Type to search

अग्रलेख संपादकीय

सामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 11

Share
‘शासन व प्रशासन यांचा समन्वय आणि संगम झाला तर त्याचे पर्यावसान जनतेच्या समाधानात होईल’ असे यशवंतराव चव्हाण म्हणत. ग्रामीण भागातूनही असा समन्वय राखणारे अधिकारी घडावेत व अधिकारी बनण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणाईलाही योग्य मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षाही ते व्यक्त करीत.

तथापि या परीक्षांचे मार्गदर्शन, पुस्तके व तज्ञांचे मार्गदर्शन आदी सोयी-सुविधा ग्रामीण भागात कशा उपलब्ध होणार? ही अडचण लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी पुढाकार घेतला आहे. चांदवडला त्यांनी मोफत अभ्यासिका सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना नाशिक वा अन्य शहरात न जाता योग्य मार्गदर्शनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

महिनोन् महिने शहरात राहण्याचा खर्च अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना कसा झेपणार? त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना हे स्वप्न अर्धवट सोडून द्यावे लागते. ही कमतरता या अभ्यासिकेमुळे भरून निघेल. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्यदेखील पुरवले जाणार आहे, असेही भंडारे यांनी सांगितले. सार्वजनिक अस्वच्छता ही समस्या उग्र बनत आहे. अस्वच्छता रोगराई पसरण्याचे प्रमुख कारण असते.

त्यासाठी केंद्र सरकारने ‘स्वच्छता अभियान’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला. उस्मानाबाद शहरातील तरुणांनी गावाला या उपक्रमाशी जोडले आहे. ‘एक दिवस गाव स्वच्छतेसाठी’ उपक्रम सुरू केला आहे. दर रविवारी शहर परिसरातील तरुण एकत्र येतात. स्वच्छतेसाठी एक परिसर निवडून तो स्वच्छ करतात. तीन महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे. समाजात अवयवदानाविषयी जागरुकता वाढत आहे. आप्तांचा मृत्यू हा कोणत्याही कुटुंबाला भावनावश करणारा प्रसंग असतो; पण अशा प्रसंगीसुद्धा अपार धैर्य दाखवत मृत आप्तांचे अवयव दान करण्याचा निर्णय त्यांचे कुटुंबिय घेऊ लागले आहेत. गेल्या वर्षात मृत अथवा मेंदू मृत झालेल्या व्यक्तींचे जवळपास पाचशेहून जास्त अवयव दान करण्यात आले.

गोंदिया येथील एका मृत व्यक्तीचे डोळे, त्वचा, मूत्रपिंड, हृदय आणि यकृत हे सारे अवयव दान करण्यात आले. एकाच व्यक्तीचे इतके अवयव दान करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते. लोकसहभागातून सामाजिक समस्यांवर मात करण्यासाठी समाज कार्यरत होत असताना अनेक ‘नामांकित’ माध्यमे मात्र त्यांच्या जबाबदारीपासून भलतीकडे भरकटत आहेत.

कुणाच्या लग्नाचे वर्णन करण्यात पानेच्या पाने खर्च होतात तर कुणी कुणाला आमंत्रण दिले किंवा का दिले नाही या चर्चेसाठी रकाने खर्च करून ‘कुणाची म्हैस आणि कुणाला उठ बैस’ या न्यायाने सवंग चर्चेत दंग आहेत. सामान्य जनतेकडून व्यवस्थित राबवले जाणारे अनेक प्रकल्प मात्र कुणालाच महत्त्वाचे का वाटू नयेत? पण दुर्दैवाने आपापल्या जबाबदारीचे भान हासुद्धा बातमीचा विषय बनावा हाही काल महिमाच!

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!