सावाना निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांचे नाट्य

0

 

नाशिक। दि.25 प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तशी आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्या आहेत. एका बाजूला प्रचार तर दुसर्‍या बाजूला आरोप अशीच स्थिती सध्या तरी दिसू लागला आहे.

गुरुवारी ‘ग्रंथमित्र पॅनल’ने आपल्या प्रचाराचा शुभारंभ वाचनालयाबाहेर केल्याने ‘जनस्थान’ पॅनलने यावर आक्षेप घेत ग्रंथमित्र पॅनलचा मनमानी कारभार सुरू असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान प्रतिस्पर्धी पॅनलला मात देण्यासाठी जनस्थानकडून पुस्तक परिक्रमा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

ग्रंथमित्र पॅनलने सुरुवातीलाच ग्रंथ पूजन आणि ग्रंथ पालखी काढत आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यात साहित्यिक प्रभाकर बागुल, रेखा भांडारे, एन. एम. आव्हाड, विजय पवार आणि अभिमन्यू सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथ पूजन आणि ग्रंथ पालखी काढून तसेच कवी कुसुमाग्रज, मु. शं. औरंगाबादकर, वसंत कानेटकर, अ. वा. वर्टी यांच्या प्रतिमा पूजनाने प्रचाराचा आरंभ केला.

सार्वजनिक वाचनालयाच्या बाहेर प्रचारानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथ पालखीचा समारोप वाचनालयाच्या प्रवेश द्वाराजवळ करण्यात आल्याने जनस्थान पॅनलच्या सदस्यांनी या कृतीवर थेट आक्षेप घेतला. बुधवारी जनस्थान पॅनलतर्फे प.सा.नाट्यगृहाच्या बाहेर लावण्यात आलेल्या फलक काढून घेण्याची तक्रार ग्रंथमित्र पॅनलतर्फे करण्यात आल्याने तक्रार करणार्‍या पॅनलनेच वाचनालय आवारात ग्रंथ पालखी कशी काढली, असा सवाल प्रतिस्पर्ध्यांनी उपस्थित केला आहे.

फलक आणि ग्रंथ पालखीवरून रणकंदन सुरू असताना ‘ग्रंथमित्र पॅनल’कडून सार्वजनिक वाचनालय या वास्तुचा प्रचार कार्यालय म्हणून वापर केला जात असल्याचाही आरोप जनस्थान पॅनलतर्फे करण्यात आला आहे. काळजीवाहू अध्यक्ष म्हणून प्रा. विलास औरंगाबादकर हे वाचनालयाचा कारभार बघत असले तरी निवडणुकी संबंधित कामे वाचनालयातून व्हायला नकोत, असेही मत जनस्थान पॅनलतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक वाचनालयात सुुसूत्रता निर्माण व्हावी, असे दावे निवडणुकीतील उमेदवार करत असले तरी प्रत्यक्षात मात्र वाचनालयात असे चित्र बघायला मिळत नसल्याचा अनुभव वाचक सभासदांनादेखील येत आहे.

दरम्यान सार्वजनिक वाचनालय हे पुस्तकांशी संबंधित असल्याने पुस्तकांनाच धरून काही उपक्रम केला तर अशी अभिनव कल्पना जनस्थान पॅनलच्या मनी आली आणि त्यातूनच पुस्तक परिक्रमा हा अनोखा उपक्रम त्यांनी सुरू केला. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे शुक्रवारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रा. रवींद्र कदम आणि अतुल पगार यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. पुस्तक परिक्रमा या उपक्रमात पुस्तकांची अनोखी मांडणी करून ठेवलेले एक वाहन असून, त्यावरील पुस्तकांमधून एक आवडते पुस्तक वाचकाने घेऊन जायचे आहे.

मात्र त्याबदल्यात तेथे त्याच्याकडचे एक पुस्तक त्याने ठेवायचे आहे. अशा प्रकारे हा उपक्रम असून, संपूर्ण नाशिकभर हा उपक्रम करण्यात येणार आहे. गल्लीबोळांमध्ये हे वाहन फिरणार असून आपल्याकडची वाचलेली पुस्तके या वाहनात ठेवायची व त्यातून एक पुस्तक घ्यायचे या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

वाचक अतिशय आवडीने या वाहनामधून पुस्तके नेत असून त्याबदल्यात तेथे एक पुस्तक ठेवत आहे. या वाहनामध्ये ते पुस्तके असून, यात काही नव्या पुस्तकांचा समावेशदेखील आहे. ही नवी पुस्तके वाचनालयाच्या सभासदांसाठी ठेवण्यात आली असून त्यांना कार्ड दाखवून ती पुस्तके नेता येणार आहे. या उपक्रमाची संकल्पना विनायक रानडे यांची आहे. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

LEAVE A REPLY

*