Type to search

ब्लॉग

सांगलीत काय घडणार?

Share

अनेक वर्षांपासून काही जिल्हे वा मतदारसंघ एखाद्या पक्षाचे गड मानले जात असतात. अशा काही ठिकाणी पिढ्यान् पिढ्या असलेली त्या-त्या पक्षांची मतपेढी शाबूत असते. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलताना सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.

लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार की स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे राहणार याचा फैसला अगदी अखेरच्या क्षणी झाला आणि लढतीत रंग भरला. इथेच सगळे अंदाज आणि परंपरागत राजकीय गणिते अचानक बदलून गेली. भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील अपेक्षेप्रमाणे समोरासमोर उभे ठाकले आहेत. त्याचवेळी भाजपचे एकेकाळचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश शेंडगे हेसुद्धा मैदानात उतरल्यामुळे सांगलीच्या लढतीला बहुरंगी स्वरूप आले आहे. या मतदारसंघात धनगर समाजाच्या मतदारांचे प्रमाण जास्त असून या समाजाचे दोन उमेदवार कुणाचे जास्त नुकसान करतात, यावर मतदारसंघातल्या यशाचे गणित अवलंबून आहे. सांगली लोकसभेची जागा परंपरागतरीत्या काँग्रेसची. इथे 52 वर्षे सातत्याने काँग्रेसचा उमेदवार विजयी होत होता, परंतु काँग्रेसमधली गटबाजी आणि जयंत पाटील विरुद्ध वसंतदादा पाटील गटाचा संघर्ष यात गेल्या वेळी तिथे कमळ उगवले. संजय पाटील यांच्या कामाची पद्धत आणि काँग्रेसमधले टोकाचे मतभेद यामुळे या जागेवर भाजप सहज निवडून येईल, असा अंदाज होता. त्यातच ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्याने काँग्रेसच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यापर्यंत मजल गेली होती. त्याअगोदर पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम आणि वसंतदादांच्या घराण्यानेही लोकसभेची निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेसमध्ये वाद होणार असतील तर ही जागाच नको, अशी भूमिका घेतली. नंतर मात्र त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतदादा पाटील यांच्या नातवाला, विशाल पाटील यांना ‘स्वाभिमानी’ची उमेदवारी दिल्याने सारी समीकरणेच बदलून गेली. सांगली मतदारसंघातलेच नव्हेत तर संपूर्ण जिल्ह्यातलेच परंपरागत राजकीय संदर्भ आता बदलणार आहेत.

2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा संजय पाटील यांनी मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला होता. विशाल हे प्रतीक पाटील यांचे धाकटे बंधू. प्रतीक यांच्या त्या पराभवाचे उट्टे काढायचेच, असे ठरवून विशाल पाटील तयारी करत होते. आता विशाल यांच्या दृष्टीने ही प्रतिष्ठेची लढत आहे. त्याचवेळी संजय यांचा लोकसंपर्क, गेल्या पाच वर्षांमधले काम आणि राजकीय अनुभव यांचीही कसोटी लागणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आक्रमक राजकारण आणि प्रभावी वक्तृत्वशैली यासाठी ओळखले जाणारे विशाल पाटील यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांच्या बैठकांचे नियोजन करून प्रचाराला सुरुवात केली होती. सांगलीचा बंद पडलेला साखर कारखाना पुन्हा जोमाने सुरू करणारे युवा नेते आणि वसंतदादांचे नातू ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. त्याचवेळी मोठा जनसंपर्क, भाजपसह सर्व पक्षांमध्ये जोडलेले कार्यकर्ते आणि संघर्षाच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव या संजय पाटील यांच्या दृष्टीने जमेच्या बाजू आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात शेती, पाणी आणि उद्योग यांचे प्रश्न प्रमुख आहेत. दुष्काळग्रस्त भागासाठीच्या पाणी योजनांसाठी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेले काम आणि सततचा संपर्क असे मुद्दे संजय पाटील मांडतात. वसंतदादा पाटील यांनीच सुरू केलेल्या पाणी योजनांची आजची गती हा मुद्दा विशाल पाटील मांडतात. खासदार पाटील आणि शेंडगे हे अनुभवी आहेत. विशाल पाटील आणि पडळकर हे युवा नेते आहेत. त्यामुळे बेरोजगारी, युवकांचे प्रश्न आणि शेतीमाल प्रक्रिया उद्योग अशा मुद्यांवरही निवडणुकीचा प्रचार एकवटला आहे. विशाल पाटील आता ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सातत्याने संघर्ष करणार्‍या स्वाभिमानी संघटनेचे उमेदवार आहेत. साहजिकच साखर कारखान्यांचा कारभार, त्यांची स्थिती, ऊसदर, एफआरपी, ऊस बिले असे मुद्देही प्रचारात आहेत.

भाजपअंतर्गत सर्व गटांना आणि नेत्यांना प्रचारात बरोबर घेऊन जाण्याचे आव्हान संजय पाटील यांच्यासमोर आहे. त्याचवेळी काँग्रेसअंतर्गत गटबाजी, राष्ट्रवादीचा सवतासुभा, एकदम नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह अशी आव्हाने विशाल पाटील यांच्यासमोर आहेत. एकेकाळी भाजपमध्ये असलेले पडळकर आणि शेंडगे यांची उमेदवारी हासुद्धा या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. त्यात भाजप 3, शिवसेना 1, काँग्रेस 1 आणि राष्ट्रवादी 1 असे आमदार आहेत.
सुहास साळुंके

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!