सहकारातील कायद्याचे ज्ञान आवश्यक : शिंगटे

0

सीए संघटना, सहकार प्रशिक्षण शिबिरास प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)– महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात झालेल्या बदलांची माहिती तळागाळापर्यंत पाहोचवणे आवश्यक आहे. कायद्यातील बदलाची माहिती असल्याशिवाय त्या कायद्याचे पालन करणे शक्य नाही. सहकार कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे. सहकार प्रशिक्षण कार्यशाळेव्दारे सहकारी कायद्यातील बदलाची सर्वसामान्यांपर्यंत पोहचवता येणे शक्य असल्याचे प्रतिपादन सीए प्रमोद शिंगटे यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकैांटंट ऑफ इंडिया, नगर शाखा आणि जिल्हा उपनिबंधक यांच्यावतीने नगरमध्ये दोन दिवसीय सहकार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सीए शिंगटे सहकारी संस्थांना लागू असलेल्या आयकर कायद्यातील तरतुदी या विषयावर मार्गदर्शन करत होते. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांच्या हस्ते झाले.
सीए शिंगटे म्हणाले की, नवीन जीएसटी कायद्याचे ज्ञान असने आवश्यक आहे. यासाठी प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. सहकार क्षेत्रामध्ये आवश्यक असणार्‍या प्रिन्सीपल ऑफ म्युच्यॅालिटी बद्दल माहिती करुन घेतली पाहिजे. सहकार क्षेत्रामध्ये काही काळापूर्वी टॅक्स वाचवला जायचा परंतु आज 1961 च्या आयकर कायद्यान्वये सहकारी संस्थांना आयकर भरावा लागत आहे. सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याची कामगिरी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकैांटंट ऑफ इंडिया, नगर शाखा या संस्थेच्या माध्यमातून होत आहे.
पुर्वी 19 अ मध्ये सहकार हा शब्दच नसल्यामुळे सहकार मंडळींना कायदे माहिती नव्हते. सहकारी क्षेत्रांमध्ये होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभांना देखील आता महत्व आलेले आहे. त्यातूनच सक्रीय आणि निष्क्रीय सभासद अशी वर्गवारी केली जात आहे. निष्क्रीय सभासदांना मतदानाचा अधिकार नाकारला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणाच्या दुपारच्या सत्रात कर्ज वाटप, कर्ज वसूली व गुंतवणुक धोरण याच्या विषयावर सीए रमेश प्रभू यांचे मार्गदर्शन होणार होते. उद्या रविवारी लेखापरिक्षण- सहकारी संस्था, सहकार खाते, हक्क व कर्तव्ये या विषयावर सीए डी.ए. चौघुले तर दुपारच्या सत्रात मल्टीस्टेट- बदलत्या काळातील आव्हाने त्यानंतर बदलत्या काळातील पतसंस्थाच्या समोरील आव्हाने या विषयावर विद्याधर अनास्कर यांचे मार्गदर्शन होणार आहे.

LEAVE A REPLY

*