सुरूवातीला गोंधळ मात्र, त्यानंतर सर्व काही सुरळीत

0

नगरच्या बाजारपेठेतील जीएसटीच्या स्थितीचा कानोसा

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – बहुचर्चित वस्तू आणि सेवा कर, अर्थात जीएसटी 1 जुलैपासून (शनिवार) प्रत्यक्षात लागू होत आहे. जीएसटी लागू झाल्यास अनेक वस्तूंच्या किंमती बदलणार आहेत. यामध्ये काही वस्तू अनपेक्षितरीत्या महाग होतील, तर काही स्वस्त होतील. जीसटी लागू झाल्यानंतर चैनीच्या वस्तूंवरील कर वाढणार आहेत. सिमेंट, स्टील, उद्योग क्षेत्रात जीएसटीबाबत उत्सूकता आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर सुरूवातीच्या काळात गोंधळ निर्माण होईल मात्र, त्यानंतर सर्व काही सुरळीत होईल, असा व्होरा नगर जिल्ह्यातील व्यापारी, सराफ व्यवसायिक, उद्योजक आणि सीए यांच्याकडून व्यक्त होत आहे.

 

 

गेल्या महिनाभरापासून नगरच्या बाजारपेठेत जीएसटी विषयावर चर्चा होत आहेत. जीएसटी लागू झाल्यनंतर वस्तूंच्या किंमती वाढणार या विवंचनेत असणार्‍या ग्राहकांनी गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह सुवर्ण अलंकाराची खरेदी केली. काही ठिकाणी ग्राहकांना शोरुम चालक आणि कंपनीकडून सवलतीचे आमिष दाखवण्यात आले. गुरूवार (दि.29) नगरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली असल्याची माहिती व्यापार्‍यांकडून देण्यात आली.

 

 

जीएसटी लागू झाल्यानंतर सुरूवातीला काही काळ कर भरण्यावरून व्यापार्‍यांचा गोंधळ होईल. मात्र, दैनदिन कामकाज सुरू झाल्यावर सर्वकाही सुरळीत होईल, असा विश्‍वास करप्रणाली क्षेत्रात काम करणार्‍यांच्या तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला. अशीच परिस्थिती उद्योग क्षेत्रात आहे. गेल्या महिनाभरात नगरच्या एमआयडीसी क्षेत्रात मंदीचे वातावरण होते. 25 तारखेनंतर अनेक कंपन्यांनी आपले उत्पादन थांबवले होते. मात्र, जीएसटीबाबत उद्योग क्षेत्रात मोठी उत्सुकता असून हा कर लागू झाल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल, असा विश्‍वास उद्योजकांना आहे.

 

 

शेतीपूरक औजारांवर जीएसटी लागू झाल्यानंतर त्यांचे दर वाढणार आहेत. याचा फटका शेतकर्‍यांना बसणार असल्याचे शेतीपूरक अवजारे विक्री करणार्‍या व्यापार्‍यांकडून सांगण्यात आले. यासह दर महिन्याला रिर्टन्स कसा भरावा, त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी लागणार आहे. याचा आर्थिक फटका व्यापार्‍यांना बसणार असल्याचे काही व्यापार्‍यांनी सांगितले. सुवर्णकार बाजार पेठेत मात्र जैसे थे परिस्थिती असल्याचे, सुवर्ण व्यवसायिकांकडून सांगण्यात आले. रेडिमेड सोन्याचे दागिने स्वस्त होणार आहेत. मात्र, स्वतंत्ररित्या दागिने तयार करायचे असतील, तर ते महाग होणार असल्याचे सुवर्णकार व्यावसायिकांनी सांगितले.

 

 

वाहन बाजाराचा कानोसा घेतला असता जीएसटीनंतर त्यांचे दर कमी होणार आहेत. व्हाईट गुड्सच्या संदर्भात जीएसटी पूर्वीचे आणि नंतरच्या करांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे 1 जुलैनंतर बजेटमध्ये फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. एक हजार रुपयांपेक्षा कमी दर असणार्‍या हॉटेलच्या खोलीत मुक्काम केल्यास त्यावर जीएसटी आकारण्यात येणार नाही. पाच हजार रुपयांवरच्या रूमसाठी 28 टक्के जीएसटी लागू होईल.

 

 

जीएसटी लागू झाल्यानंतर प्रामुख्याने चैनीच्या वस्तू किंमती वाढणार आहेत. महागड्या कारच्या बाबतीत मात्र समीकरण उलटे होणार असून, या कारच्या किंमती उतरणार आहेत. जीएसटीनंतर तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कर आकारणी होणार आहे. यामुळे तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादकांच्या किंमती वाढणार आहेत.

 

 

शुक्रवारी नगरच्या बाजारपेठेत दिवसभर शांतता होती. इलेक्ट्रॉनिक वस्तूची दुकाने, सिमेंट, स्टील व्यापारी निवांत दिसले. सर्वत्र जीएसटीबाबत चर्चा होताना दिसत होती. व्यापार्‍यांकडे चौकशी केली असता थांबा आणि पहा असे उत्तरे देण्यात आली. आता सर्वांना उत्सुकता आहे, ती शनिवार उजाडण्याची आणि सरकार काय नवीन घोषणा करणार याबाबत सर्वांना उत्सुकता असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

 

जीएसटी कर प्रणाली चांगली आहे. उद्योजकांना याबाबत उत्सुकता असून सुरूवातीला काही काळ कर भरण्यावरून अडचणी निर्माण होतील. उद्योजकांना जीएसटीला सकारात्मक प्रतिसाद असून आमच्यासाठी योग्य निर्णय आहे. आतापर्यंत जीएसटीबाबत पाहिजे तेवढी तयारी करण्यात आली असून काही बाबींबाबत सुस्पष्टता अद्याप झालेली नाही. नगरच्या एमआयडीसीत काही कंपन्यांनी गेल्या महिनाभरात उत्पादन कमी केले आहे. मात्र, जीएसटी लागू झाल्यानंतर हळूहळू सर्व काही सुरळीत होईल.
– अशोक सोनवणे (अध्यक्ष, आमी)

 

उद्योग व्यवसायासाठी जीएसटी कर प्रणाली चांगली आहे. सुरूवातील कर भरण्यावरून अडचणी येतील. मात्र, त्यानंतर सर्व काही सुरळीत होईल. उद्योजकांना जीएसटीबाबत उत्सुकता असून सर्व काही सुरळीत होईल, असा विश्‍वास वाटतो.
– प्रवीण बजाज (बजाज पॉवर, नगर एमआयडीसी)

 

 

 

LEAVE A REPLY

*