Type to search

अग्रलेख संपादकीय

सामाजिक जबाबदारीच्या दिशेने-४४

Share

उद्योग क्षेत्रात मंदी आहे. बेरोजगारीने डोके वर काढले आहे. हाताला काम नाही व खायला पुरेसे अन्न नाही, अशी परिस्थिती लाखो भारतीय लोकांवर ओढवली आहे. महागाई वाढली आहे. विजेचे दर, पाणीपट्टी, घरपट्टी आणि अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करांचा बोजा वाढला आहे. विविध समस्यांच्या चक्रव्यूहात समाजाने भोवंडून जावे अशी स्थिती आहे. तथापि आव्हान समजून समस्यांचा सामना करता येतो हे तामिळनाडूतील ओडनथुरई ग्रामपंचायतीने सिद्ध केले आहे.

ओडनथुरई गाव कोईम्बतूरपासून सुमारे पंचेचाळीस कि.मी. अंतरावर आहे. २०००-०१ सालापर्यंत ओडनथुरई ग्रामपंचायतीला दरमहा दोन हजारांपर्यंत वीजबिल येत असे. कालांतराने गावात अनेक सोयी-सुविधा निर्माण झाल्या. परिणामी वीजबिल ५० हजार रुपयांपर्यंत वाढले. ग्रामपंचायतीने गावाच्या सहकार्याने या समस्येवर कायमची मात केली. सरपंचांनी बायोगॅस प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्याचे प्रशिक्षण घेतले. गावात बायोगॅस प्रकल्प उभारले.

सौरऊर्जेवरील दिवे बसवले. पवनचक्की सुरू केली. घरांच्या छतावर सौरपाते बसवले. त्यांच्या सहाय्याने घरांत दिवसा सौरपात्यांमधून तर अंधार पडल्यावर पवनचक्क्यांमधून ऊर्जा मिळते. ओडनथुरई गाव वीजनिर्मितीत स्वयंपूर्ण झाले आहे, अशा बातम्या झळकल्या आहेत. सामूहिक प्रयत्नांतून तयार होणार्‍या विजेतून गावाची गरज तर भागवली जातेच; शिवाय उरलेली वीज तामिळनाडू वीज मंडळाला विकली जाते. गावातील घरांना वीज मोफत आहे.

असा प्रयोग करणारी ती देशातील एकमेव ग्रामपंचायत असावी. मूळ दिल्लीच्या; पण आता अमेरिकेत राहणार्‍या गीता श्रीवास्तव यांनी कर्करोगग्रस्तांना सल्ला देणारे ‘स्टार्टअप’ सुरू केले आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला कर्करोगाला सामोरे जावे लागले. त्यावेळी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कर्करोगग्रस्तांसाठी कोणती उपचारपद्धती आहे? ते उपचार कोणत्या रुग्णालयात होतात? कोणकोणत्या ठिकाणी कोणत्या उपचार सुविधा उपलब्ध आहेत?

अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे काम हे ‘स्टार्टअप’ करते. लोकसहभागातून स्थानिक समस्यांवर उत्तरे शोधण्याचे व समाजोपयोगी मदत केंद्रे सुरू करण्याचे असे अनेक चांगले उपक्रम देशाच्या कानाकोपर्‍यात कुठे ना कुठे सुरू आहेत. अशा प्रयोगांची नोंद क्वचितच घेतली जाते. सरकारही ती जागरुकता दाखवण्यास अपुरे पडते. वीजनिर्मितीत स्वयंपूर्ण होणार्‍या ओडनथुरईचा प्रयोग प्रेरणादायी व इतरांना मार्गदर्शक ठरेल असा आहे.

ढीगभर शासकीय योजना कदाचित जे काम करू शकल्या नाहीत ते काम या ग्रामपंचायतीने व गावकर्‍यांनी यशस्वी करून दाखवले आहे. राज्य शासनाने पुढाकार घेऊन अशा प्रयोगांचा प्रचार-प्रसार केल्यास समस्यांवर नवे मार्ग शोधण्याची प्रेरणा अनेकांना मिळेल आणि समस्यामुक्तीतील लोकांचे सहकार्यही वाढत जाईल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!