सामाजिक जबाबदारीच्या दिशेने-33

0
दुष्काळाच्या झळा वाढत आहेत. त्याचे भीषण सामाजिक परिणाम समोर येत आहेत. दुुष्काळी गावांत मुली देण्यास पालक तयार होत नाहीत. त्यामुळे सततच्या दुष्काळी गावांतील तरुणांचे विवाह जमणे कठीण झाले आहे. विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागातील पाणीटंचाईची भीषणता माणसांना असह्य होत आहे.

खोल गेलेल्या विहिरीत उतरताना पाय निसटला तर जीवही गमावावा लागतो हे माहीत असूनसुद्धा पाण्यासाठी तो धोका पत्करण्याशिवाय महिलांकडे दुसरा पर्याय नाही. पाण्यासाठी मैलौन् मैल पायपीट करावी लागत आहे. एवढे कष्ट उपसूनही महिला एकावेळी फक्त एक किंवा दोन हंडे पाणी आणू शकतात. त्यामुळे घरातील पाण्याची गरज भागेपर्यंत त्यांची पायपीट सुरूच राहते. ही पायपीट सुसह्य व्हावी आणि एकावेळी सुमारे पन्नास लिटर पाणी आणणे शक्य व्हावेे यासाठी कोल्हापूरच्या ‘उडान’ या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेने एका उद्योगाकडून पाणीगाडे तयार करून घेतले. गाड्यातील कॅनमध्ये सुमारे पन्नास लिटर पाणी बसते. पाणी भरल्यावर कॅनला लोखंडी आकडा जोडला की हा कॅन ओढत घरी नेता येतो.

ने-आण करायला सहज सोपे आणि कमी कष्टात जास्त पाणी आणणे शक्य व्हावे अशी या पाणीगाड्याची रचना आहे. आतापर्यंत तीन हजारांपेक्षा जास्त पाणीगाड्यांचे मोफत वाटप केल्याचे ‘उडान’ संस्थेकडून सांगण्यात येते. लोकसभा निवडणुकीतील मतदान केंद्र परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी ‘पोलीस-मित्र’ बनणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयातील दहा विद्यार्थी या योजनेत सहभागी होतील.

या पोलीस-मित्रांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुंबईच्या लोखंडवाला परिसरातील लोकांनी ‘लोखंडवाला तळे वाचवा’ ही मोहीम हाती घेतली आहे. निर्माल्य आणि कचर्‍यामुळे प्रदूषित झालेल्या तळ्यामुळे परिसर बकाल झाला होता. ‘बी हॅपी फाऊंडेशन’च्या मदतीने ‘तळे वाचवा’ मोहीम राबवली जात आहे.

पहिल्या टप्प्यात तळे आणि तळ्याचा परिसर स्वच्छ केला गेला. तळ्यातील गाळ काढला. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे गेली काही वर्षे सातत्याने पाणी योजना राबवली जात आहे. सेवागिरी महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त संकलित होणारा निधी या कामासाठी वापरला जातो. परिसरात आवश्यक ठिकाणी छोटे बंधारे बांधले जातात. येथील नेर तलावात विहीर खोदण्यात आली आहे. त्या विहिरीतील पाणी टँकरने परिसरात पुरवले जाते. सामाजिक बांधिलकीची ही काही सकारात्मक उदाहरणे उज्ज्वल भविष्याचे कवडसे वाटतात.

LEAVE A REPLY

*