साठच्या आत देवघरात

0

स्मिता तळवलकर निर्मित मध्यंतरी आलेल्या ‘सातच्या आत घरात’या सिनेमाविषयी तुम्ही काही चर्चा वाचली असेलच किंबहुना सिनेमा बघितलासुद्धा असेल सात ही वेळ नसून मर्यादा असल्यामुळे ती सांभाळण्याचा संदेश त्यांनी दिला. ‘सातच्या आत घरात’ परतण्याची कुणालाच घाई नसते. परंतु साठच्या आत देेवघरात (देवाघरी) जाण्याची बहुतेकांना कोण घाई म्हणून सांगू! आजूबाजुला बघा, कुठेही चर्चा ऐका तुम्हाला कळेल ‘अमका मेला, काहीच वय नव्हते हो, नुकतेच 40 पूर्ण केले होते. 40-55 मध्ये जाण्याचे प्रमाण सामान्य झाले.

ह्या घटना आता दूर नाही की, तुमच्या माझ्या स्नेही, नातेवाईकांपर्यंत घडताहेत. त्यामुळे साठच्या आत घरात? असा मला प्रश्न पडला हे काय मृत्यूचे वय आहे? झिरो व्होल्ट (बालमृत्यू) विषयी डॉ. अभय बंग यांनी ‘कोवळी पानगळ’ लिहिली. परंतु काही 25 व्होल्टचे बल्बसुद्धा उडताहेत तर काही दुर्दैवी 40 मध्ये दम तोडताहेत तर काही व्याधींनी जराजर्जर होत 60 वयापर्यंत पोहोचतात. 100 व्होल्टचा बल्ब दुर्मिळ होत चाललाय. याकडे कुणी लक्ष देईल काय? एक पाश्चात्य तत्त्ववेत्ता म्हणतो, रिल लाईफ स्टार्ट अफ्टर एटीन् ओन्ली त्यामुळे 40/50/60 मध्ये हे नैसर्गिक मृत्यू निश्चित नाही. त्यांना ‘अकाली मृत्यू’म्हणायला हवं. तुम्ही म्हणाल, मरण काय कुणाच्या हातात थोडेच असते. ही निराशा म्हणजे केवळ कवित्व. माणसाने केवळ तरुण होण्यात अर्थ नाही, तर ते तारुण्य टिकविण्यासाठीची कलाही आत्मसात केली पाहिजे. थोडक्यात वय थांबवणे म्हणजे वय कुठं नाहीतर आहेच वैकुंठ आयुष्य, आरोग्य टिकवावं, यासाठी आयुर्वेदामध्ये वैशिष्ट्यपूर्ण उपचार आहेत. त्यांची स्वतंत्र शाखा आहे. तिला ‘रसायन चिकित्सा’ म्हणतात.

आवळा –
एक गृहिणी आमच्याकडे आल्या नाव, गाव, वय विचारले, त्या 25 ते 28 च्या असाव्यात असा मनात अंदाज व्यक्त केला. त्यांनी सांगितलेले वय ऐकून मी आश्चर्यचकित झालो. त्या चक्क 38 च्या होत्या. अंगाने सडपातळ, सावळा वर्ण, सतेज कांती, प्रसन्न चेहरा, माझे आश्चर्य मी मनात नोंदवले. त्या आश्चर्याचे कारण त्वरित स्पष्ट झाले. त्यांची दिनचर्या विचारली. त्यांच्याकडे घरात कुणीच चहा वा दूध घेत नाही. सकाळी आवळ्याचा चहा केला जातो. तत्पूर्वी चमचाभर आवळा पावडर त्या खातात. आवळ्याचे लोणचे, मोरावळा, आवळ्याचे विविध कल्प नित्य वापरात हे सगळे गेल्या 3-4 वर्षापासून त्यांच्या अंगणातच आवळ्याचे झाड आहे. घरामध्ये वनौषधीबद्दल कुणालाच जिज्ञासा, आस्था नसल्यामुळे आवळे येऊ लागल्यानंतर पहिले 1-2 वर्षे आवळे केरामध्ये जाऊ लागले. पुढेपुढे आवळ्याचे प्रमाण वाढू लागले आणि नको इतर काही निदान आवरून तर ठेवावेत या हिशेबाने आवळे वाळवून चूर्णाचे डबे भरले गेले. डबे भरलेच आहे, तर संपवायला हवेत म्हणून हळूहळू वापर सुरू झाला. नंतर सर्वांना ती गोडी निर्माण झाली ते सर्वजण काहीतरी वेगळे करताहेत हे त्या घरातील कुणाच्याही गावी नव्हते किंवा त्यांच्या आरोग्याचे, तारुण्याचे गमक हे आवळे आहेत याची सुद्धा त्यांना कल्पना नव्हती. आवळे केवळ वाया जाऊ नयेत आणि आयुर्वेदामधील एक श्रेष्ठ औषध आहे हीच काय ती त्यांची विचारधारा माझा त्यांच्या वयासंदर्भातील अंदाज फसल्याचे आश्चर्य मी त्या बाईंना सांगून त्याचे गमक आवळे असल्याचे स्पष्ट केलं. आवळा एक श्रेष्ठ रसायन आहे. त्याशिवाय ते वयस्थापक म्हणजे वय थांबविणारे औषध आहे. स्थापत्य शास्त्र म्हणजे इमारती बांधणे तसे वय स्थापन म्हणजे वय बांधून ठेवणारे, वय गोठवणारे औषध.

च्यवनप्राश
तुम्ही जे च्यवनप्राश सध्या टीव्हीवर जाहिरातींमध्ये बघताहात त्यातील आवळा हे महत्त्वाचा घटक द्रव्य ‘रसायन’ शाखेच्या प्रचाराचे श्रेय या कंपन्यांना जावं ही खेदाची बाब. तुम्हाला माहिती आहे ‘अवलेह’ अर्थात चाटण्यास योग्य असल्याच्या काही परीक्षा आहेत. त्यातील एक म्हणजे हे चाटण बोटाला, चमचाला चिकटता कामा नये. तुम्ही काय ते ठरवा. त्यामुळे आम्ही दररोज एक ताजा आवळा किंवा चूर्ण घ्या असा सल्ला देतो.
वैद्य सौ. अर्चना तोंडे

LEAVE A REPLY

*