सिंधूताईंचा स्वानुभवी उपदेश

0
नाशिक शहरात पंचवटी परिसरातील एकाच कुटुंबातील सहा अल्पवयीन मुलींनी अभिनेता शाहरुख खानचा बंगला बघण्यासाठी थेट मुंबई गाठली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही अघटित घडण्याआधीच मुलींचा शोध लागला आणि त्यांना सुरक्षितपणे कुटुंबियांच्या हवाली करण्यात आले. खार पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाच्या मुलानेच आईची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. रोकडसहित मुलगा घरातून गायब झाला आहे.

 

त्याने रक्तरंजित आव्हानही घरात फरशीवर लिहून ठेवले. तीन शाळकरी मुलांवर पंचवटी परिसरातील एका गुंडाच्या खुनाचा आरोप आहे. गेल्या दोन वर्षांत बालगुन्हेगारीचा आलेख सतत चढता आहे. शासकीय आकडेवारीवरूनच ते सिद्ध होते. बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत; पण नापास होण्याच्या भीतीने एक तरुणी घर सोडून निघून गेली आहे. या सगळ्या घटना समाजमनाला अस्वस्थ करणार्‍या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी जीवनातील अनुभवावर आधारित मोलाचा उपदेश केला आहे. पूर्वी आजी-आजोबा नातवंडांवर संस्कार करत असत. काळ बदलला. कुटुंबे विभक्त झाली. बदलत्या राहणीमानाने आजी-आजोबांना फारसे स्थान उरले नाही. तथापि त्यामुळे बालकांवर संस्कार करण्याची वाढलेली जबाबदारी मात्र योग्यरीतीने संक्रमित झालेली आढळत नाही.

अनेक कुटुंबांत आई-वडील दोघेही व्यावसायिक किंवा नोकरपेशे बनले. मुलांकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यास घराघरांत वेळ कमी झाला आहे; पण विचारपूर्वक मुलांच्या विकासाकडे लक्ष दिले न गेल्यास होणारे परिणाम वर नमूद केलेल्या घटनांतून लक्षात यावेत.

सिंधूताईंनी व्यक्त केलेले विचार फार समयोचित आणि पुढील पिढीचे भविष्य घडवण्याकरता मोलाचे आहेत. कारणे कोणतीही असोत; बहुसंख्य पालकांचे आयुष्य घड्याळ्याच्या काट्याशी बांधले गेले आहे. यांत्रिक सुधारणांनी जीवन सुखकर झाले आहे; पण माणूस यांत्रिक गुलामीचा शिकार बनला आहे. या बदलत्या परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांचे जीवन अधिक उन्नत करण्याकडे पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज सिंधूताईंनी योग्य शब्दांत अधोरेखित केली आहे.

त्यांचा उपदेश मनावर घेऊन आपल्या भूमिकेचा पुनर्विचार पालकांनी केला तरच कुटुंबसंस्थेचे आणि समाजाचे भवितव्य अधिक उज्ज्वल ठरू शकते. आपापल्या जबाबदार्‍यांचा व आयुष्याचा प्राधान्यक्रम बदलण्याची व त्यासाठी वेळीच काही तडजोडी करण्याची तयारी पालक दाखवू शकतील का?

LEAVE A REPLY

*