सुधारित आकृतीबंधासाठी कृषी सहाय्यकांचे आंदोलन

0
जळगाव । दि. 12 । प्रतिनिधी-कृषी विभागाचा सुधारीत आकृतीबंध तयार करण्यासह विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहाय्यकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
कृषी सहाय्यकांकडून सात टप्प्यात आंदोलन केले जाणार असल्याचे संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे.
राज्य शासनाने मृद व जलसंधारण असे दोन स्वतंत्र विभाग स्थापन केले आहे. मात्र कृषी विभागाचा सुधारीत आकृतीबंधाबाबत अधिकारी व कर्मचार्‍यामंध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पदे वर्ग करण्याला कृषी सहाय्यकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहाय्यकांनी सात टप्प्यात आंदोलन करण्याचे ठरविले असून आज पहील्या टप्प्यात तालुका कृषी अधिकार्‍यांना निवेदन देण्यात येऊन काळी फित लावून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन बाविस्कर, परेश बडगुजर, सचिन पाटील, सुनिल पाटील, बालाजी कोळी, प्रविणराज सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, आरती पाटील, भगतसिंग पाटील आदी उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या
कृषी विभागाचा सुधारी आकृतीबंध तातडीने तयार करावा, कृषी सहाय्यकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे 100 टक्के पदोन्नतीने भरण्यात यावी, कृषी सेवक पदाचा तीन वर्षाचा कालावधी शिक्षण सेवकांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावा, आंतरसंभागीय बदल्या नियमीत व्हाव्या या मागण्यांचे निवेदन संघटनेतर्फे देण्यात आले.

आंदोलनाचे सात टप्पे
कृषी सहाय्यकांनी आंदोलनाचे सात टप्पे केले आहेत. त्यात दि. 12 ते 14 जून काळी फित लावून कामकाज करणे, दि. 15 ते 17 जून लेखणी बंद आंदोलन, दि. 19 जून रोजी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाजवळ धरणे, दि. 21 ते 23 जून जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण, दि. 27 जून रोजी विभागीय कृषी सह संचालक कार्यालयावर धरणे , दि. 1 जुलै रोजी पुणे आयुक्तालयावर मोर्चा व निदर्शने, दि. 10 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

*