Type to search

आरोग्यदूत

सेल्फ मेडीकेशन

Share

औषधांमध्ये ही वर्गवारी का? तशी सर्वच औषधे ही रसायने. तुलनेने अधिक प्रभावी अन् गंभीर औषधे प्रिस्क्रिप्शन गटात असतात. यांची परिणामकारकता जास्त; पण दुष्परिणामांची शक्यताही जास्त, म्हणूनच याचा उपयोग आवश्यक असेल तेव्हाच व्हावा आणि हा निर्णय फक्त वैद्यकीय तज्ञाचाच असावा. यासाठी प्रिस्क्रिप्शनचे बंधन. जेणेकरून या औषधांचा दुरुपयोग होणार नाही. कोणती औषधे ‘प्रिस्किप्शनचे औषधे’ हे कसे ओळखायचे? लेबलवर डाव्या बाजूला पीएक्स ही खूण व लाल रंगाची उभी रेघ असते. रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या प्रिस्क्रिप्शननेच विक्री करणे असे लिहिलेले असते. झोपेच्या गोळ्या आणि तत्सम औषधांवर एनपीएक्स ही खूण असते.

तब्येतीच्या बारीकसारीक तक्रारींसाठी दवाखाना गाठणे दरवेळी शक्य नसते. ते खर्चिक आणि वेळखाऊही होऊ शकते. म्हणून किरकोळ आजारांसाठी काही औषधे सहज सर्वत्र उपलब्ध असावीत अन् त्वरित उपचार मिळावेत. या हेतूने ‘ओटीसी’ गटाची निर्मिती केली गेली. वर्षानुवर्षाच्या वापराने सुरक्षित सिद्ध झालेली, कमीत कमी धोकादायक औषधे या गटात मोडतात. त्यांची जाहिरात करण्यास परवानगी असते. आपल्या लक्षात आले असेल की, बहुतांश औषधे ही वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यायची, तर थोडीस स्वमनाने. वस्तुस्थिती मात्र वेगळीच दिसते. आपल्याकडे प्रिस्क्रिप्शन व ‘ओटीसी’ असा ‘फरक’ गांभीर्याने करताना कोणतेच घटक दिसत नाहीत. अनेकांना अर्थात अशी वर्गवारी, त्यामागील उद्देश माहितही नसतो. त्यामुळे स्वत:च निर्णय घेणारे ग्राहक व त्यात ‘जो जे वांच्छिल तो ते लाहो’ अशी बरीचशी औषधविक्रीची स्थिती. यामुळे मागणी तसा पुरवठा होतो अन् प्रिस्क्रिप्शन औषधांचेही सेल्फ मेडिकेशन होते.

सेल्फ मेडिकेशनचे प्रकार अनेक, कोणे एकेकाळी डॉक्टरांनी थोड्या अवधीसाठी दिलेल्या औषधांनी बरे वाटले म्हणून वर्षानुवर्षे तीच औषधे, फेर तपासणीस कधीही न जाता, घेत राहणारे रुग्ण असतात. यथावकाशते दुष्परिणामांचे बळी ठरतात. मनोविकाराचे काही रुग्ण जुनेच प्रिस्क्रिप्शन दाखवून पुन्हा पुन्हा औषध घेऊन जातात. एकमेकांचे ऐकून दुसर्‍याची औषधे ट्राय करणारेही अनेक असतात. पूर्वी लागू पडलेले अँटिबायोटिक प्रत्येक किरकोळ तक्रारींसाठी वापरले जाते आणि मग अँटिबायोटिक रेझिस्टन्स (रोगजंतू बंडखोर होऊन औषधांना दाद देत नाहीत.) होतो. कॉम्बिफ्लाम, डायक्लोजन आी आपल्याला अति परिचित वेदनाशामकेही प्रिस्क्रिप्शन गटात आहेत. आश्चर्य वाटले असेल, तर लेबल जरूर तपासा. यांचा अतिवापर करून मूत्रपिंड निकामी होणारे रुग्ण अनेक. ओझेम, रॅनॅटक अशा औषधांसाठीही खरेतर प्रिस्क्रिप्शन हवे.

चित्रपटातील नायकांची देहयष्टी पाहून स्टिराईड्स मागायला येणारा युवावर्ग खूप असतो. मग हाडे पोकळ होतात. हृदयरोग होतो, शुगर वाढते. शरीर मजबूत करण्याच्या फसव्या मार्गाने मग शरीर पोखरून निघते. कष्टाची कामे करणारी मंडळी (यात धुणे-भांडी करणारा महिलावर्गही) ताकदीसाठी अशी औषधे खातात. येथून तेथून ऐकून त्यांना ब्रँडस्ही बरोबर माहीत असतात. झोपेच्या गोळ्या, कोडिनयुक्त खोकल्याची औषधे (नशा आणणारी), व्हायग्रा आणि तत्सम औषधांना मागणी कायम असते. गर्भपाताच्या गोळ्याही महिला सर्रास वापरतात. ग्राहकांना अशा सेल्फ मेडिकेशनपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न काही फार्मसिस्ट करतात. त्यांचे ऐकणे तर दूरच राहिले. उलट अशा दुकानांकडे ही मंडळी पाठ फिरवतात. परदेशात कायद्याची अंमलबजावणी कडक आहे. प्रिस्क्रिप्शन औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणे दुरापास्त असते.

आता ‘ओटीसी’ औषधांकडे वळू. येथे सेल्फ मेडिकेशन कायद्यानेच संमत. रुग्णच स्वत:चा डॉक्टर, त्यामुळे जबाबदारीही जास्त. आपल्याला होत असलेला तब्येतीचा त्रास आणि आपण मागत असलेले औषध यांचा ताळमेळ लागतो ना, याची फार्मसिस्टशी बोलून खात्री करून घेणे महत्त्वाचे. दोन-तीन दिवसांत बरे वाटले नाही, तर स्वत:वर प्रयोग करीत न राहता डॉक्टरांकडे जाणे आवश्यक. ‘ओटीसी’ औषधे तुलनेने सुरक्षित, पण योग्यपणे न वापरल्यास तीही घातकच. काही उदाहरणे बघू. पॅरासिटॅमॉल तसे सेफ औषध; पण जास्त डोस घेतल्यास ते यकृताचे काम बिघडवते. लेबलवर यकृत दुष्परिणाम (लिव्हर टॉक्सीसिटी) लिहिणे अलिकडेच सक्तीचे झाले आहे. कावीळ किंवा यकृताचा इतर आजार असेल तर तसेच दारू सेवनाची सवय असल्यासही पॅरासिटॅमॉल वापरताना डॉक्टरी सल्ला आवश्यक.
बाजीराव सोनवणे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!