सामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 18

0
आंतर्जालचे (इंटरनेट) किंवा सायबर व्यसन ही गंभीर समस्या बनली आहे. तज्ञांच्या मते हा मनोविकृतीजन्य आजार आहे. जो तरुणाईत साथी रोगासारखा वेगाने पसरत आहे. तरुणांचे समाजविरोधी वर्तन, वाढती हिंसकवृत्ती, निराशा, वास्तवाचे भान सुटणे आदी वर्तनदोष हे सगळे सायबर व्यसनाचेच दुष्परिणाम आहेत. यासंदर्भात समुपदेशन व जनजागृतीची आवश्यकता लक्षात घेऊन पुण्यात नवा उपक्रम सुरू झाला आहे.

तेथील आनंदवन बहुउद्देशीय संस्थेने ‘आनंदवन इंटरनेट व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र’ सुरू केले आहे. अशा पद्धतीचे राज्यातील हे पहिलेच केंद्र असावे. केंद्र सुरू झाल्यावर थोड्या दिवसातच केंद्राकडे हजारांपेक्षा जास्त व्यक्तींनी मदत मागितल्याची माहिती केंद्राच्या संचालकांनी दिली आहे. 16 ते 25 वयोगटातील 70 टक्के विद्यार्थी इन्स्टाग्राम, पबजी आणि यू-ट्यूबच्या अधीन आहेत, 90 टक्के लोकांना फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपचे व्यसन जडले आहे.

35 टक्के युवकांना दूरचित्रवाणी आणि मोबाईल एकाच वेळी वापरण्याची सवय लागली आहे, असे या संस्थेच्या कार्यकर्त्यांचे निरीक्षण आहे. दुचाकी चालवताना झालेल्या अपघातात मेंदूला मार लागून मृत्युमुखी पडणार्‍या वाहनचालकांची संख्या वाढत आहे. राज्याच्या अनेक शहरांत हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे.

ही सक्ती पुण्यात मात्र वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. ‘पुणे तेथे काय उणे?’ या न्यायाने शहाण्यासुरत्या पुणेकरांचा हेल्मेट वापराला विरोध आहे. हेल्मेट न घालण्याची अनेक कारणे वाहनचालक सांगतात. तथापि जीवाच्या सुरक्षिततेसाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असे स्मार्ट हेल्मेट एका विद्यार्थ्याने तयार केले आहे. हा विद्यार्थी औरंगाबादमधील एका शाळेत इयत्ता नववीत शिकतो. हे हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी सुरूच होत नाही. चालकाने मद्यप्राशन केले असेल तर तसा निरोप घरच्या दूरध्वनी क्रमांकावर हेल्मेटकडूनच पाठवला जातो.

दुचाकी आपोआप बंद पडते. दुचाकीला अपघात झाल्यास अपघात स्थळ व रुग्णवाहिकेचा दूरध्वनी क्रमांक कुटुंबियांच्या मोबाईलवर पाठवला जातो. नवी दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात हे हेल्मेट तो सादर करणार आहे. त्याचे संशोधन प्रायोगिक स्तरावर आहे हे खरे! पण रस्ते अपघातासारख्या जीवघेण्या विषयात आपण काहीतरी करायला हवे असे त्या विद्यार्थ्याला लहान वयातही वाटले ही कौतुकाची बाब आहे. झाडांनाही भावना असतात हे भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी गेल्या शतकात सिद्ध केले होते.

‘आंघोळीची गोळी’ या संस्थेने झाडे खिळेमुक्त करण्याचे अभियान हाती घेतले आहे. मुंबई परिसरातील झाडांना खिळे ठोकल्यामुळे झाडे मृत झाल्याची बातमी या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या वाचनात आली. झाडे आपल्याला प्राणवायू, पाऊस अशा जीवनावश्यक गोष्टी देतात. त्यामुळे झाडे वाचवणे ही मानवाचीच जबाबदारी आहे. ही भावना रुजवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे संस्थेच्या समन्वयकांनी म्हटले आहे. हा देश माझा आहे. देशातील समस्या माझ्या आहेत. त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे ही भावना पंतप्रधानांइतकीच तीव्रतेने तरुणाईतसुद्धा रुजत आहे ही दिलासादायक गोष्ट आहे.

LEAVE A REPLY

*