सामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 19

0
समाजातील वातावरण दूषित झाले आहे. माणुसकी, सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलतेपेक्षा भेदाभेदांच्या भिंती प्रतिदिनी वाढत आहेत. समाजाला विघटनाच्या उंबरठ्यावर आणून ठेवण्याचे प्रयत्न हेतूपुरस्सर सुरू आहेत का? तथापि सामान्य माणसे मात्र नेत्यांच्या हातचे बाहुले बनण्यापासून परावृत्त होत आहेत.

त्यांच्यातील सद्सद्विवेकबुद्धी नेत्यांसारखी निर्ढावलेली नाही. वंचितांना आधार देण्यासाठी मदतीचे हात पुढे सरसावत आहेत. औरंगाबाद शहरातील जमील बेग मशिदीत दररोज मोफत अन्नदान केले जाते. शहरातील आठ रुग्णालयांतील रुग्णांचे नातेवाईक व शिक्षण घेण्यासाठी आलेल्या गरीब विद्यार्थ्यांना या अन्नछत्राचा लाभ होतो. पाच वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. दुसरा मोठा उपक्रम टाटा विश्वस्त संस्थेच्या मदतीने सुरू आहे.

काही कारणाने कर्णदोष घेऊन जन्माला आलेल्या बालकांना बहिरेपण आणि मुकेपण वाट्याला येते. ऐकू येत नसल्यामुळे त्यांचे बोबडे बोलही बंद होतात. अशा बाळांचे आणि त्यांच्या पालकांचे जगणे समस्याग्रस्त असते. चिमुकल्यांना कोणत्याही भावना शब्दांत व्यक्त करता येत नाहीत आणि त्याशिवाय समोरच्या व्यक्तीला त्या कळत नाहीत, अशी त्यांची अवस्था असते. अशा श्रवणदोष असलेल्या शंभरहून अधिक बालकांवर श्रवणदोष निवारणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोष दूर झाल्याने ती बालके आता बोलू लागली आहेत.

मेळघाटाच्या पायविहीर, उपातखेडा, जामडा आणि खतिजापूर या चार गावांत गावातीलच युवकांच्या प्रयत्नातून ओसाड जमिनीवर जंगल उभे राहिले आहे. यात फळझाडे व तेंदूपत्याच्या झाडांचा समावेश आहे. जंगलात वन्यजीवांसाठी पाणवठे बांधले आहेत. यामुळे पर्यावरण साखळी पुनर्प्रस्थापित होऊ लागली आहे. भूजलपातळी वाढली आहे. कोणती झाडे कुठे लावायची याचे नियोजन व रोपे तयार करण्याचे काम युवकच करतात.

हा उपक्रम ‘खोज’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राबवला जातो. या प्रयोगामुळे या ग्रामीण परिसरातील रोजगारासाठीचे स्थलांतर कमी झाले आहे. तळेगाव दाभाडे हे पुणे परिसरातील एक गाव! या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बरीच पायपीट करावी लागत असे. ही अडचण लक्षात घेऊन पुण्याच्या रोटरी क्लबने गरजू विद्यार्थ्यांना दोनशे-अडचशे सायकली भेट दिल्या.

‘…देता देता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावेत..’ असे कवी विंदा करंदीकरांचे शब्द समाजाच्या अनेक स्तरातून प्रत्यक्ष अनुभवाला येत आहेत. तथापि या विधायक उपक्रमांची जाहिरात मात्र क्वचितच आढळते हेही सामान्य जनतेच्या सुसंस्कृतपणाचेच दर्शन!

LEAVE A REPLY

*