Type to search

ब्लॉग

सुरक्षेला हवे ‘ड्रोन’ कवच

Share

सध्या भारतीय लष्कर ड्रोनचा वापर अतिउंचीवर तैनात असलेल्या भारतीय सैन्याला त्यांची शस्त्रे, दारुगोळा आणि रसद पाठवण्यासाठी करण्याच्या प्रयत्नात आहे.

ड्रोन म्हणजे नेमके काय?

ड्रोन हे असे विमान आहे जे थोडेफार वजन घेऊन विनापायलट काही अंतर उडून जाऊ शकते. वापराच्या दृष्टीने ड्रोनचे दोन भाग करता येतील. एक म्हणजे ड्रोन हेलिकॉप्टरप्रमाणे हेलिपॅडवरून थेट जिथे जायचे त्या ठिकाणी उड्डाण करू शकेल. अर्थातच त्याची साहित्य वहनाची क्षमता कमी असते. दुसरा प्रकार आहे तो छोट्या धावपट्टीचा वापर करून जास्त सामान घेऊन काही अंतर प्रवास करू शकेल. अशा ड्रोन्सचा वापर भारतीय लष्करालाही करायचा आहे.

ड्रोन्सना त्यांच्या वजनाच्या दृष्टीने चार भागात विभागता येईल. नॅनो म्हणजे 250 ग्रॅमहून कमी- जास्त वजन पेलणारे, मायक्रो म्हणजे 250 ग्रॅम ते 2 किलोपर्यंत सामान वाहून नेऊ शकणारे, तिसरे म्हणजे मिनी म्हणजे 2 किलो ते 25 किलो इतके वजन घेऊन जाणे आणि चौथे स्मॉल ड्रोन म्हणजे 25 किलो ते 150 किलो वजन घेऊन जाणे आणि मोठे ड्रोन म्हणजे यापेक्षा अधिक वजन घेऊन जाण्याची क्षमता.

आज भारतामध्ये पाच ते सहा लाख ड्रोन असावेत. त्यांचा वापर सरकारी परवानगी आणि परवाना घेऊनच करता येईल. अशा ड्रोनचा वापर सियाचीन ग्लेशियर आणि अनेक डोंगराळ भागामध्ये सैन्य तैनात आहेत तिथे करता येईल. ज्या भागात सामान वाहण्यासाठी रस्ते तयार करणे शक्य नाही तिथे सामान वाहून नेण्याकरिता ड्रोनचा वापर करता येईल. सियाचीनसारख्या उंच जागी सैन्य एक तर पाठीवर सामान वाहून नेते किंवा त्यांना घोड्याच्या पाठीवर सामान लादून पाठवले जाते. म्हणूनच अशा भागामध्ये आपण ड्रोनचा उपयोग सैनिकांकरिता सामान वाहून नेणारे वाहन म्हणून करू शकतो.

डोंगराळ भागामध्ये मोठी धावपट्टी तयार करणे शक्य नसते. त्यामुळे छोट्या धावपट्टीवरून उड्डाण करावे लागेल. त्यामुळे त्याची क्षमता 10-15 किलोमीटर एवढी कमीत कमी असली पाहिजे. त्यांना 25 ते 250 किलो या वजनाचे सामान घेऊन जाण्याची क्षमता असली पाहिजे. अशा ड्रोनबाबत भारतीय सैन्याचे संशोधन सुरू झाले आहे. अशा प्रकारचे ड्रोन मजबूतही असावे लागतील. कारण त्या भागामध्ये हवामान थंड व ढगाळ असते. बर्फ किंवा पाऊस पडतो आणि इतर नैसर्गिक आपत्तींनाही तोंड द्यावे लागते. त्यामुळे खराब वातावरणाला तोंड देईल अशीच क्षमता आपण तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत. या ड्रोनमध्ये आयआरएनएसएस नावाची जीपीएस पद्धत वापरली जाईल. आयआरएनएसएस म्हणजेच इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम. याचा वापर करून ते ड्रोन आपले सामान सैनिकांना जिथे पाहिजे तिथे घेऊन जाऊन पुन्हा परत आपल्या तळावर येऊ शकेल. त्यामुळे सैनिकांसाठीच्या रसदीचे दळणवळण करण्यात आपल्याला फारच फायदा होऊ शकेल. अर्थातच या भागामध्ये हवामान ऋण 25 अंश सेल्सिअस असते. त्यामुळे या ड्रोनची एवढ्या नीचांकी तापमानात उड्डाण करण्याची क्षमता असली पाहिजे.

