सेनेच्या दीपाली बारस्कर भाजपच्या वाटेवर?

0

विकास कामाला खासदार निधी: गांधी, छिंदम यांची हजेरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – स्थायी समितीमध्ये एन्ट्री न मिळाल्याने नाराज झालेल्या सेनेच्या नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देत पक्ष नेतृत्वावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर खासदार दिलीप गांधी यांनी प्रभागात विकास कामासाठी निधी देत सेनेच्या दीपाली बारस्कर यांना पक्ष प्रवेशाचे आवतण दिल्याची चर्चा आहे. उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी बारस्कर यांच्या प्रभागातील कामास हजेरी लावत त्यावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जाते.
गत महिन्यात महापालिकेच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्यांची निवडीसाठी महासभा झाली. त्यात दीपाली बारस्कर यांना डावलले गेले. त्यामुळे त्यांनी सेनेच्या स्थानिक नेतृत्वाच्या कारभारावर उघडपणे नाराजी व्यक्त करत नगरसेवक पदाचाच राजीनामा महापौर सुरेखा कदम यांच्याकडे दिला. त्यानंतर सेनेने बारस्कर यांची समजूत काढली. राजीनामा नाट्यावर पडदा पडला असला तरी बारस्कर यांच्या प्रभागात विकास कामासाठी खासदार दिलीप गांधी यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामागे बारस्कर यांना पक्ष प्रवेशाची ऑफर असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बारस्कर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.
शहराच्या विकासासाठी खासदार दिलीप गांधी यांच्या प्रयत्नातून राज्य शासन व केंद्र शासनाकडे विविध प्रस्ताव पाठविले आहेत. मंजूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच या प्रस्तावांना मंजुरी मिळून शहरामध्ये विकासकामे सुरू होतील. भुयारी गटार योजना मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. दीपाली बारस्कर या काम करणार्‍या नगरसेविका असल्याने त्यांना विकासासाठी निधी दिला असल्याचे सुवेंद्र गांधी यांनी सांगितले.
बारस्कर यांच्या प्रभाग तीनमध्ये खासदार दिलीप गांधी यांच्या स्थानिक विकासनिधीतून व नगरसेविका दीपाली बारस्कर यांच्या प्रयत्नातून अयोध्यानगरी, श्रीराम चौक येथे सभामंडप, पेव्हींग ब्लॉक व खेळणी बसविणे काम सुरू झाले आहे. भाजपचे नगरसेवक महेश तवले, बाळासाहेब बारस्कर, राजाराम चव्हाण, दिनेश कुलकर्णी, शिवाजी लगड, उत्तम चेमटे, कैलास शेळके, शंतनु पांडव, दिनकर थोरात, लांडगे, अरुण बोराटे, दादासाहेब भोईटे, भोजने, सुमित्रा लगड, शैला चव्हाण, सुवर्णा पांडव, ज्योती लगड, शोभा तांदळे, मंदा सपकाळ, वैशाली पांडव, रंजन शेळके उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे निधीसाठी मागणी केली असल्याचे उपमहापौर छिंदम यांनी सांगितले. दीपाली बारस्कर म्हणाल्या की, गेल्या तीन वर्षांत प्रभागातील मुलभूत प्रश्‍न मार्गी लावले आहेत. प्रभागामध्ये गंगा उद्यानासारखे उद्यान विकसित करण्याचा मानस आहे. यासाठी खा. गांधी यांच्याकडे पाठपुरावा करीत आहोत. पक्षविरहीत काम केल्याने प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. विकासकामांतून जनतेच्या विश्‍वासाला पात्र राहिले. यापुढील काळात प्रभागाचा विकासकामांतून कायापालट करू, असे सांगितले.

 

LEAVE A REPLY

*