सीबीआयकडून जळगाव जिल्हा बँकेत नऊ तास चौकशी

0

जळगाव | प्रतिनिधी :  चोपडा येथील नोटबदली प्रकरणात आज सीबीआयच्या पथकाकडून  जिल्हा बँकेत तब्बल ९ तास आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीमुळे सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
चोपडा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत नोटबंदीच्या काळात शंभराच्या ७३ लाख रुपयांच्या नोटा बदली करण्यात आल्या.

या प्रकरणात जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्या सांगण्यावरुन बदलल्या असल्याची माहिती शाखा व्यवस्थापक आणि रोखपालांनी सीबीआयच्या पथकाला दिली.

शाखा व्यवस्थापक आणि रोखपालाच्या माहितीनुसार आज सीबीआयचे पथक थेट जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्या घरी सकाळी दाखल झाले. याठिकाणी त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर जिल्हा बँकेत हे पथक दाखल झाले.

जिल्हा बँकेत नऊ तास कसून चौकशी

जळगावात दाखल झालेल्या सीबीआयच्या पथकात मुंबई सीबीआयचे निकम आणि राणा नामक दोन अधिकार्‍यांचा समावेश होता. तसेच तीन स्थानिक अधिकारी आणि दोन पंच अशा सात जणांचे हे पथक होते. या पथकाने जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्या दालनात बसून बँकेतील आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अशी तब्बल नऊ तास ही तपासणी करण्यात आली.

जिल्हा बँकेत प्रवेशबंदी

सीबीआयकडून सुरु असलेल्या या तपासणी कालावधीत आज जिल्हा बँकेत बाहेरील व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात आली होती. प्रवेशद्वारावरच तीन सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते. तसेच बँकेतील इतर कर्मचार्‍यांनाही बँकेच्या बाहेर देखील जावू दिले जात नव्हते. या सर्व घडामोडीमुळे जिल्हा बँकेत दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शहरासह सोशल मीडियावरही चर्चा

सीबीआयच्या पथकाकडून जिल्हा बँकेत सुरु असलेल्या तपासणीबाबत आज शहरासह जिल्हाभरात आणि सोशल मीडियावर देखील माहितींची देवाण-घेवाण सुरु होती. बँकेत मोठे घबाड सापडल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली होती.

संचालकांची जिल्हा बँकेत भेट

जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी या तपासणी काळात जिल्हा बँकेत भेट दिली. यावेळी सीबीआयच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याशी देखील चर्चा केली.

सहकार क्षेत्रात खळबळ

नोटबंदी झाल्यानंतर जिल्हा बँकेकडे तब्बल २२० कोटी रुपयांच्या रकमेच्या जुन्या नोटा प्राप्त झाल्या होत्या. या रकमेसंदर्भात बँकेकडून शासनाला पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता.

परंतु रिझर्व्ह बँकेने नोटबदलीवर निर्बंध लावल्याने ही रक्कम तशीच पडून राहील. आज सीबीआयच्या पथकाने केलेल्या तपासणीमुळे सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे.

सीबीआयचे पथक मागच्या दरवाज्याने रवाना

दिवसभर जिल्हा बँकेत चौकशीसाठी ठाण मांडून होते. या पथकाकडून काही माहिती मिळेल, या उद्देशाने माध्यमांचे प्रतिनिधी जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारासमोर उपस्थित होते.

परंतु सायंकाळी तपासणीनंतर माध्यमांना चकवा देत हे पथक मागच्या दरवाज्याने कारमधून रवाना झाले. त्यांच्यासमवेत बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख हे देखील एमएच-१९ एपी ३८८८ या कारने रवाना झाले.

LEAVE A REPLY

*