सहा तालुक्यांत 26 टँकर सुरू; भूजल सर्वेक्षणाच्या अहवालानंतर परवानगी

0
नाशिक । वेळेवर हजेरी लावून नंतर दडी मारणार्‍या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट आहे. टंचाई आराखड्यानुसार 30 जूननंतर टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र 68 गाव-वाड्यांकडून टँकरची मागणी होत असल्याने भूजल सर्वेक्षणाच्या अहवालासह प्रांताधिकार्‍यांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी देत 26 टँकर सुरू करण्यात आले आहेत.

यंदा सरासरी पावसाचा अंदाज व्यक्त केला असतानाही जुलै महिना अर्धा उलटूनही नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 6 तालुक्यांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या 30 ते 40 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. तर जिल्ह्याची सरासरीही 33 टक्केच आहे. शिवाय जून महिन्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडल्याने या तालुक्यांमधील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील धरणांतील साठा 27 टक्क्यांवर गेला असला तरीही अपेक्षेनुसार हा साठा कमीच आहे. साहजिकच त्यामुळे बागलाण, चांदवड, मालेगाव, नांदगाव, सिन्नर आणि येवला या सहा तालुक्यांना आजही पिण्यासाठी टँकरची आवश्यक आहे.

शासनाने दिलेल्या अटी-शर्तीनुसार त्याची पूर्ती करत प्रांताधिकार्‍यांनी ते मंजूर करून घेतले आहे. नांदगाव 2 आणि येवल्यासाठीच्या 4 टँकरला मंजुरी मिळाल्याने लागलीच ते एक-दोन दिवसात प्रत्यक्ष पाणीपुरवाठाही करण्यास सुरुवात करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

बागलाणमध्ये सर्वाधिक 14 गावांना 11 टँकरद्वारे पाणी दिले जात असून त्यानंतर येवल्यात 22 गाव-वाड्यांना चार टँकरने आणि सिन्नर तालुक्यातील 18 गाव-वाड्यांना 3 टँकरने पाणी दिले जात आहे. नांदगावला 8 गाव-वाड्यांना 2 टँकर, मालेगावमधील 5 गाव-वाड्यांना 2, चांदवडमध्ये एका गावासाठी एका टँकरने पाणी दिले जात आहे.

LEAVE A REPLY

*