सामाजिक न्याय भवन उद्घाटन सोहळ्यास लोकप्रतिनिधींची दांडी! : अनुपस्थितीबाबत मंत्र्यांची खंत

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडी येथे उभारण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला निमंत्रण पत्रिकेत नामोल्लेख असताना अनुपस्थित राहणार्‍या लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांचा पालकमंत्री तसेच सामाजिक न्यायमंत्र्यांनी चांगलाच समाचार घेतला. दरम्यान, अनुपस्थितांची दखल घेणारे दोन्ही मंत्रीही नियोजित वेळेपेक्षा तब्बल सव्वा दोन तास कार्यक्रमास उशिरा आले.

नगर शहरातील सावेडी बसस्थानकाशेजारी बांधण्यात येणार असलेल्या सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रा. राम शिंदे होते. नियोजित कार्यक्रमाची वेळ दुपारी 12 वाजता होती. मात्र, दोन्ही मंत्र्यांनी तब्बल सव्वा दोन तास उशिराने हजेरी लावली.यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे, अशोक गायकवाड, सुनील साळवे, मनेष साठे, सुनील राऊत, बाबासाहेब देव्हारे, सुरेश बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पद्माकर भोसले, जातपडताळणी समितीचे सदस्य संजय दाणे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दयानंद विभुते, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, देविदास कोकाटे आदी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग वाबळे यांनी केले. समाजकल्याण सहआयुक्तासह सात महामंडळे, विविध कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक हॉलचा या भवनमध्ये समावेश असणार असल्याचे वाबळे यांनी सांगितले.
पालकमंत्री राम शिंदे म्हणाले की, सामाजिक न्याय भवनाची इमारत होण्यासाठी आपण खर्‍या अर्थाने पाठपुरावा केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे त्याचा विशेष आनंद आहे. विविध महामंडळांच्या कार्यालयांबरोबरच अभ्यासिका, संगणक कक्ष अशी विशेष सुविधा असणार आहेत.एकूण 13 कोटी 94 लाख रुपये निधीचे काम आहे. इमारतीचे काम दिलेल्या मुदतीत आणि दर्जात्मक व्हावे, अशी अप्रत्यक्ष तंबी ठेकेदाराला दिली आहे. नगर जिल्हा न्यायालयाच्या बांधकाम प्रकरणी अनेक तक्रारी आल्या आहेत. मात्र, चौकशी करणार का असा प्रश्‍न विचारल्यावर मात्र, पालकमंत्र्यांनी पत्रकारांना उत्तर न देणेच पसंत केले.

 
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, गोरगरीब आणि सर्वसामान्य मागासवर्गीय घटकांची कामे एकाच ठिकाणी व्हावीत, हा या इमारत उभारणीमागचा उद्देश आहे. या इमारतीचे काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. सर्वसामान्य माणसाच्या हिताशी निगडीत असलेल्या या सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. या सामाजिक न्याय भवनाच्या बांधकामासाठी 13 कोटी 97 लाख रुपये निधी मंजूर असल्याचे ते म्हणाले. जिल्हा समाजकल्याण अधिकारी उबाळे यांनी आभार मानले.
आठवलेंअभावी गर्दी
नसली तरी दर्दी हजर
कार्यक्रमाचे चांगले नियोजन करूनही उपस्थितांची संख्या कमी. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी निमंत्रण दिले असते तर, मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असती. मात्र, कमी संख्या असली सर्व दर्दी असल्याचे रिपाइंचे सुनील साळवे म्हणले. त्यावर पालकमंत्र्यांनी उद्घाटन सोहळ्याला आठवले यांना बोलाविणार असल्याचे जाहीर केले.
खासदार द्वयींसह
आमदारांची दांडी
एवढा मोठा कार्यक्रम, पत्रिकेत नाव अन कार्यक्रमाला दांडी अशीच परिस्थिती यावेळी पाहायला मिळाली. दोन्ही खासदार, सर्व आमदार, झेडपी अध्यक्षा, उपाध्यक्षा आदी लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषद सीईओ, पुणे समाजकल्याण आयुक्त, प्रादेशिक उपायुक्त, जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्षासह बहुतेक अधिकारी गैरहजर होते. राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात अधिकारी व पदाधिकर्‍यांची मोठ्या प्रमाणातील अनुपस्थितीबाबत प्रभारी जिल्हाधिकार्‍यांना यापुढील कार्यक्रमाची पत्रिका छापताना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आमदार भाऊसाहेब कांबळे
व मुरकुटे आले पण, उशिरा
कार्यक्रमाची नियोजित वेळ 12 ची असताना सव्वा दोन वाजता मंत्र्यांचे आगमन झाले. दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष राम शिंदे यांचे भाषण सुरू असताना नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे अन आभाराच्या क्षणी श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

मंडपात खुर्च्या मोकळ्याच;
कर्मचार्‍यांमुळे थोडी गर्दी
जिल्हास्तरावर एवढ्या मोठ्या वास्तूचे भूमिपूजन असल्याने समाजकल्याण विभागाने कार्यक्रमाची जय्यत तयारी केली. प्रशस्त मंडप, बसण्यासाठी हजारो खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झालेला कार्यक्रम, लग्नतिथी, भरदुपारची उन्हाची वेळ यामुळे बहुतेक जण कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत. उपस्थितामध्ये समाजकल्याण राज्य विभाग, जिल्हा परिषद व जिल्हा जातपडताळणी समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांमुळे कार्यक्रमाला थोडी गर्दी दिसून आली.

पाण्याच्या श्रेयासाठी लढाई
श्रीगोंद्यामध्ये सध्या सुरू असलेली आमदारांची लढाई पाण्यासाठी नसून श्रेयासाठी असल्याचा आरोप पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला. आमदार राहुल जगताप यांना परस्पर गेट तोडने चुकीचे असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

LEAVE A REPLY

*