सारंगखेडा यात्रेमुळे अनेकांना मिळाला रोजगार

0

रघुनाथ बेलदार,मामाचे मोहिदे ता.शहादा । जगभरात घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या यात्रेत येणार्‍या यात्रेकरूंसाठी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात.

त्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असते. सर्व क्षेत्रात मनुष्यबळाचा वापर करण्यासाठी रोजगार निर्मिती होते, त्यातून अनेकांना रोजगार प्राप्त होतो.

घोडे बाजारात आजपर्यंत 1800 घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. शिवाय चेतक फेस्टिवलद्वारा होणार्‍या अश्वशर्यत, अश्वनृत्य यासाठी इतर घोडे दाखल झाले आहेत.

त्या सर्वांसाठी लागणारा रोजचा हिरवा चारा स्थानिक मजूरांतर्फे पुरवला जातो. मजूर पहाटे 4 ते 5 वाजता शेतात जावून चारा गोळा करून आणतात व तोच सकाळी 10 वाजेपर्यंत विक्रीस हजर ठेवतात. चारा विक्रीपासून अनेकांना रोजगार मिळाला आहे.

यात्रेत उपहारगृहांची संख्या बर्‍या प्रमाणात असते. उपहारगृहात शेव-चिवडा आदी खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी कारागीर ऑर्डर स्विकारण्यासाठी मॅनेजर व ऑर्डरीप्रमाणे माल गिर्‍हाईकास वाटप करणे यासाठी लागणारे मनुष्यबळ स्थानिक पातळीवरून रोजंदारीने लावले जाते. याच रोजंदारीमार्फत येथील तरुणांना 15 ते 20 दिवसांचा रोजगार प्राप्त होतो.

खेळणी, भांडी दुकान व महिला शृंगार दुकानेसुद्धा यात्रेत लावली जातात. या दुकानात दुकानाच्या मालकांव्यतिरिक्त सेल्समन म्हणून दुकानात चार-पाच तरुणांची गरज असते. त्यांनासुद्धा काही दिवस का असेना या दुकानामार्फत रोजगार प्राप्त होतो.

काही तरूण यात्रेत विक्रीसाठी खेळणी, कटलरी, हरमाल एकभाव अशी हंगामी दुकाने स्वतः होलसेल दराने माल विकत आणून ती किरकोळ विक्रीसाठी दुकान थाटत असतात. अशा हंगामी दुकान लावण्यातून अनेकांना रोजगार प्राप्त होतो.

घोडे बाजार हा शहादा-दोंडाईचा रोडच्या पूर्वेस भरत असतो. परंतू भांडे दुकान, मसाल्यांची दुकाने कटलरी दुकाने, अल्पोपहारांची दुकाने ही रोडच्या पश्चिमेस म्हणजे गावात लावली जातात. ही दुकाने गावात असलेल्या बखळ जागेत, राहत्या घराच्या पुढील अंगणात लावली जातात. त्या जागेचे भाडे त्या घरमालक किंवा बखळ जागेच्या मालकांना मिळते. त्यातून आर्थिक प्राप्ती होत असते. यात्रेमुळे हे एक उत्पन्नाचे साधन ग्रामस्थांना होते.

अलीकडे टू-व्हिलर व फोर-व्हिलर वाहने जास्त प्रमाणात झाली आहेत. राहणीमान सुधारल्यामुळे यात्रेत बसने येण्यापेक्षा स्वतःची वाहने घेऊन यात्रेत दाखल होतात. त्या वाहनांना व्यवस्थित जागा मिळण्यासाठी यात्रेत खाजगी पार्किंगची सोय केलेली असते.

पार्किंगच्या व्यवस्थेमुळे वाहने सुरक्षित एका ठिकाणी लावली जातात व रस्त्यावर जाम लागण्याची वेळ येत नाही. पार्किंगमुळेसुद्धा अनेक तरुणांना तात्पुरता रोजगार प्राप्त होतो.

यात्रेत मौत का कुवा, फिरते सिनेमागृह, पाळणे, जादूगार अशी वेगवेगळ्या माध्यमातून मनोरंजन होत असते. त्यासाठी सुद्धा मजूरांची आवश्यकता त्यांना भासते. त्यामुळे मजूरांनासुद्धा रोजगार मिळत असतो.

LEAVE A REPLY

*