सायबर कॅफे चालक व भंगार विक्रेत्यांवर कारवाई

0
धुळे । दि. 14 । प्रतिनिधी-ग्राहकाबद्दल माहिती न पुरवल्याने पिंपळनेर, ता.साक्री येथील युनिव्हर्सल सायबर कॅफे चालक व भंगार विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहशतवाद विरोधी कक्षातर्फे पिंपळनेर येथील युनिव्हर्सल सायबर कॅफे व भंगार खरेदी व विक्रेते यांना सायबर कॅफे व भंगार खरेदी विक्रीसाठी येणारी व्यक्ती किंवा वापरकर्ते यांचे ओळखपत्र व रजिस्टरची माहिती पोलिस ठाण्याला देण्याबाबत नोटीस देण्यात आली होती.

मात्र या सायबर कॅफेचे चालक व भंगार विक्रेते यांनी माहिती दिली नाही व दिलेल्या आदेशाचे अवमान केल्याप्रकरणी हेकॉ नारायण माळी व पोकॉ भूषण वाघ यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांच्या विरुध्द भादंवि कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास हेकॉ अमृतकर हे करीत आहेत. धुळे जिल्हा पोलिस दलातील दहशतवाद विरोधी कक्षातर्फे अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी ग्राहकांबद्दल माहिती पुरविण्यासाठी व्यावसायिकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

मात्र, त्यानंतरही माहिती पुरविण्यात आली नाही. म्हणून ही कारवाई करण्यात आली.

कारवाई सुरुच राहणार
यापुढे ही अशीच कारवाई करण्यात येणार आहे. तरी सायबर कॅफे मालक, सिमकार्ड विक्रेते, हॉटेल – लॉजेस, भंगार विक्रेते, जुने वाहन खरेदी-विक्रेते यांनी पोलिसांनी मागितलेली माहिती वेळेत पुरवावी.

घरमालक यांनी भाडेकरु यांची माहिती पोलिस स्टेशन देवून सहकार्य करावे असे आवाहन दहशतवाद विरोधी कक्ष, धुळेतर्फे करण्यात येत आहे.

पिंपळनेर येेथे दारू अड्ड्यावर छापा- येथील पोलीसानी चिकसे जिरापूर पांझरा नदी किनारी व पानथळ भिलाटी येथे गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकून 45 हजार 840 रू.चा मुद्देमाल नष्ट करून तीन जणांवर कायदेशीर कारवाई केली.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी स्वतः पोलीसांना सोबत घेऊन केली. शनिवारी दि.10 जून रोजी सकाळी 6. ते 8 वाजेच्या दरम्यान पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील चिकसे-जिरापूर गावचे शिवारात पांझरा नदीपाञालगत गावठी हातभट्टी दारु शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत प्रविण बाबुलाल निकम रा. काकासट भिलाटी व पिन्टू जान्या सोनवणे रा. लोणेश्वर भिलाटी पिंपळनेर हे भट्टी पेटवुन गावठी हात भट्टी ची दारु तयार करताना मिळुन आले आहे.त्यांच्या ताब्यात मिळुन आलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे- 120 लिटर गावठी हात भट्टी ची दारु, 08 पञ्याचे मोठे ड्रम, 04 प्लास्टिक ड्रम, 85 लहान पञ्याचे डब्बे, 12 प्लास्टिक कन. गावठी हातभट्टी ची दारु तयार करण्याचे रसायन व साधनसामग्री असे एकुण 44640/- रु किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला असुन आरोपींना ताब्यात घेतले आहे.तसेच सकाळी 08.30 सुमारास चिकसे रोडवर ईसम नामे जगन शामा शिंदे रा. पानथळ भिलाटी हा गावठी हातभट्टी ची दारुची वाहतुक करताना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले आहे. त्याचे ताब्यात 30 लिटर गावठी हातभट्टी ची दारु 1200/- रु किमतीची मिळुन आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भाबड, उपनिरीक्षक योगेश खटकल, लोकेश पवार, हे.कॉ.ललित पाटील, पो.कॉ.भूषण वाघ,हे.कॉ.ज्ञानसिग पावरा, पो.कॉ.माळी,पोलीस कॉ. वाडेकर,सागर ठाकूर व आनंद चव्हाण आदींनी ही केली.

पिकाची चोरी – शिरपूर तालुक्यातील भाटपूरा शिवारातील एका शेतातून भुईमूग पिकाची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात संशयित पती-पत्नीविरुध्द थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शांताबाई मधुकर पाटकर, रा.भाटपूरा, ता.शिरपूर ह.मु.कोथरुड, पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाटपूरा शिवारातील शेतात मजूरासह घुसून निंबा काशिनाथ पाटील, सुषमा निंबा पाटील, रा.भाटपूरा यांनी शेतात लावलेले भुईमूग पिक चोरुन नेले. या फिर्यादीवरुन भादंवि 379, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

वृध्द बेपत्ता – शिंदखेडा तालुक्यातील दत्ताणे येथील बालाजी उर्फ बाळू सर्जेराव पाटील हे 50 वर्षीय वृध्द फेब्रुवारी महिन्यात घरात कोणास काहीही न सांगता निघून गेले आहेत. त्यांचा सर्व शोध घेऊन देखील ते न मिळून आल्याने नरडाणा पोलिसात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. सदर इसम कोठे मिळून आल्यास नरडाणा पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

 

LEAVE A REPLY

*