सातासमुद्रापलीकडील विद्यार्थ्यांचा स्वकीयांशी संवाद

0

पढेगाव व केशव गोविंद बन शाळेत यशस्वी प्रयोग

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- आपल्या जिद्दीच्या पंखांना बळ देऊन सातासमुद्रापलीकडे जाऊन स्वप्नांना गरुड भरारी देण्यार्‍या प्रदेशात वास्तव्य करणार्‍या स्वकीयांशी बोलण्याचा अविस्मरणीय आनंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी घेतला.

 

 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमास चिमुकल्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेत पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचा यावर्षीचा नवागतांचा कार्यक्रम अविस्मरणीय झाला. जिल्हाधिकारी अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी पोपट काळे यांच्या नियोजनातून अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी असलेले मात्र परदेशात विविध कार्यानिमित्ताने स्थायीक झालेल्या नागरिकांनी परदेशात तयार केलेल्या महाराष्ट्र मंडळ मधील निवडक व्यक्तींचा संवाद आज नगर जिल्ह्यातील काही शाळांतील विद्यार्थ्यांशी झाला.

 

 

ग्लोबल नगरीच्या माध्यमातून नगरवासियांनी आपल्या संस्कृतीची देवाण-घेवाण करण्याच्या उद्देशाने एकत्रित येऊन गट स्थापन केला, त्यांच्यातील सातत्याच्या चर्चेतून गावाकडील शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या सर्व अनुभवांची देवाण घेवाण प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाळांनी विद्यार्थ्यांना करून दिली. जिल्हा परिषदेच्या पढेगाव व केशव गोविंद बन बेलापूर या दोन शाळांचा तालुक्यातून समावेश होता.

 

 

पढेगाव शाळेत अमेरिकेकडून रोहीत काळे यांनी तब्बल दीड तास विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक व उपस्थित अधिकार्‍यांशी मनमुराद संवाद साधला चर्चेतून विद्यार्थ्यांनी अमेरिकन जीवनशैली, पर्यावरण आणि शिस्त अनुभवली. काळे यांनी शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांच्याप्रती अमेरिकन शासन घेत असलेली काळजी व्यक्त करताना सांगितले, शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्याच्या वाहनाच्या मागून येणारे इतर कोणतेही वाहन विद्यार्थ्यांच्या वाहनास ओलांडून पुढे जात नाही, असे झाल्यास संबंधित वाहनचालकास दंडित केले जाते.

 

 

मूळचे कारेगाव (श्रीरामपूर) येथील रहिवासी असलेले रोहित काळे यांना मातृभूमीबद्दल विचारले असता त्याबद्दल प्रेम व आदरभाव व्यक्त करताना काळे यांचे डोळे पाणावले. सहभागी विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वासाने प्रश्‍न विचारले, तेथील शिक्षण पद्धती समजून घेतली, शाळा बघण्यास पाचारण केले.

 

 

गटशिक्षणाधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही शिक्षक शकील बागवान यांनी उत्कृष्ठ नियोजन केले त्यास केंद्रप्रमुख ज्योती परदेशी, मुख्याध्यापक नंदकुमार परदेशी, सहकारी शिक्षक सरोजिनी भिटे, कांता सूर्यवंशी, वैशाली थोरात, अरुण जाधव, मयुरा खिलारी, योगीता बडाख, पल्लवी पटारे, रेश्मा तोरणे आदींनी सहकार्य केले. याप्रसंगी पर्यवेक्षीय अधिकारी रमजान पठाण, अच्यूतराव बनकर, उपसरपंच राहुल बनकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अविनाश काळे, राजेंद्र गिरमे, प्रशांत बोरावके, रब्बानी शेख, बापूसाहेब तोरणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*