सामाजिक जबाबदारीच्या दिशेने-32

0
‘हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ असे समीर सामंत या कवीने म्हटले आहे. कवीची प्रार्थना ऐकणार्‍यांची आणि सामाजिक बांधिलकी जपणार्‍यांची संख्या वाढत आहे. क्षयरोग संसर्गजन्य आहे. या रोगाविषयी समाजात आजही अनेक गैरसमज! क्षयरोग झालेल्या रुग्णाला हात लावायला कुटुंबीयसुद्धा टाळतात. त्याने वापरलेल्या भांड्यांना स्पर्श केल्याने हा रोग पसरतो, हा त्यापैकीच एक गैरसमज! अशा रुग्णांचे विशेषत: स्त्रियांचे प्रचंड हाल होतात.

बुलढाण्यातील तीन मुस्लीम महिलांनी क्षयरोगग्रस्त महिलांची सेवा आणि मरणोपरान्त त्यांचा संपूर्ण अंत्यविधी पार पाडण्याचे काम स्वेच्छेने सुरू केले आहे. परिसरातील अनेक गावांत त्यांना बोलावले जाते. याव्यतिरिक्त त्या बेवारस महिलांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार करतात. बुंदेल जिल्ह्यातील छोट्याशा गावचे रहिवासी अनिश कर्मा व त्यांची पत्नी पायाने अपंग आहेत. पत्नीला चालण्यासाठी ‘कॅलिपर’चा वापर करावा लागतो. त्यामुळेच ते वापरणे किती गैरसोयीचे आहे हे अनिश यांच्या लक्षात आले.

सध्या वापरात असलेले कॅलिपर घातल्यानंतर व्यक्तीचा पाय ताठच राहतो. त्यामुळे त्याला चालताना एका पायावर भार द्यावा लागतो. हे कॅलिपर नव्वद अंशांपर्यंतच दुमडत असल्याने ते वापरणार्‍या व्यक्तीला जमिनीवर बसणे अवघड होते. पायांना आधार देण्यासाठी असलेल्या धातूच्या पट्ट्यांत (ड्रॉप लॉक कॅलिपर) तांत्रिक बदल करून उणीवा दूर करणारा स्वयंचलित कॅलिपर अनिश यांनी तयार केला आहे.

यासाठी त्यांना भारतीय तंत्रज्ञान संस्थेची मदत झाली. या कॅलिपरच्या चाचण्या सुरू असून लवकरच ते गरजूंना उपलब्ध होईल. या संशोधनाचे स्वामित्व हक्क मिळवण्यासाठी अनिश यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे पुरातन राममंदिर आहे. रामनवमीला तेथे यात्रा भरली होती. त्या दिवशी दानपेटीत जमा झालेली रक्कम गरजू मुलीच्या शिक्षणासाठी देणगी म्हणून देण्यात आली.

सिन्नर तालुक्यातील एका शिक्षिकेचा बाळंतपणात मृत्यू झाला. तिची नवजात कन्या मातृप्रेमाला मुकली. शिक्षिकेच्या सहकार्‍यांनी तिच्या कुटुंबाला मानसिक आधार दिलाच, पण निधी संकलन करून नवजात कन्येच्या नावावर बँकेत मुदत ठेवही ठेवली. माणसांनी माणसांशी माणसासारखे वागायला सुरुवात केली, हे दाखवणारी ही उदाहरणे समाजाला प्रेरणास्पद आहेत.

LEAVE A REPLY

*