या पंचवीस वर्षांपासून द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अण्णा द्रमुक) या दोन पक्षांभोवतीच फिरत राहिल्याचे दिसते. या दोन्ही पक्षांचे सर्वेसर्वा मानले जाणारे नेते आज या जगात नाहीत. अण्णा द्रमुकच्या जयललिता आणि द्रमुकचे एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार यासंबंधी बरीच चर्चा सुरू आहे. प्रादेशिक पक्षांचाच दबदबा राहिलेल्या या राज्यात भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आपले स्थान शोधत आहेत. तसेच कमल हसन, रजनीकांत असे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेतेही राजकीय कारकीर्द सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत.

याच वातावरणात द्रमुकची धुरा एम. करुणानिधी यांच्यानंतर कोण सांभाळणार, हाही चर्चेचा विषय बनला होता. स्टॅलिन यांची पक्षाध्यक्षपदी अधिकृतपणे निवड झाल्याने या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. करुणानिधी 2016 पासून आजारी होते. तेव्हापासून पक्षाचे निर्णय स्टॅलिन हेच घेत होते. त्यावेळी ते पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष होते. परंतु त्यांच्या अध्यक्षपदावर अधिकृत शिक्कामोर्तब आता झाले आहे. करुणानिधी यांच्या निधनानंतर 21 दिवसांनी 28 ऑगस्टला पक्षाध्यक्षपदी स्टॅलिन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सर्वोच्च पदासाठी त्यांच्याविरोधात कुणाचा अर्जच आला नाही. पक्षाचे सर्व जिल्हाप्रमुख आणि वरिष्ठ नेत्यांनी अध्यक्षपदासाठी स्टॅलिन यांच्या नावाचा प्रस्ताव एकमुखाने मांडला तेव्हाच खरे तर त्यांची निवड निश्चित झाली होती.

पक्षाच्या सर्वोच्चपदी स्टॅलिन यांची निवड होण्यास पक्षातून कोणताही विरोध नव्हता हे खरे; पण त्यांच्या कुटुंबातूनच त्यांना तीव्र विरोध होता. स्टॅलिन यांचे ज्येष्ठ बंधू एम. के. अलागिरी यांनी उघडपणे बंडाचे निशाण फडकावले होते. करुणानिधी यांच्या निधनानंतर थोड्याच दिवसांनी माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुकच्या दक्षिण क्षेत्राच्या बरखास्त संघटनेचे सचिव असणारे अलागिरी हे मरिना बीचवर करुणानिधींच्या समाधीस्थळी गेले होते. तेथेच त्यांनी स्टॅलिन यांच्याविरुद्ध युद्ध पुकारल्याची खुली घोषणाही केली होती. येत्या 5 सप्टेंबरला अलागिरी यांच्याकडून करुणानिधींच्या समाधीपर्यंत एका रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे एक लाख समर्थक रॅलीत सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. पित्याच्या समाधीस्थळी स्टॅलिन यांच्याविरोधात निदर्शने केल्यानंतर स्टॅलिन यांच्याविरोधात रणनीती तयार करण्यासाठी तसेच बंडाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी मदुराईचा हा लोकप्रिय नेता कार्यकर्त्यांची एक बैठकही घेणार आहे.

अलागिरी यांच्या तक्रारींकडे कानाडोळा करता येत नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की, पक्षात पदे विकली जातात. रजनीकांत यांच्या नव्या पक्षात जाण्यासाठी द्रमुकचे अनेक वरिष्ठ नेते उत्सुक असून ते आपल्या संपर्कात असल्याचे अलागिरी सांगतात. असे प्रकार सुरू राहिल्यास द्रमुकचे अस्तित्वच धोक्यात येईल, असे सांगणारे अलागिरी स्वतःला करुणानिधींचा सच्चा अनुयायी मानतात आणि पक्षाला वाचवणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचेही नमूद करतात. आपल्या पित्याचे सर्व निष्ठावान नेते आपल्यासोबत असल्याचा त्यांचा दावा आहे. अलागिरी यांच्या गटाचा असा आरोप आहे की, स्टॅलिन यांना सल्ले देणारे द्रमुकचे काही नेते वस्तूतः त्यांची दिशाभूल करीत आहेत. अलागिरी यांच्या पक्षातील पुनरागमनामुळे आपले स्थान धोक्यात येण्याची भीती या नेत्यांना वाटते.

