Type to search

सामाजिक जबाबदारीची जाणीव-26

अग्रलेख संपादकीय

सामाजिक जबाबदारीची जाणीव-26

Share
‘वंशाला दिवा हवाच’ या अट्टाहासापायी आणि प्रत्येकवेळी मुलगाच होईल या अपेक्षेने एकापेक्षा जास्त अपत्ये जन्माला घातली जातात. ती मानसिकता अजून बदलत नाही. मुलगा हवा असताना मुलगी झाली की ती आई-वडिलांना ‘नकुशी’ होते. सरकारी आकडेवारीनुसार भारतात ‘नकुशी’ मुलींची संख्या दोन कोटींपेक्षा जास्त आहे. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी सरकार आणि अनेक सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत. तरी अपवाद वगळता मुलींच्या जन्माचे स्वागत अद्याप केले जात नाही.

मुलीचे नाव ‘नकुुशी’ ठेवल्यास मुलगा होतो, अशी अंधश्रद्धा जोपासली जाते. यात मुलींचा काहीही दोष नसतो. तरीही त्यांच्यावर मात्र ‘नकुशी’चा शिक्का बसतो. त्यांना अकारण हिणकस वागणुकीला सामोरे जावे लागते. या ‘नकुशा’ समाजाला हव्याहव्याशा वाटाव्यात व त्यांना निदान त्यांच्या आवडीचे नाव मिळावे यासाठी कोल्हापूरच्या आनंदीबाई महिला बहुउद्देशीय संस्थेने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पालकांचे प्रबोधन करून ‘नकुशा’ मुलींना त्यांच्या आवडीचे नाव दिले जाते. त्यांचा नामकरण विधी केला जातो.

त्याची शासनाकडे रितसर नोंदही केली जाते. ही एक कौतुकास्पद घटना! तर दुसरी इंदूरची कथा! इंदूर शहर सलग तिसर्‍यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. हा चमत्कार कसा घडला? प्रशासनाचा सर्जनशील दृष्टिकोन, निर्णयाची कठोर अंमलबजावणी आणि जनतेची मनापासून साथ हे त्यामागचे गमक आहे. इंदूरचा कचरा डेपो दीडशे एकरात पसरला आहे. येथे कचर्‍याच्या टेकड्या तयार झाल्या आहेत. या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे प्रशासनाने मनावर घेतले. कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात आले. त्यात सापडलेले भंगार विकण्यात आले. बाकीचा कचरा यंत्रांच्या सहाय्याने नव्वद एकरापेक्षा जास्त जागेत पसरवण्यात आला. समतल जमिनीवर हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली. आता हा परिसर हिरवागार झाला असून कचर्‍याच्या टेकडीचे उपवनात रूपांतर होत आहे.

लोकप्रतिनिधींचे अनेक अभ्यास दौरे पार पडतात. या दौर्‍यात अशा उपक्रमांचा अभ्यास होतो का? तसा तो होत असेल तर त्याची इतर शहरांत अंमलबजावणी का होत नाही? नाशिकमधील गुरू गोविंदसिंग तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी माती वापरून वीजनिर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. यासाठी सलग पाच वर्षे प्रयत्न सुरू होते. या तंत्राचे पेटंट घेण्याचे प्रयत्न व त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. या प्रयोगाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. पुढची कथा कॅन्सरची! कॅन्सर जीवघेणी व्याधी आहे. आपल्या लहानग्यांना कॅन्सर झाल्याचे निदान होताच त्यांचे आई-वडील मनाने कोलमडतात. शीतल अग्रवाल या संशोधक आहेत. कर्करोगग्रस्त बालकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्यासाठी त्या व त्यांचे सहकारी विदूषक बनतात. रुग्णालयांना भेटी देऊन रुग्ण बालकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवतात.

रुग्णांना आनंदी ठेवण्याच्या या पद्धतीला ‘मेडिकल क्लाऊनिंग’ व ते काम करणार्‍या कार्यकर्त्यांना ‘क्लोन डॉक्टर’ संबोधले जाते. माणसांचा मिळून समाज बनतो. माणूस म्हणून एकमेकांची सुखदु:खे, समस्या जाणणे माणसाचे कर्तव्य असले पाहिजे. त्या कर्तव्याला जागणार्‍या व समाजात माणुसकीची भिंत उभारणार्‍या व्यक्ती आणि संस्थांची संख्या सध्या बर्‍यापैकी वाढत आहे ही स्वागतार्ह बाब आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!