सेवेचा परिघ विस्तारावा!

0

हल्ली या ना त्या कारणाने वैद्यकीय व्यवसाय चर्चेत आहे. वैद्यकीय व्यवसाय दिवसेंदिवस अधिकाधिक आत्मकेंद्री बनत चालल्याची खंत अनेक ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञांनी वारंवार व्यक्त केली आहे. डॉक्टर आणि रुग्ण या नात्यामधील दरी रुंदावत चालली असून डॉक्टरी पेशाची विश्‍वासार्हता धोक्यात येत असल्याचे निरीक्षणही अनेक जाणकारांनी नोंदवले आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर संबंधित सर्वच घटकांनी आत्मचिंतन जरूर करायला हवे. बदलत्या परिस्थितीत वैद्यकीय उपचार महाग व सामान्यांच्या आवाक्याबाहेर चालले आहेत.

परंतु उस्मानाबादच्या डॉक्टर घुले बंधू व त्यांच्या तीन सहकार्‍यांनी डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध दृढ करण्यासाठी आणि अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईत पुढाकार घेतला आहे. रेल्वे स्थानकावर ‘एक रुपया तपासणी केंद्र’ (वनरुपी क्लिनिक) सुरू करून स्वस्त उपचाराचा अभिनव पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सध्या मुंबईतील चार रेल्वे स्थानकांवर हे क्लिनिक सुरू आहे.

आणखी १९ रेल्वे स्थानकांवर टप्प्याटप्प्याने ही तपासणी सेवा देण्यात येणार आहे. आई-वडिलांना गंभीर अपघात झाला. त्यावेळी त्यांना तातडीच्या उपचारांसाठी एका दिवसात बीड आणि पुणे येथे न्यावे लागले. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांची मानसिकता अनुभवायला मिळाली. स्वस्त आणि वेळेवर उपचाराचे महत्त्व पटले.

त्यातूनच ही कल्पना सुचली असे घुले बंधूंनी सांगितले. वैद्यकीय सेवेचे मर्म जाणत ते अमलात आणल्याबद्दल घुले बंधू अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी सुरू केलेला उपक्रम प्रेरणादायी आहे. आधुनिक वैद्यकीय सेवा शहरकेंद्री होत आहे. स्वस्त आणि योग्य उपचारांची गरज ग्रामीण भागात जास्त आहे. अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज रुग्णालये शहरी उंबरठा ओलांडायला सहसा तयार नसतात.

त्यामुळेच ग्रामीण भागातील डॉक्टरांचे शहरात वेगाने स्थलांतर होताना आढळते. ग्रामीण जनतेला नाईलाजाने शासकीय रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. मात्र शासकीय वैद्यकीय सेवा फारशी समाधानकारक नाही. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णांची गैरसोय होते. घुले बंधू उस्मानाबादचे रहिवासी आहेत. ग्रामीण रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे दु:ख त्यांच्यापेक्षा कोण चांगले समजू शकेल? म्हणूनच त्यांनी आपल्या स्वस्त आरोग्यसेवेचा परिघ विस्तारायला हवा. एक रुपया तपासणी केंद्राच्या उपक्रमाचा मोहरा जास्त गरज असलेल्या ग्रामीण भागाकडे वळवला तर जनता मनापासून स्वागत करील.

LEAVE A REPLY

*