Type to search

अग्रलेख संपादकीय

सामाजिक जबाबदारीच्या दिशेने-35

Share
मिशन मॅथॅमेटिक्स : मी एकट्याने करून काय होणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. तथापि काही व्यक्ती, व्यक्तीसमूह अशी पळवाट न शोधता समाजाच्या भल्यासाठी झटत असतात. माणुसकीचे, संवेदनशीलतेचे आदर्श उभे करत असतात. बहुसंख्य मुलांना गणिताची भीती वाटते. गणित विषय सोडून द्यायला बहुतांश मुले तयार असतात. मुलांच्या मनातील भीती घालवण्यासाठी अक्षय वाकुडकरने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील घोसरी गावाचा रहिवासी. गावात शिक्षणासाठी काहीतरी कर असे त्यांच्या वडिलांनी त्याला सांगितले होते. वडिलांच्या पश्चात त्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्याने ‘मिशन मॅथॅमॅटिक’ मोहिमेअंतर्गत गावातील घरांच्या भिंतींवर गणिताची सूत्रे लिहायला सुरुवात केली आहे. जाता-येता, खेळता खेळता मुलांनी गणिताची सूत्रे पाठ करावीत हा या कृतीमागचा उद्देश आहे. आतापर्यंत तीस भिंती रंगवून झाल्या असून उर्वरित भिंती रंगवणे सुरू आहे.

पोश्चर : माणसे पाठदुखीने हैराण असतात. अनेकांना दीर्घस्वरुपाचे उपचार घ्यावे लागतात. परिस्थितीअभावी सर्वांनाच ते शक्य होत नसते. भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या दिल्ली शाखेतील विद्यार्थ्यांनी ही उणीव दूर करणारे उपकरण तयार केले आहे. ‘पोश्चर’ नावाचे हे उपकरण मानेवर बसवले जाते. व्यक्तीच्या शरीराची अवस्था बदलताच उपकरणाच्या सहाय्याने लगेचच कंपने सुरू होतात आणि व्यक्तीला आराम वाटायला लागतो. या उपकरणाचे स्वामित्व हक्क मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

झाडे जगवताना : ग्रीन रिव्होल्युशन संस्थेतर्फे नाशिकमधील चुंचाळे शिवारातील टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले होते. तीव्र उन्हाळ्यात ही झाडे जिवंत राहावीत यासाठी संस्थेने झाडांना पाणी घालण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी संस्थेचे कार्यकर्ते शनिवार-रविवार एकत्र जमतात. जमलेला प्रत्येक जण वीस झाडांना पाणी घालतो. टेकडीवर वन्य पशूंसाठी दोन तळीही तयार केली आहेत. त्यातही पाणी भरले जाते.

गप्पा मारा : मोबाईलसारख्या अत्याधुनिक संवाद साधनांमुळे कुटुंबातील सदस्यांचा परस्पर संवाद कमी झाला आहे. परस्पर संवादाचे आणि कौटुंबिक नात्याचे महत्त्व कळावे यासाठी दिल्लीच्या सरकारी शाळांनी मुलांना अनोखा गृहपाठ दिला आहे. मुलांनी कुटुंबातील सर्व सदस्यांशी गप्पा मारायच्या आणि त्यांनी सांगितलेले मजेशीर किस्से शाळेत सांगायचे असे गृहपाठाचे स्वरूप आहे. माणसांमधील दुराव्याच्या भिंती कमी होत असून माणसे परस्पर मदतीसाठी पुढाकार घेत आहेत ही स्वागतार्ह बाब आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!