Type to search

ब्लॉग

सुगीत उगी राहूया बरे!

Share

निवडणूक म्हणजे राजकीय ‘सुगीचा हंगाम’! निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्याने तो हंगाम आता सुरू झाला आहे. युती-आघाड्या करण्यात व्यस्त राजकीय पक्षांना आता निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज व्हावे लागणार आहे. निवडणूक घोषित होण्याआधी अनेक चर्चांना उधाण आले होते. निकाल येईपर्यंत त्या सुरूच राहतील. आधी आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेले पक्ष आणि नेते आता नरमाई दाखवू लागले आहेत.

येत्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? सत्ताधारी सत्ता टिकवणार की विरोधक परिवर्तन घडवणार? भाजप-शिवसेना युतीचे काय होणार? वेगळे लढले तर कुणाला फायदा होणार? कॉंग्रेस आघाडीला उमेदवार मिळतील का? मिळाले तर त्यांचे ‘वंचित’समोर पानिपत होणार का? वंचितला आता लोकांचा पाठिंबा कसा मिळणार? त्यांचे पुढचे राजकारण कसे असेल? राज ठाकरेंना आता जनता कसा प्रतिसाद देणार? शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का? अशा प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचे काम सध्या महिनाभर सारेच जण करत राहतील, पण राजकारणापलीकडे जाऊन पाहायचे झाल्यास सामान्य माणसांसाठी येत्या दिवाळीत काय वाढून ठेवले आहे त्याचा कानोसा घेताना निदान आतातरी कोणी दिसणार नाही. कारण निवडणुकांच्या आधी अशी चर्चा कुणी करणार नाही. मात्र या दिवसांना देशात ‘सुगीचा हंगाम’ म्हणतात.

विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय पक्ष आणि राजकाराणाशी संबंधितांसाठी हा सुगीचा हंगाम आहेच. पण दिवाळीपूर्वीचा हंगाम शेतीप्रधान देशात सुगीचा मानला जातो. पण यंदा मान्सून लांबला आहे. पुढील पंधरा दिवस पाऊस कायम राहिल्यास शेतीमालाची स्थिती भयानक होणार आहे. भात, तेलबीया किंवा डाळींची आवक घटण्याची शक्यता आहे. परिणामी ऐन सणासुदीलाच महागाई भडकण्याची चिन्हे आहेत. डाळींच्या किमती कडाडण्याची शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे. नागपूर, अकोला, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटकमधील हुबळी येथून मुगाच्या डाळीची आवक होते. या सर्व ठिकाणी अद्यापही पाऊस सुरू आहे. पावसाळा सरल्यानंतर साधारण महिनाभरात नवीन डाळी बाजारात येतात. यंदा सर्वत्रच दमदार पाऊस सुरू आहे. तूर, हरभरा, मूग या उत्पादन पट्ट्यात अद्याप पावसाचा जोर कमी झालेला नाही. याबाबत डाळींचे घाऊक व्यापारी व अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) सचिव रमणिकभाई छेडा यांनी सांगितले की, विदर्भ आणि गुजरातमधील काही भागातून डाळींची आवक होते. या दोन्ही ठिकाणी आतापर्यंत अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. यामुळे आता ज्या डाळी तयार होत आहेत त्यात ओलसरपणा आहे. या स्थितीत आता पाऊस थांबला नाही तर या डाळी खराब होण्याची भीती आहे. डाळींमधील हा ओलसरपणा घालवण्यासाठी किमान आठवडभराचे कडक ऊन आवश्यक असेल. अन्यथा पुढील महिन्यापासून सुरू होणार्‍या नवीन डाळींची आवक रोडावेल. त्याचवेळी जुन्या डाळींचा साठाही दिवाळीपर्यंत संपेल व त्यातून दरवाढ होऊ शकते. हीच स्थिती अन्य पिकांबाबतही आहे.

याशिवाय महागाई भडकण्याची अन्यदेखील काही कारणे आहेत. त्यात तेल उत्पादक देश सौदीमध्ये तेलनिर्मिती केंद्रावर झालेल्या हल्ल्यांमुळे तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे. लिटरला ५ ते ७ रुपयांनी तेलाच्या किमती वाढतील, त्यात देशात आर्थिक मंदी असल्याने रुपयाची घसरण सुरूच राहणार आहे. परिणामी पुढील काही महिन्यांत महागाईचा आगडोंब उसळणार आहे. पण आपण त्याची चिंता करून काय होणार आहे, ज्यांनी ती करायला हवी ते तर राजकराणात गुंग आहेत. राज्यात काही भागात पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नाही, तर काही भागात पाऊस पडला नाही म्हणून अजूनही टँकर सुरू आहेत. दिवाळी यांच्यासाठीसुद्धा त्रासाची असेल. थोडक्यात सुगीचा हंगामा म्हटल्या जाणार्‍या या दिवसांत तसे काही वातावरण यावेळी दिसत नाही.

