सव्वातीन कोटींचा करंट

0

महापालिकेच्या तोंडचे पाणी पळाले , वीज उपकेंद्र उभारणासाठी महावितरणची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराला पाणी पुरवठा करणार्‍या फेज 2 योजनेवरील विघ्न काही टळत नाही. मुळानगर येथे वीज उपकेंद्राची उभारणी झाल्यानंतर आता विळद येथे नव्याने वीज उपकेंद्र उभारले जाणार आहे. मात्र त्यासाठी महावितरण कंपनीने महापालिकेकडे सव्वातीन कोटी रुपयांची मागणी केली आहे. महावितरण कंपनीच्या या मागणीमुळे महापालिका प्रशासनाच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. मनपा फंडातून वीज उपकेंद्राला करंट देण्याचे प्रस्तावित असले तरी फंडात पैसे नाहीत. त्यामुळे वाढीव निधीतून हा करंट देण्यात यावा अशी मागणी सत्ताधारी सेनेने आता पुढे केली आहे.

शहराची तहान भागविण्यासाठी केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी योजनेतून सव्वाशे कोटी रुपयांची फेज टू पाणी योजना राबविण्यात येत आहे. तीन सत्ताधारी बदलले तरीदेखील ही योजना अजून पूर्णत्वास गेलेली नाही. काम प्रगतीपथावर, अंतिम टप्प्यात असल्याचे बिगुल प्रत्येक सत्ताधारी वाजवित आले आहेत.
मुळानगर येथे जुने वीजपंप काढून योजनेचे नवीन पंप बसविण्यात आले आहेत. त्यामुळे मुळानगर ते विळद बख्खळ पाणी येते. मात्र तेथून पुढे जुन्याच वीजपंपाने पाणी उपसा सुरू आहे. आज मितीला विळद येथे 200 हॉर्स पॉवरच्या तीन व 300 हॉर्स पॉवरच्या तीन असे सहा पाणी उपसा पंप आहेत. ते बदलले जाणार आहेत. तेथे आता सहाशे हॉर्स पॉवरचे सहा पंप बसविले जाणार आहेत. हे पंप सुरू होण्यासाठी विळदला 3200 केव्ही.चे वीज उपकेंद्र करावे लागेल. आजमितीला तेथे 2400 केव्ही वीज उपकेंद्र आहे. नव्याने वीजपंप बसले तर ते सुरू होण्यासाठी करंट पुरेसा नाही. त्यामुळे तेथे नव्याने वीज उपकेंद्र करावे लागेल. त्यासाठी महावितरण कंपनीने तीन कोटी 22 लाख रुपयांची मागणी महापालिकेकडे केली आहे. हा निधी मनपा फंडातून देण्याचे प्रस्तावित आहे, मात्र मनपा फंडात पैसे नाहीत. त्यामुळे नव्याने बसविण्यात येणार्‍या पाणी उपसा पंपाला करंट द्यायचा कसा यावर प्रशासनात खल सुरू आहे. त्यातच आयुक्त दिलीप गावडे हे रजेवर गेले आहेत. त्यामुळे निर्णय घेणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

 योजना मंजूर होऊन सुमारे सात वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावेळी जे दर होते, ते आता बदलले आहेत. वाढीव दरास केंद्र शासनाने मंजुरीही दिली आहे. दरवाढीचा फरकाचा निधीही शासनाने महापालिकेकडे वर्ग केला असल्याचे समजते. त्यानुसार सुमारे 12 कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यातून महावितरण कंपनीला सव्वातीन कोटी रुपये द्यावेत असे पत्र सत्ताधारी सेनेचे सभागृह नेते अनिल शिंदे यांनी आयुक्तांना दिले आहे. 

 मुळानगर ते नगर अशी पाईपलाईन टाकून पूर्ण झाली आहे. पाणी साठवण टाक्याही उभ्या राहिल्या आहेत. मात्र अंतर्गत पाईपलाईनचे काम अजूनही अपूर्ण आहे. मुळ ठेकेदाराने उपठेकेदार नियुक्त केल्याने हे काम रेंगाळत सुरू आहे. अनेक वर्षापासून नगरकरांना भरपूर व स्वच्छ पाणी देण्याचे आश्‍वासन प्रत्येक महापौर देत आले आहेत. आमच्याच कार्यकाळात पाणी पुरवठा योजनेला गती मिळाली असा दावा युती,आघाडी करत आली आहे. आतातरी शहराला पुरेसा व दररोज पाणी पुरवठा होईल या भाबड्या आशेवर नगरकर आला दिवस काढत आहेत.

LEAVE A REPLY

*