सल्ला उत्तम; पण…!

0
‘सामान्यांना पोलिसांची भीती वाटते. भीतीऐवजी समाजाला पोलिसांचा भरवसा वाटेल अशा पद्धतीने पोलिसांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे’ असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. बदलत्या काळाप्रमाणे पोलिसांची पारंपरिक कार्यपद्धती बदलायला हवी ही मुख्यमंत्र्यांची अपेक्षा रास्तच आहे.

पोलीस दलाला, विशेषत: तरुण अधिकार्‍यांना याची जाणीव झाली आहे. अशा अधिकार्‍यांनी आपापल्या स्तरावर बदलांना सुरुवात केली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त पोलीस आणि जनतेमधील दरी कमी व्हावी व समाजाचे भान वाढावे या उद्देशाने पर्यटक पोलीस, छोटा पोलीस असे नवनवे उपक्रम राबवतात. भंडारा जिल्ह्यातील महिला आयपीएस अधिकार्‍याने ‘मोबाईल पोलीस ठाणे’ हा नवा प्रयोग सुरू केला आहे.

ग्रामीण जनतेला पोलिसांशी संपर्क साधण्यात अडचणी येऊ नयेत या उद्देशाने दर शनिवारी जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये तात्पुरते पोलीस ठाणे सुरू केले जाते. या ठाण्यात जनतेच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जातात. पारधी समाजावर तत्कालीन राज्यकर्त्यांनी गुन्हेगारीचा शिक्का मारलेला होता. काळानुसार त्यात काहीसा बदल झाला असला तरी अजूनही पारधी समाजाकडे संशयानेच पाहिले जाते.

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पारधी समाजाच्या एका युवतीला व जामखेड पोलीस ठाण्यात एका युवकाला काही तास पोलीस अधिकारी म्हणून काम करण्याची संधी स्थानिक पोलिसांनी दिली. हे सर्व उपक्रम पोलीस आणि समाजातील दरी कमी करण्याचा नवा प्रयत्न करणारे आहेत.

पोलीस त्यांना नेमून दिलेले काम करतात. काळानुसार कार्यपद्धतीत योग्य बदल करण्याचा प्रयत्नही केला जातो. तथापि त्यांच्या कामात अलीकडे राजकीय हस्तक्षेप वाढला. राजकीय नेत्यांची आणि पुढार्‍यांची सेवा हीच पोलिसांची मुख्य जाबाबदारी बनली. त्यांच्या कर्तव्याचे गणितच बिघडले.

पोलिसांना फक्त राजकीय नेत्यांचाच हस्तक्षेप सहन करावा लागतो का? तसेही नाही. तथाकथित पुढार्‍यांसोबत त्यांच्या बगलबच्च्यांची, पित्यांची आणि त्यांच्या मर्जीतील भाई, दादा आणि आप्पांचीही मर्जी राखावी लागते. पोलिसांना तसे करावे लागत असेल तर जनतेला पोलिसांचा भरवसा कसा वाटावा? मग तथाकथित भाई-दादांविरुद्ध तक्रार नोंदवण्याचे धाडस जनता कसे दाखवणार? मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रिपदही सांभाळले आहे.

साहजिकच पोलीस दलाचे प्रमुखत्व त्यांच्याच खांद्यावर आहे. त्यामुळे पोलिसांची ही दुखणी त्यांना माहीतच असतील. अशा परिस्थितीत पोलिसांनी सल्ला खरेच उपयोगात आणावा असे वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी तो सल्ला त्यांच्या सर्व देशभक्त सहकारी नेत्यांना आणि बगलबच्च्यांना देणे अधिक प्रभावी ठरेल.

LEAVE A REPLY

*