सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याची ‘सेकंड इनिंग’
Share

रावेर । शिक्षक कधीही निवृत्त होत नाही. गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे ध्येय त्यांना सातत्याची जाणीव करून देत असते. सेवानिवृत्ती म्हणजे सगळे काही समाप्त झाले असे नसून, ही आयुष्याची सेकंड इनिंग आहे. पहिल्या इनिंगमधील मनातील कल्पना, महत्त्वाकांक्षी उपक्रम सेकंड इनिंगमध्ये पूर्ण करून आपले वेगळेपण सिद्ध करता येते, असे विचार ‘देशदूत’चे महाव्यवस्थापक विलास जैन यांनी रावेरात व्यक्त केले.
येथील कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हॉलमध्ये शिक्षण संवर्धन संघ व माध्यमिक उच्च-माध्यमिक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवारी आयोजित सेवापूर्ती सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी उपस्थितांशी व सत्कारार्थीशी संवाद साधला. व्यासपीठावर संपादक व ज्येष्ठ पत्रकार राहुल रनाळकर, डॉ.अजित बोरोले, कन्हैया अग्रवाल, अशोक वाणी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सुरेश धनके, नगराध्यक्ष दारा मोहंमद, बाजार समिती सभापती डी.सी.पाटील, डी.के.महाजन, भागवत पाटील, पद्माकर महाजन, अनिल अग्रवाल, नगरसेवक सूरज चौधरी, सुधीर पाटील, नगरसेविका संगीता वाणी, विजय गोटीवाले, दिलीप अग्रवाल व मान्यवर उपस्थित होते.
श्री.जैन पुढे म्हणाले की, आजची पिढी प्रोफेशनल होत असल्याने आपलेपण हरवत आहे. त्यामुळे त्यांनी तरुण-तरुणींनी इमोशनल व्हावे. समाजाशी जी नाळ जुळलेली आहे ती बांधिलकी कायम तेवत ठेवली पाहिजे. तसेच सभोवताली आनंद पेरला जावा, असे विचारही त्यांनी मांडले. शिक्षण क्षेत्रातील अडचणींवर संस्थेचे चेअरमन प्रकाश मुजुमदार यांनी प्रकाश टाकला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष महाजन यांनीही त्यांच्या मनोगतातून सेवानिवृत्त शिक्षकांबद्दल गौरवोद्गार काढले. या वेळी सरदार जी.जी.हायस्कूलचे सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक सतीश कोल्हे, कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या उपशिक्षिका शोभा महाजन, उपशिक्षक प्रभुदत्त मिसर यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. प्रास्ताविक शिरीष वाणी, सेवापूर्ती होणार्या तिघा सत्कारमूर्तीचा परिचय स्वप्निल लासूरकर, सूत्रसंचालन प्रा.शैलेश राणे व आभारप्रदर्शन प्रा.एन. व्ही. वाणी यांनी केले. या वेळी रावेर शिक्षण संवर्धन संघाचे संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.