Type to search

अग्रलेख संपादकीय

सामाजिक जबाबदारीच्या दिशेने-४२

Share

यावर्षी एकाच जिल्ह्यातील तेराशेपेक्षा जास्त गावांत ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना स्वीकारली गेली आहे. ही नाशिक जिल्ह्याची हकिगत! राज्यात पैठण, चंद्रपूरसह इतर अनेक ठिकाणी गावांत एकच गणेशोत्सव साजरा करायला प्राधान्य दिले आहे. या चळवळीचा व सण साजरे करण्याच्या बदलत जाणार्‍या पद्धतीचा जवळचा संबंध आहे. पूर्वी सार्वजनिक सण एकोप्याने साजरे व्हायचे! सर्व समाजही निकोप मनाने सहभागी व्हायचा.

हेवेदावे व स्पर्धेला स्थान नव्हते. गणेशमूर्ती व देखावा कोणाचा मोठा? कोणी जास्त खर्च केला? कोणाचे कार्यकर्ते जास्त? अशी चढाओढ नव्हती. तथापि बदलत्या काळासोबत सण साजरे करण्याची पद्धत बदलली. सणांचे ‘सोहळे’ (इव्हेन्ट) झाले. सार्वजनिकरितीने साजरा होणारा गणेशोत्सव, दहीहंडी व क्वचित शिमगासुद्धा; अशा उत्सवांत राजकीय हस्तक्षेप वाढला. वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय नेते गणेशोत्सवाचा वापर करून घेऊ लागले. चढाओढ वाढली. उत्सवासाठी होणार्‍या खर्चाचे आकडे फुगत गेले. जबरदस्तीने वर्गणी गोळा केली जाऊ लागली. गणेशमूर्तींच्या मंडपात मागील बाजूला जुगार खेळण्यासारख्या अनिष्ट परंपरा अमलात आल्या. सोबत मदिरेची झिंगही मदतीला आली. वाद आणि हाणामारीच्या घटना वाढल्या.

सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली. सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पडावा व पैशांची उधळपट्टी थांबावी या उद्देशाने नरेंद्र दाभोळकर यांनी ‘एक गाव एक गणपती’ मोहिमेचा पुरस्कार केला. हा उपक्रम गावोगावी पोहोचावा व रुजावा म्हणून नियोजनबद्ध प्रयत्न केले. राज्य सरकारने या उपक्रमाचा महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात समावेश केला आहे. ‘उपक्रम एक, फायदे अनेक’ असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्ताने अनेकांना पुढारी म्हणून मानपान मिळतो. कार्यकर्त्यांची फौज वाढते. गावकीत पुढारी म्हणून मिरवणे व मोठेपणाचा मोह सोडणे अशक्य नसले तरी अंमळ अवघडच असते. त्या मर्यादा ओलांडून ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबवणार्‍या गावांची संख्या वाढत आहे  यंदा तेराशेहून जास्त गावांनी हा उपक्रम राबवला. उसन्या मोठेपणातील पोकळपण या गावांनी लक्षात घेतले असावे. समाजात जबाबदारीची भावना रुजत असल्याचे हे लक्षण आहे. सामाजिक शांतता राखणे ही आपलीही जबाबदारी आहे हे जनतेला उमजत आहे.

खरे तर या उपक्रमाची ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक आवश्यकता आहे. उत्सवानिमित्त गल्लोगल्ली मंडप उभारून वाहतुकीचा फज्जा उडवण्यापेक्षा ‘एक गाव…’ धर्तीवर फार तर ‘एक पेठ एक गणपती’ किंवा ‘एक वार्ड एक गणपती’ असा बदल करून या समस्येची सोडवणूक होऊ शकेल. शहरांतील सामाजिक संस्थांनी या दिशेने जरूर विचार करावा. शासनानेही सहकार्याची भूमिका घेतल्यास हे अशक्य नाही. तसे झाल्यास ग्रामीण जनतेने दाखवलेल्या सामंजस्याची शहरी भागातही उणीव नाही व मराठी मुलुख असा कुठलाही प्रगत विचार त्वरित स्वीकारतो हेही सिद्ध होईल.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!