Type to search

अग्रलेख संपादकीय

सामाजिक जबाबदारीच्या दिशेने-34

Share
राज्यात सर्वत्र-गावागावांत व माणसामाणसांत पाण्यावरून जलसंघर्ष वाढत आहे. गेल्यावर्षी जायकवाडीचे पाणी पेटले होते. नाशिकमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून वाद झाले होते. या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली गेली होती. पाण्यासाठी माणसे ‘स्वार्थी’ होत आहेत. पाणीटंचाई असलेल्या भागात मिळेल तेवढे पाणी आपल्या कुटुंबासाठी भरून ठेवले जात आहे.

हा दृष्टिकोन चुकीचा असला तरी तीव्र दुष्काळाच्या काळात केवळ संबंधितांना त्याबद्दल दोष देता येईल का? तथापि अशा नाजूक बाबतीतही एखादा वेगळा दृष्टिकोन स्वीकारता येतो. चांदवड तालुक्यातील निमोण येथील उगले परिवाराने याचे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. त्या गावात उगले बंधूंची पाच एकर शेती व सामायिक विहीर आहे. उन्हाच्या झळा वाढल्या आहेत तरी विहिरीचे पाणी टिकून आहे. ही विहीर उगले मंडळींनी गावासाठी खुली केली आहे.

पिण्याच्या पाण्याची कमतरता लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या शेतातील या हंगामातील कांद्याची लागवड स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. विजेची मोटर लावून पाण्याचा उपसा केल्यास पाणी वाया जाते. हे लक्षात घेऊन पाणी शेंदून काढण्याचा सल्ला देत पाणी जपून वापरण्याचे आवाहन उगले बंधूंनी गावकर्‍यांना केले आहे. वाढत्या उष्म्यामुळे पशुपक्षीही हैराण आहेत. प्रचंड उष्म्यामुळे त्यांना प्यायला पाणी आणि अन्न मिळेनासे झाले आहे.

पशुपक्षी उष्माघाताला बळी पडत आहेत. मारुती मेंगडे हे मुळशी तालुक्यातील शिळेश्वर गावचे रहिवासी! त्यांनी एक एकर क्षेत्रात ज्वारीचे पीक घेतले आहे. या पिकाची राखण करणे त्यांनी बंद केले आहे. ते पूर्ण पीक पक्ष्यांसाठी सोडले आहे. बांधाच्या आजूबाजूला आणि शेतात काही ठिकाणी खड्डे खणून त्यांनी पशुपक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागातील महिलांचा दिवस पाणी भरता-भरता सुरू होतो आणि मावळतो. दोन हंडे पाण्यासाठी त्यांना मैलोन्मैल पायपीट करावी लागते.

खोल विहिरीत उतरून वाटी-वाटीने पाणी भरावे लागते. पेठ येथे शासनाकडून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय चालवले जाते. तेथे शंभरपेक्षा जास्त मुली शिक्षण घेतात. कडाक्याचे ऊन आणि पाणीटंचाईमुळे मुलींची पाण्यासाठी वणवण सुरू होती. शाळा परिसरात कोठेही पाण्याचा स्त्रोत नव्हता. ही गरज नाशिककरांनी लक्षात घेतली. त्यांनी केलेल्या मदतीतून शाळेच्या आवारात विंधनविहीर खोदण्यात आली. भरपूर पाणी लागले. पाण्यासाठी भर उन्हात करावी लागणारी भटकंती आता थांबणार आहे याबद्दल विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले आहे. वाढत्या उन्हाबरोबर पाणीटंचाईच्या झळा वाढतील. तथापि समाजात माणुसकीचे असे अनेक झरे वाहत असल्याने या झळांची तीव्रता साहजिकच कमी होईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!