Type to search

धुळे

साक्री तालुक्यातील शेतकर्‍यांना दुष्काळी सवलती द्या!

Share

साक्री । साक्री तालुक्यातील शेतकर्‍यांना पिक विमा योजनेसह पंतप्रधान किसान योजना, दुष्काळी सवलती मिळाव्यात, यासाठी साक्री तालुका शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

साक्री तालुका दुष्काळाने होरपळला आहे. तालुक्यात भीषण पाणीटंचाई असल्याने गुरांना पाणी उपलब्ध होत नाही. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.शेतकर्‍यांना शेतातील विहीरींना पाणी नसल्याने कोणतेही पिकांचे उत्पन्न घेता आले नाही.थोड्याफार पाण्यावर शेतकर्‍यांनी पिक घेण्यासाठी मेहनत केली. मात्र हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे गमवावा लागला. अशा आसमानी संकटात शेतकरी सापडलेला आहे. यापूर्वी शासनाने साक्री तालुक्यातील 10 मंडळापैकी 7 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. परंतु दुष्काळाच्या सवलती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाहीत. शेतकरी बांधवांनी पिक विमा योजनेचे अर्ज सादर केलेले आहेत. अद्याप कोणत्याच गावाच्या शेतकर्‍यांना पीक विमा, दुष्काळी अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही.

केंद्र शासनाने घोषित केलेले पंतप्रधान किसान योजनेचे काही गावातील शेतकर्‍यांना दोन हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहेत. तर काही शेतकर्‍यांना पहिल्या हप्ता दोन हजार रुपये तर काही शेतकर्‍यांना दुसर्‍या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये मिळालेले आहेत. परंतू तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना पहिला हप्ता देखील मिळालेला नाही.

साक्री तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती साक्री तालुक्यातील शेतकर्‍यांची झाली आहे. तरी शेतकर्‍यांचे पीक विमा योजना, दुष्काळी अनुदान आणि पंतप्रधान किसान योजनेचे अनुदान शेतकर्‍यांना तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी साक्री तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख विशाल देसले यांनी तहसील कार्यालयाचे आस्थापना विभागाचे तहसीलदार बागुल यांना निवेदन देऊन केली आहे.

याप्रसंगी शिवसेनेचे भीमराव खैरनार, रमेश बच्छाव, शहाजी तोरवणे, महेंद्र शिंदे, प्रभाकर तोरवणे, जिभाऊ भामरे, दीपक मोरे, संदीप जाधव, विशाल भामरे, संजय भामरे, धनराज भामरे आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!