अलीकडेच भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक करार झाला आहे. त्यात अशा प्रकारच्या ड्रोन्सविषयी एकत्रित संशोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   ड्रोन्सचा वापर भारत-चीन सीमेवरही करू शकतो. भारत-चीनची सीमा प्रचंड विस्तारलेली आहे. रस्ते नसल्याने तिथे सैन्य किंवा आयटीबीपी तैनात करण्यासाठी चौक्या तयार करता आलेल्या नाहीत. अशा प्रकारच्या चौक्या तयार होईपर्यंत लडाख, कारगिलच्या कठीण भागामध्ये ड्रोनच्या मदतीने आपल्याला लक्ष ठेवता येईल. बांगलादेश सीमेवर घुसखोरी अजूनही सुरू आहे. नक्षलवादी भागात दंडकारण्यांंतर्गत भागात नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण तळ असतात. त्यांच्यावरती लक्ष ठेवून टेहळणी करून त्यांची नेमकी माहिती काढण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. पण त्यात पाहिजे तेवढे यश मिळालेले नाही. भविष्यात असे लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्याविरोधात ड्रोन्सचा वापर करता येईल. म्हणजेच ड्रोनचा वापर करून आपण आपली अंतर्गत सुरक्षाच नव्हे तर बाह्य सुरक्षासुद्धा मजबूत करू शकतो.

अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे 7,600 किलोमीटर प्रचंड पसरलेली समुद्री सीमा. तिथे ड्रोनचा वापर झाला तर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समुद्राकडून होणारी घुसखोरी थांबवण्यास मदत मिळेल. आजघडीला ड्रोनची किंमत खूपच कमी आहे. त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. इराक, सीरिया आणि अफगाणिस्तानमध्ये अमेरिका ड्रोन्सचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करून दहशतवाद्यांना मारण्याचे काम करत आहे. तसा वापर आपण का करू शकत नाही? त्यामुळे देशाची सुरक्षा मजबूत होऊ शकेल.

काही आठवड्यांपूर्वी सौदी अरेबियाच्या अरामको या तेल प्रक्रिया कारखान्यावरही इराणने ड्रोन हल्ला केला होता. त्यात सौदी अरेबियाचे प्रचंड नुकसान झाले होते. सौदी अरेबियाची अत्याधुनिक अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टिमही त्यांना थांबवू शकली नव्हती. पाकिस्तानच्या दहशतवादाला आपण आक्रमक प्रत्युत्तर देऊ लागलो आहोत. पहिला सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला त्यानंतर दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे अधिक आत सरकल्यानंतर हवाई दलाच्या मदतीने बालाकोट येथेही स्ट्राईक केला. त्यानंतर पाकिस्तानी विमानांबरोबर झालेल्या लढाईत आपल्या मिग विमानाचा वैमानिक पाकिस्तानच्या हद्दीत पकडला गेला. अशा परिस्थितीत 100 कोटी रुपये किमतीच्या राफेल विमानाऐवजी त्याच्या 5 टक्के किमतीच्या ड्रोनचा वापर करू शकतो का, असा विचार करू शकतो. एका राफेल लढाऊ विमानाची किंमत 100 अब्ज डॉलर्स आहे, तर अत्याधुनिक ड्रोन हे 25 हजार डॉलर्समध्ये मिळू शकते.

40 ड्रोनचा एक समूह एकदम हल्ला करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्याची किंमत 1 अब्ज डॉलर्स होऊ शकते. एक राफेल विमान विकत घेण्याऐवजी आपण चाळीस ते पन्नास ड्रोन असलेले 100 प्रकारचे स्वॉम विकत घेऊ शकतो. अर्थात, या ड्रोनवर हल्ला होऊन ती पाडली तरीही आपला कुठलाही वैमानिक हा शत्रू देशाच्या हद्दीत पडणार नाही.

त्यामुळे यापुढे पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण ड्रोनचा वापर करू शकतो का?  माध्यमांमधील माहितीनुसार, अनेक राष्ट्रांकडे अशा प्रकारचे ड्रोन्स आहेत. त्यात अमेरिका आणि इस्राईल हे दोघेही प्रगतिपथावर आहेत. त्यामुळेच आपण अमेरिका आणि इस्राईल यांच्याकडून शिकून ड्रोनचा जेवढा वापर सुरक्षा दलांसाठी करता येईल तेवढा करण्याची गरज आहे.

पाकिस्तानने काही आठवड्यांपूर्वी पंजाब प्रांतामध्ये ड्रोनच्या मदतीने 5 एके-47 रायफल्स आणि स्फोटके पाठवली होती. त्यामुळे देशामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र आपल्याही लष्कराला ड्रोनचा चांगला वापर करता येतो. ड्रोन्सचा वापर अमेरिका अतिशय चांगल्या पद्धतीने करून दहशतवाद्यांना मारण्याचे काम करत आहे. तसा वापर आपण का करू शकत नाही? म्हणजेच ड्रोनचा वापर करून आपण आपली अंतर्गत सुरक्षाच नव्हे तर बाह्य सुरक्षासुद्धा मजबूत करू शकतो.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!