मग चला तर राजकारणाच्या चर्चांमध्ये मनोरंजन करून घेऊया! दोन्ही निवडणुका सोबत घ्या, अशा मंजूर अटीसह भाजप प्रवेश करणार्‍या छत्रपती उदयनराजेंनी नाशकात पंतप्रधानांच्या डोईवर मराठेशाही पगडी ठेवली त्यावेळी पंतप्रधान  व्यासपीठावर रामदास आठवलेंच्या उपस्थितीत काय म्हणाले होते आठवले का? या पगडीला धक्का लागू देणार नाही, पण झाले भलतेच! मराठा मतांसाठी भाजपत आणलेल्या तिसर्‍या छत्रपतींना दिलेला शब्द पाळला गेला नाही. आता भाजप केवळ मतांसाठी त्यांचा वापर करून घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निवडणूक आयोगाने देशातील विधानसभेच्या ६४ जागांवरील पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला. मात्र सातार्‍याचीच पोटनिवडणूक लांबणीवर ठेवली गेली. जी अग्रहक्काने घ्यायचे ठरले होते. बरे महाराज तर मतपत्रिकांच्या माध्यमातून निवडणूक लढायला तयार आहेत. म्हणजे कुणी म्हणायला नको ईव्हीएमचा घोटाळा केला म्हणून! पण भाजपच्या राज्यात छत्रपतींच्या वाट्यालासुद्धा अशी उपेक्षाच? महाराष्ट्र आणि हरियाणात निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर केली, पण महाराष्ट्रात सातार्‍यातील पोटनिवडणुकीचा समावेश का नाही? सातार्‍यातील उदयनराजे भोसले यांनी भाजपत दाखल होताना खासदारकीचा राजीनामा दिला.

वेगवेगळ्या राज्यांत पोटनिवडणुकाही होत आहेत तर मग महाराजांवर आल्या-आल्या अन्याय का बरे? याचे उत्तर सध्या कुणीच देत नाही. छत्रपतींच्या वंशातील राजेंची ही स्थिती तर दुसरीकडे वयाच्या ७९ व्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘मला काही नको, पण बर्‍याच जणांचा हिशेब द्यायचा आहे’ असे म्हणून मैदानात उतरलेल्या जाणत्या राजांनी भाकित केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘पुलवामा’ घडले. त्याचा केंद्रातील सत्ताधारी पक्षाला फायदा झाला. राज्यातील निवडणुकीपूर्वी ‘पुलवामा’प्रमाणे काही घडले नाही तर राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. मराठवाडाभर फिरून आलो. सर्व ठिकाणी युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. देश व राज्यातील सरकारबाबत तीव्र नापसंती असावी असे दिसते. लोकांमध्ये प्रचंड उत्साह असून तरुणांमध्ये परिवर्तनाची लाट आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची कष्टाची तयारी आहे, असेही पवारांनी म्हटले आहे, पण त्यांच्या धाकल्या पातीने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या झेंड्यासोबत भगवा लावायला का सुरुवात केली? या प्रश्‍नाचे उत्तर देताना आपल्या सहमतीने हे होत नसल्याचे पवारांनी सांगितले. तिकडे मूळचा भगवा हाती असलेल्या उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत सध्या युतीच्या आट्यापाट्या खेळाव्या लागत आहेत. शिवसेना भवनात मंत्र्यांच्या बैठकीत ठाकरे यांनी युतीबाबत नेत्यांशी चर्चा केली. नंतर माध्यमांशी बोलताना पन्नास-पन्नास टक्के जागांचा आग्रह नव्हताच, असे नरमाईची भूमिका घेऊन सांगितले.

शिवसेनेची यादी आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली आहे. मुख्यमंत्री ठरवतील आणि आम्हाला देतील. त्यामुळे लवकरच युतीबाबत घोषणा होईल. नाणार आणि आरेबाबतचा विरोध स्थानिकांसाठी आहे. विकासकामाला शिवसेनेने कधी विरोध केलेला नाही, ‘आरे’त कारशेड करण्याला विरोध आहे, असे ठाकरे म्हणाले. अयोध्येतील राममंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही शिवसेना अधूनमधून या विषयावरून केंद्र सरकारवर ‘बाण’ सोडते. त्यावरून नाशिकच्या सभेत पंतप्रधानांनी अप्रत्यक्षपणे कानउघाडणी केल्यानंतर उद्धव यांचा सूर बदलल्याचे पाहायला मिळाले. राममंदिराबाबत जी भूमिका मांडली ती देशातील तमाम हिंदूंची भावना आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्‍वास आहेच. ते जो निकाल देतील तो निष्पक्ष असेल याची आम्हाला खात्री आहे. पंतप्रधान म्हणत असतील तर आम्ही थांबायला तयार आहोत, असे ठाकरेंनी सांगितले. युतीबाबत नवे सूत्र आले आहे. तुम्ही आकड्यांवर जाऊ नका. जे शिवसेनेच्या वाट्याला येईल ते घेऊन लढायची आमची तयारी आहे. समाधानी असल्याशिवाय पक्षप्रमुख तसे काही करणार नाहीत असे अनिल देसाई यांनी सांगून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक घोषित झाली आहे. मात्र युतीची घोषणा बाकी आहे. पाहूया पुढे काय होते ते!

किशोर आपटे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!