साईनगरीत मध्यरात्रीपर्यंत हॉटेलचे दरवाजे उघडे…

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – साईंच्या दर्शनासाठी रात्री उशिराने शिर्डीत पोहचले तरी आता भाविकांवर उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. कारण शिर्डीतील हॉटेल्स रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने नव्याने परवानगी दिली आहे. तसे परिपत्रक गृहविभागाचे कक्ष अधिकारी शशांक सावंत यांनी काढले आहे.
राज्यातील हॉटेल आस्थापनांसाठी शासनाने मार्गदर्शक तत्व आणि वेळेची नियमावली काढली आहे. त्यानुसार शिर्डीतील हॉटेल्समध्ये रात्री दहा वाजेपर्यंत खाद्य पदार्थ व मद्य पुरविण्याची परवानगी होती तसेच हॉटेल आस्थापना बंद होण्याची वेळ साडेअकरा वाजेची होती. शिर्डीत परराज्यातील भाविक रात्री उशिराने येतात. हॉटेल्स रात्री दहा वाजताच बंद होत असल्याने त्यांना जेवण मिळत नाही. शिवाय हॉटेल व्यावसायिकांचेही आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शिर्डीतील लोकप्रतिनिधींनी हॉटेल आस्थपनाची वेळ वाढविण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार राज्य शासनाने शिर्डीसाठी स्वतंत्र वेळ दिली आहे.
परराज्यातून शिर्डीत उशिरा येणार्‍या भाविकांसाठी जेवणाची सोय उपलब्ध होण्यासाठी शिर्डीतील हॉटेल्स रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत सुरू असणार्‍या या हॉटेल्समध्ये फक्त खाद्य पदार्थ पुरविण्याची अट परवानगी देताना टाकण्यात आली आहे. हॉटेल्समधील आवराआवर करण्यासाठी हॉटेल्स मध्यरात्रीनंतर साडेबारापर्यंत सुरू राहणार आहेत.

LEAVE A REPLY

*