सुवर्णमध्य कोण काढणार?

0

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातील जागांचे शुल्क प्रचंड वाढवले आहे. महाराष्ट्रातील एका खासगी महाविद्यालयाने व्यवस्थापन कोट्यातील जागेसाठी तब्बल ९७ लाख रुपये वार्षिक शुल्क निश्‍चित केले आहे. अन्य खासगी महाविद्यालयेदेखील भरघोस शुल्क आकारतात.

हे शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कसे परवडावे? त्यामुळे खासगी संस्थांमधील या जागा प्रवेश फेरीनंतरही मोठ्या संख्येने रिक्त राहिल्या आहेत. प्रचंड शुल्कवाढीमुळे मुलांना डॉक्टर करू पाहणार्‍या पालकांचे डोळे पांढरे झाले आहेत. अनेकांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न त्यामुळे अपुरे राहणार आहे.

या विषयात शासनाने लक्ष घालावे की नाही हा चर्चेचा मुद्दा असू शकेल; पण व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेण्याची वेळ आपल्या मुलांवर का आली याचा विचार पालक करतील का? मुलांची क्षमता, त्याचा शैक्षणिक कल, मानसिकता याचा शोध घेण्याची तयारी किती पालक दाखवतात?

मानसिक कल नसताना मुलांवर विशिष्ट क्षेत्रातच करिअर करण्याचा दबाव आणणे अंतिमत: कोणाच्याच हिताचे नसते हे पालकांच्या लक्षात येईल का? वैद्यकीय शिक्षणाचे विशिष्ट धोरण तयार करण्यात शासन अपयशी का ठरते? बहुतेक खासगी वैद्यकीय महाविद्यालये राजकारण्यांच्या मालकीची आहेत.

त्यांची दुकानदारी कोणाच्या आशीर्वादाने सुरू झाली असेल? खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक दर्जाबाबत आणि तेथील गैरसोयींबाबत याआधीही अनेकदा बोलले गेले आहे. तरीही या महाविद्यालयांमधून डॉक्टर होऊन मुले बाहेर पडतात, त्याला कोणाचा वरदहस्त असावा? शिक्षणासाठी लक्षावधी रुपये प्रवेशमूल्य भरून डॉक्टर झालेल्यांकडून सामाजिक बांधिलकीची अपेक्षा कशी ठेवता येईल?

ग्रामीण भागात सेवाभावी वृत्तीने सेवा देणे त्यांना बंधनकारक करणे हासुद्धा एक देखावाच ठरतो. शहरांतील रुग्णालयांची आणि वैद्यकीय तज्ञांची गर्दी म्हणूनच वाढत असेल का? या परिस्थितीत सुवर्णमध्य शोधण्याची गरज आहे. यासंदर्भात शासन पुढाकार घेईल का? परंतु उस्मानाबाद येथील घुले बंधूंनी मात्र वैयक्तिक पातळीवर सुवर्णमध्य गाठण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. त्यांचे व्यवसाय बंधू या उपक्रमापासून प्रेरणा घेतील, अशी अपेक्षा गरजू जनतेने करावी का?

LEAVE A REPLY

*