Type to search

अग्रलेख संपादकीय

सामाजिक जबाबदारीच्या दिशेने-40

Share

काही परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. काही होत आहेत. निकालाची टक्केवारी आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. विद्यार्थ्यांची प्रगती फक्त गुणांच्या टक्केवारीवरच थांबलेली नाही तर वाढत्या गुणांबरोबरच विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवांचा परीघही विस्तारत आहे. तरुणाईला सामाजिक बांधिलकीचे भान येत आहे. समाजात बदल होत आहे.

पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, याची जाणीव लोकांना होत आहे. हे निरीक्षण ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ आणि सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या संचालिका सुनीता नारायण यांनी नमूद केले आहे. समाजातील कालबाह्य रुढी-परंपरा बदलण्याकडे तरुणांचा कल वाढत आहे. विवाह हा दोन कुटुंबांचा खासगी आनंदसोहळा असतो, पण काही काळापासून विवाहसोहळ्यात भपकेबाजी व डामडौल वाढला आहे. मानमरातब आणि प्रतिष्ठेच्या भडक कल्पनांनी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. ती टाळावी, असे मत वारंवार व्यक्त केले जाते. तथापि त्याची सुरुवात करायची कोणी यावर गाडे अडते. समाज रुढी आणि परंपराप्रिय आहे.

विशेषत: विवाहप्रसंगी पाळल्या जाणार्‍या रुढी-परंपरांना फाटा देणे वाटते तितके सहज आणि सोपे नाही, पण ते धाडस विशाल चौधरी आणि भाग्यश्री मते यांनी दाखवले आहे. ते दोघेही मराठा समाजाचे आणि पुणे जिल्ह्यातील! दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. भाग्यश्रीला परदेशात उच्चशिक्षण घेण्याची इच्छा आहे. भपकेबाज विवाह सोहळा टाळल्याने झालेली बचत भाग्यश्रीच्या उच्चशिक्षणासाठी वापरायचे दोघांनी ठरवले आहे. त्यांच्या कुटुंबियांनीही या निर्णयाला मनापासून साथ दिली. दुसरे उदाहरण विधवा पुनर्विवाह! जुन्या काळी तो समाजमान्य मुळीच नव्हता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी विवाह मंडळाची स्थापना केली.

विधवा महिलेशी पुनर्विवाह केला. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 मध्येच संमत झाला आहे. काळ बदलला आहे. तरी त्या मानाने समाजात आजही विधवा विवाह सहज स्वीकारार्ह नाही. मनोज गोसावी हे नाशिकचे उच्चशिक्षित बागाईतदार शेतकरी आहेत. त्यांनी विधवा महिलेशी लग्न केले. त्या महिलेला पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीचाही त्यांनी स्वीकार केला. हे जगावेगळे पाऊल उचलणार्‍या मनोज यांंचा हा पहिलाच विवाह आहे.

विवाहसोहळ्याला आलेल्या पाहुण्यांचे टॉवेल-टोपी देऊन स्वागत करण्याची पद्धत फारच वाढली आहे. दिंडोरीच्या देशमुख कुटुंबियांनी घरातील विवाहप्रसंगी टॉवेल-टोपी पद्धतीला फाटा दिला. खैर, शिवण, बांबू, साग आदी झाडाच्या बियांची पाकिटे देऊन लग्नाला जमलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. तरुणाई सामाजिक विचार गांभिर्याने करू लागली आहे, याचीच ही मार्गदर्शक उदाहरणे आहेत. पुरोगामी विचार प्रत्यक्ष कृतीत आणणार्‍या अशा व्यक्तींचे समाजाने मनापासून स्वागत व अभिनंदन करावयास हवे. म्हणजे अनेकांना अनुकरणासाठी प्रोत्साहन मिळेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!