Type to search

धुळे

साक्री, शिरपूर मतदारसंघात सहानुभूतीची लाट

Share

साक्री, शिरपूर या विधानसभा मतदार संघात तुल्यबळ निष्ठावंतांना मतदारांच्या सहानुभूतीमुळे विजयानजीक आणून ठेवले आहे. तर धुळे शहर मतदार संघात अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांना शिवसेनेने छुप्पी तर धुळे ग्रामीण मतदार संघात उघड-उघड काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार सेना कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा आहे. शिंदखेडा मतदार संघात मात्र जयकुमार रावल यांचे वर्चस्व दिसून येत आहेत.

धुळे शहर मतदार संघ
धुळे शहर मतदार संघात अनिल गोटे आणि राजवर्धन कदमबांडे हे अपक्ष उमेदवार आमने-सामने आहेत. या दोघांनी या मतदार संघाचे या अगोदर नेतृत्व केले आहे. त्यामुळे दोघे उमेदवार विकास केल्याचा दावा करीत आहेत. गोटे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने उघड पाठिंबा दिला आहे. तर कदमबांडे यांना छुप्या पध्दतीने भाजपाने अंतर्गत मदत केली आहे. तर या मतदार संघात शिवसेना महाआघाडीचे उमेदवार हिलाल माळी हे भविष्य अजमावित आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत. शिवसेनेचे प्रा. शरद पाटील हे धुळे मतदार संघासाठी इच्छूक होते. त्यांनी निवडणूकीची तयारीही सुरु केली होती. परंतु ऐनवेळी प्रा. पाटील यांचे तिकीट कापून हिलाल माळी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज होवून प्रा.पाटील यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. परंतु प्रा. पाटील हे शिवसेनेतून बाहेर पडणे हा शिवसेनेला मोठा फटका आहे. प्रा.पाटील यांचे शहरात मोठे नेटवर्क होते. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी अडचणीत येवू शकतात, असे वाटल्याने शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपाला धडा शिकविण्याचे ठरविल्याने अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांना सेना छुप्पी मदत करत असल्याची चर्चा शहरात आहे. त्यामुळे धुळे मतदार संघातील लढत रंगतदार ठरत असून मतदार राजा कोणाला कौल देतो. यावर एकाचा विजय होणार आहे.

धुळे ग्रामीणमध्ये सरळ लढत
धुळे ग्रामीण मतदार संघात काँग्रेसचे कुणाल पाटील व भाजपाच्या सौ. ज्ञानज्योती भदाणे-पाटील यांच्यात सरळ लढत रंगत असली तरी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेचे कुणाल पाटील व भाजपाचे मनोहर भदाणे यांच्या सरळ लढत झाली होती. त्यावेळी मोदी लाट असतांना कुणाल पाटील यांनी मनोहर भदाणे यांचा पराभव करुन 46 हजारांचे मताधिक्य मिळविले होते. आमदार झाल्यानंतर मतदार संघात रस्ते, सिंचन, शेतकर्‍यांचे प्रश्न कुणाल पाटील यांनी सोडविले. तरुणाईचे जाळेही त्यांनी उभे केले आहेत. ही कुणाल पाटील यांची जमेची बाजू आहे. तर ज्ञानज्योती भदाणे या धुळे पंचायत समितीच्या सभापती होत्या. त्यामुळे त्यांचाही या मतदार संघाशी जवळकी आहे. मात्र कै.द.वा. पाटील यांच्या निधनानंतर परिवारात झालेला वाद चव्हाट्यावर आल्याने व त्याची सार्वत्रिक चर्चा झाल्याने दत्तू अण्णांचे समर्थक हे कुणाल पाटील यांना मदत करीत असल्याची तसेच धुळे शहर मतदार संघातील उमेदवार हिलाल माळी यांचा ग्रामीण मतदार संघाशी चांगला संपर्क असल्याने तेथे सेनेचे कार्यकर्ते हिलाल माळींचा शब्द अंतिम मानून धुळे भाजपाचे कार्यकर्ते व नेते हे माळी यांना मदत करत नसल्याने या मतदार संघात सेनाही कुणाल पाटील यांच्या मागे आपली ताकद लावल्याची चर्चा आहे.

