सेनेने आवळल्या भाजपच्या मुसक्या ; जि.प.मध्ये राकाँही पंखाखाली?

0

नाशिक (सोमनाथ ताकवाले) : जि.प.मध्ये सत्ताधारी असतानाही शिवसेनेला पाचपैकी तीन विषय समित्यांचे वाटप काँगे्रस किंवा इतर मदत करणार्‍या मित्र पक्षांमध्ये करण्याची वेळ आली आहे. सत्तेची विभागणी सत्ता दीर्घकाळ टिकवण्यासाठी आणि भविष्यात संभाव्य अल्पमत टाळण्यासाठी विषय समिती सभापती वाटपाची खेळी खेळण्याचे शिवसेनेने ठरवल्याचे बोलले जात आहे.

यामुळे काँगे्रससह, राष्ट्रवादी, माकपमधून हकालपट्टी केलेले दोन सदस्य आणि दोन अपक्षही आपल्या गोटात ठेवून सेनेने आगामी काळात फोडाफोडीच्या राजकारणाचे आडाखे बांधणार्‍या भाजपच्या मुसक्या आवळण्याचे धोरण स्विकारले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत शिवसेनेला मदत करण्याची संधी काही पदाधिकार्‍यांच्या अट्टाहासाने दुरावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून पायउतार होण्याची वेळ आली. मात्र, त्यानंतरही विषय समित्यांच्या निमित्ताने शिवसेनेला मदत करून सत्तेत सहभागी व्हावे, या विचाराने राष्ट्रवादी काँगे्रसच्या गोटामध्येच फाटाफुट होणार आहे. म्हणून राष्ट्रवादीची सत्ताधारी शिवसेनेशी जवळीक वाढली आहे.

जिल्हा परिषदेत शिवसेना-काँगे्रसने माकपची मोट बांधून सत्तेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची वाटणी करून घेतली. त्यामुळे शिवसेनेला बहुमत सिद्ध करता आले. दोन्ही पक्षांनी परस्परांना पुरक भूमिका घेतली. मात्र, शिवसेनेला मदत केल्याने माकपने दोन सदस्यांना पक्षातून अर्धचंद्र दिला. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या शिक्षण व आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, बांधकाम व अर्थ समिती, पशूसंवर्धन या विषय समिती सभापतींची निवडणूक चर्चेत आली आहे. येत्या 5 एप्रिलला समिती सभापतींची निवड होणार आहे. त्यामुळे शिवसेनेशी सलगी करणार्‍यांची संख्या वाढली आहे. त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँगे्रसची धावपळ लक्षात येत आहे.

राष्ट्रवादीत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूकीत झालेल्या पराभवनंतर 18 सदस्यांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झालेला आहे. काही पदाधिकार्‍यांच्या अट्टहासामुळेच राष्ट्रवादीला शिवसेनेशी युती करून सत्तेत सहभागी होता आले नाही. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद गेल्याचे काही राष्ट्रवादी पदाधिकारी आता खुल्याने बोलत आहेत. असे असले तरी जिल्हा परिषदेत शिवसेनेला मदत करण्याची आमची भूमिका असून, त्यामुळे एक तरी समिती सभापतीपद पदरात पाडून घेऊ, अशी चर्चा राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि सदस्य करीत आहेत.

माकपने हकालपटी केलेल्या दोन सदस्यांना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीची ही भूमिका घेतल्याचे बोलले जाते. कारण या दोन्ही सदस्यांचा एक गट होणे अपेक्षित आहे आणि त्याची नोंदणी होणे गरजेचे आहे. कारण त्यांना शिवसेनेने दिलेल्या शब्दाप्रमाणे बांधकाम किंवा आरोग्य व शिक्षण समिती सभापतीपद लाभण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, या दोन सदस्यांची निवडणूक विभागाकडे स्वतंत्र गटनोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे.

असे होईपर्यंत शिवसेनेकडे आपण संपर्क करून मदतीची याचना करीत सहकार्य करण्याच्या नावाखाली एखाद्या समितीचे पद पदरात पाडून घ्यावे, असे राष्ट्रवादीतील एका गटात खलबत शिजले आहे. त्यानुसार गेल्या पाच दिवसांपासून राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये तशा हालचाली होत आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीतील अंतर्गत खदखद प्रकट होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

*