‘सिने’ची पाणी कोंडी

0

आयुक्तांची गाडी अडविली,  कारवाईची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)-  सीना नदीवर नवीन पुल बांधण्याचे काम सुरू असून मातीचा भराव टाकून ठेकेदाराने सीना नदीचा प्रवाह अडविला आहे. महापालिकेने नदीपात्रातील वेड्या बाभळी व मातीचे ढिगारे न काढल्याने ‘सीने’ची कोंडी झाली आहे. नदी प्रवाह सुरळीत करावा यासाठी शहर सुधार संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी महापालिका आयुक्त दिलीप गावडे यांची गाडी अडविली.

महापालिका हद्दीत रेल्वे स्टेशन रस्त्यावरील जुन्या लोखंडी पुलाशेजारी नवीन पुल बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम करणार्‍या ठेकेदाराने नदीपात्राचा प्रवाह मातीचा भराव टाकून अडविला आहे. पावसाचे पाणी नदीपात्रातून पुढे जाण्याचा मार्ग त्यामुळे बंद झाला आहे. सीना नदीला यापूर्वी आलेले पुराचे पाणी नालेगाव, बागरोजा हडको, मोरचूदनगर, स्टेशन रस्ता भागात घुसून जनजीवन विस्कळीत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ठेकेदाराने नदीचा प्रवाह अडविल्याने पावसाचे पाणी या भागातील नागरिकांच्या घरात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊनही महापालिकेने सीना नदीपात्रातील मातीचे अडथळे व वेड्याबाभळीची झाडे काढलेली नाहीत. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची कोंडी होणार आहे. सीनेचा प्रवाह अडविणार्‍या ठेकेदारावर कारवाई करावी तसेच नदीपात्रातील स्वच्छता करण्यास दिरंगाई करणार्‍या महापालिका अधिकार्‍यावर कारवाई करावी या मागणीसाठी शहर सुधार समितीचे संजय झिंजे, उबेद शेख, शाकीर शेख, दीपक सुळ, संतोष लोखंडे,सागर ठाणगे यांनी आयुक्त दिलीप गावडे यांचे वाहन अडवित त्यांना महापालिकेत जाण्यास मज्जाव केला.

महापालिकेची यंत्रणा तातडीने रवाना
सीना नदीपात्र अडविणारा मातीचा भराव काढण्यासाठी आयुक्त दिलीप गावडे यांनी तातडीने यंत्रणा रवाना केली. भराव काढण्यास सुरूवात होईपर्यंत आयुक्तांना पुढे जाऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. त्यामुळे आयुक्तांना कारवाई करावीच लागली. जेसीबी तातडीने पाठवून मातीचा भराव काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

LEAVE A REPLY

*