शिरपूरात बंडखोरीची आव्हान
शिरपूर मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु शिरपूर तालुक्याचे सर्वासर्वे अमरिशभाई पटेल हे त्यांच्या समर्थकांसह भाजपाच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळे शिरपूर विधानसभा मतदार संघाचे राजकीय समीकरणे पुर्ण बदललेले आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले काशिराम पावरा हे भाजपाच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यांना भाजपाने उमेदवारीही दिली आहे. परंतु गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत भाजपाचे उमेदवार डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी आता अपक्ष उमेदवारी करुन पावरा यांच्या समोर आव्हान उभे केले आहे. डॉ.ठाकूर यांना मागील निवडणूकीत 75 हजार मते मिळाली होती. त्यानंतर ते तालुक्यात सक्रीय झालेत. पराभवानंतरही त्यांनी मागे वळून पाहिले नाही. भर पावसाळ्यात त्यांनी संवाद यात्रा काढून जनसंपर्क वाढविला आहे. परंतु ऐनवेळी भाजपाने त्यांचे तिकीट कापून काशिराम पावरा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दुखावलेले डॉ. ठाकूर यांनी बंडखोरी करीत निवडणूक रिंगणात अपक्ष दंड ठोठावले आहेत. तसेच तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची सहानुभूती त्यांना मिळाली असून भाजपाचे कोणतेही पदाधिकारी त्यांना मदत करीत नसल्याने सर्वसामान्य कार्यकर्तेच ही निवडणूक लढविल्याची चर्चा आहे. असा संदेश तालुक्यात गेल्याने डॉ.ठाकुर यांना सहानुभूती मिळत असून ते पावरा यांना चांगलाच शह देतील अशी चर्चा आहे. परंतु काशिराम पावरा यांच्यावर अमरिशभाई पटेल, रंधे परिवार यांचा वरदहस्त आहे. गेल्या निवडणूकीत डॉ. ठाकूर यांच्याबरोबर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते होते. परंतु आता डॉ. ठाकूर हे एकाकी लढत देत आहे. या मतदार संघातही काँग्रेस उमेदवारही रिंगणात आहे. परंतु खरी लढत भाजपाचे काशिराम पावरा आणि बंडखोर उमेदवार डॉ. जितेंद्र ठाकूर यांच्यात रंगण्याची चिन्हे आहेत. परंतु मतदार राजा कोणाला कौल देतो हे 24 ऑक्टोबरला स्पष्ट होईल.

साक्रीतही बंडखोरी
साक्री विधानसभा मतदार संघात 1951 पासून आठ वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. परंतु काँग्रेसच्या मतदार संघात भाजपाचे गो.शी.चौधरी हे तीन वेळा निवडून आले आहेत. एकदा मंत्री झाले आहेत. त्यामुळे या मतदार संघात परिवर्तन होवून भाजपाला अच्छे दिन आले आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडूकीत काँग्रेसचे डी.एस.अहिरे यांना 74 हजार 760 तर भाजपाच्या उमेदवार सौ. मंजुळा गावीत यांना 71 हजार 437 मते मिळाली होती. अहिरे हे तीन हजार 313 मताधिक्यांनी विजयी झाले. त्यामुळे भाजपाने मंजुळा गावीत यांना या मतदार संघात उमेदवारी देतील या अपेक्षेने मतदार संघात जोरदार तयारी सुरु केली. मतदार संघात जनसंपर्क वाढविला परंतु ऐनवेळी सौ. मंजुळा गावीत यांचे तिकीट कापून भाजपाने इंजि. मोहन सुर्यवंशी या नव्या चेहर्‍याला मैदानात उतरविले. त्यामुळे सौ. गावीत यांनी भाजपाला रामराम ठोकून बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यामुळे मंजुळा गावीत यांनाही तालुक्यातून सहानुभूती मिळत असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपाने काही नेत्यांना पक्षातून काढूनही टाकले आहे. त्याचा परिणाम मंजुळा गावीत यांना होतांना दिसून येतो आहे. साक्री मतदार संघ भाजपामधील बंडखोरीमुळे राज्यात चर्चेत आहे. मोहन सुर्यवंशी यांच्या बरोबर भाजपात दाखल झालेले माजी जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते व त्यांचे समर्थक आहेत. तर मंजुळा गावीत यांच्यासोबत माजी खा. बापू चौरे, मा.आ.वसंतराव सुर्यवंशी हे आहेत. तर सौ. गावीत यांना तालुका विकास आघाडीचाही पाठिंबा आहे. काँग्रेसने विद्यमान आ. डी.एस.अहिरे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. साक्री मतदार संघात भाजपाच्या सौ. गावीत यांनी बंडखोरी केल्यामुळे भाजपाच्या मताधिक्यात घट होण्याची शक्यता आहे. साक्री भाजपाचे मोहन सूर्यवंशी, बंडखोर सौ. मंजुळा गावीत, काँग्रेसचे डी.एस.अहिरे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

शिंदखेड्यात बंडखोरी
शिंदखेडा मतदार संघात महायुतीत बंडखोरी करुन शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे यांनी वेगळी चुल मांडून उमेदवारी केली आहे. भाजपाचे उमेदवार जयकुमार रावल यांच्यापुढे त्यांनी आव्हान उभे केले असले तरी या मतदार संघातून रावल यांनी तीन वेळा विजयश्री खेचून आणली आहे. तसेच मंत्री पदामुळे शिंदखेडा तालुक्याच्या विकासासाठी रावल यांनी भरघोस निधी आणून विकास कामे केली आहेत. मतदार संघातील तरुणाई त्यांच्या सोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे मात्तबर नेत्यांनी भाजपात प्रवेश करुन जयकुमार रावल यांना विकासाच्या मुद्यावर जाहीर पाठिंबा दिला आहे. ही रावल यांच्या जमेची बाजू आहे. तर शानाभाऊ सोनवणे यांनी आंदोलने करुन अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. तसेच या मतदार संघात राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत सुमारे 50 हजार मते मिळाली होती. या मतदार संघात जातीचे गणित निकालावर परिणाम करु शकतात. मराठा समाजाचा एकच उमेदवार असल्याने या समाजाची मते नेत्यांसोबत आहेत की, संदीप बेडसेंसोबत हे ठरविणार आहे. त्यामुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक नेत्यांपेक्षा मतदारांवर अवलंबुन असणार आहे. हे 24 ऑक्टोबरला स्पष्ट होईलच.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!