त्यामुळेच ते स्टॅलिन यांचे कान भरतात, असा हा आरोप आहे. अलागिरी यांच्या निकटवर्तीयांच्या मते, हीच मंडळी पक्षाचे नुकसान करीत आहेत व स्टॅलिन यांनाही हीच मंंडळी नियंत्रित करीत आहेत. अर्थात, स्टॅलिन यांच्या गटाने स्पष्ट आणि स्थिर धोरण स्वीकारले आहे. त्यांच्या मते, पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरूनच अलागिरी यांना करुणानिधी यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यांनी पुन्हा द्रमुकमध्ये प्रवेश करण्याचा सवालच उद्भवत नाही. करुणानिधींचे पुत्र या नात्याने आम्ही अलागिरी यांचा आदर करतो; पण पक्षहिताचा विचार करताना कुटुंबाचा विचार मागे टाकावा लागतो, असे स्टॅलिन समर्थक म्हणतात. अलागिरी यांना स्वतःसाठी आणि त्यांचे चिरंजीव दयानिधी अलागिरी यांच्यासाठी पक्षात महत्त्वाची पदे हवी आहेत, असे सांगितले जाते. ही मागणी स्टॅलिन यांनी धुडकावली आहे. कुटुंबातील काही ज्येष्ठ व्यक्तींनी अलागिरी आणि स्टॅलिन यांच्यात दिलजमाई करण्याचे प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. पक्ष सदस्यांना उद्देशून लिहिलेल्या एका पत्रात स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी मी तयार आहे. अलागिरी यांचे आव्हान डोळ्यापुढे ठेवूनच त्यांनी ही टिप्पणी केल्याचे मानले जाते. परंतु आपल्याला आणि आपल्या समर्थकांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला नाही तर द्रमुकच्या समोर संकटे उभी राहतील, असा इशारा अलागिरी यांनी दिला आहे. अर्थात सद्यस्थितीत एकही जिल्हा सचिव, माजी मंत्री किंवा आमदाराने अलागिरी यांना उघड समर्थन दिलेले नाही. तरीसुद्धा लोकसभा निवडणुकीत अलागिरी द्रमुकचे मोठे नुकसान करू शकतात. विशेषतः राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात ते अधिक नुकसान करू शकतात याची धास्ती पक्षाला आहे.

द्रमुकचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर स्टॅलिन यांच्यासमोर अलागिरी यांच्याव्यतिरिक्त अन्यही अनेक आव्हाने आहेत. त्यांना मुक्तपणे काम करण्याची संधी मिळेल हा फायदा असला तरी त्यांच्या कामगिरीचे आता पक्षाच्या सदस्यांबरोबरच त्यांचे टीकाकार, विरोधक आणि सामान्य जनतेकडूनही मूल्यांकन केले जाईल. एकापाठोपाठ एक निवडणुकांत पराभव पत्करल्यानंतर द्रमुक आज सत्तेपासून दूर आहे.

त्यामुळेच पक्षाला सत्तेवर आणण्याची जबाबदारीही स्टॅलिन यांच्यावर असेल. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे व पक्षसंघटनेचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, असे काही करून दाखवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पक्षांतर्गत आव्हाने त्यांच्यासमोर आहेतच शिवाय रजनीकांत यांच्या रूपाने उभे राहणारे आव्हानही त्यांना पेलावे लागेल. रजनीकांत स्वतःचा पक्ष स्थापन करण्याच्या वाटेवर आहेत. अण्णा द्रमुकच्या नेत्या आणि जयललिता यांच्या निकटवर्ती शशिकला यांचे पुतणे टी.टी.व्ही. दिनाकरन हेही रजनीकांत यांच्याप्रमाणेच तामिळनाडूच्या राजकारणावर हळूहळू पकड मजबूत करीत आहेत. स्टॅलिन यांच्यापुढे आव्हाने उभी करण्याची क्षमता असणार्‍यांत अण्णा द्रमुकचे नेते व मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांचाही समावेश आहे. भाजपही तामिळनाडूत आपला पाया विस्तारण्याच्या प्रयत्नात आहे. केंद्रात सरकार असल्याने या पक्षाला मिळणारा फायदा स्टॅलिन यांना नजरेआड करता येणार नाही. द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांसारख्या द्रविडी अस्मितेवर उभ्या असलेल्या पक्षांना कमकुवत करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे. तो भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फेटाळला आहे. स्टॅलिन आपल्या पित्याप्रमाणे फर्डे वक्ते नाहीत; पण ते उत्तम प्रशासक आहेत. ते चेन्नईचे महापौर होते.

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. कार्यकर्त्यांत ते खूपच लोकप्रिय आहेत. स्पष्ट व खरे बोलणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. परंतु कधी कधी चुकीची वक्तव्ये केल्याने ते सोशल मीडियावर ट्रोलही होतात. त्यांनी अनेकदा संपूर्ण तामिळनाडूचा दौरा केला आहे. राज्याच्या कानाकोपर्‍याची त्यांना खडान्खडा माहिती आहे. पित्याची राजकीय संस्कृती त्यांना वारशाने मिळाली आहे. व्यक्तिगत शत्रुत्व न पत्करता विरोधकांचीही साथ मिळवायची, अशी ही संस्कृती आहे. त्यामुळे पित्याप्रमाणेच ते पक्षाचे संचालन करतील, याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात जराही शंका नाही. स्टॅलिन हे एक प्रयत्नवादी, कष्टाळू कार्यकर्ते आहेत, हेही अमान्य करता येत नाही. परंतु यापुढील काळात त्यांना कष्टांबरोबरच स्मार्ट निर्णयही घ्यावे लागतील. डोळसपणे वाटचाल करावी लागेल.
– के. श्रीनिवासन

LEAVE A REPLY

*