Type to search

अग्रलेख संपादकीय

सलोख्याचे आश्वासक चित्र

Share

समाजाला शांतता प्रिय असते. शांतता सहन न होणारे मोजके अपवाद कुठल्याही समाजात असतात. एरव्ही बहुतेकांना परस्परांत धार्मिक सलोखा टिकून राहावा, असेच वाटत असते. समाजातील कट्टरतावादी घटकांच्या उन्मादाचा आणि टोकदार धार्मिकतेचा त्यांच्यावर काहीही परिणाम ते होऊ देत नाहीत. अनुकूल-प्रतिकूल परिस्थिती वा घटनांकडे ते इतरांच्या चष्म्यातून बघत नाहीत. कोणताही आव न आणता सहजपणे समाजातील धार्मिक सलोखा आणि बंधुभाव जपण्याचे त्यांचे काम शांतपणे सुरू असते. सध्या रमजानचा महिना सुरू आहे.

अयोध्येतील प्रभू रामचंद्रांचे मंदिर हा संवेदनशील प्रश्न व निवडणूक प्रचारातील प्रमुख मुद्दा होता. तथापि अयोध्येतील सीताराम मंदिरात रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करून तेथील महंतांनी धार्मिक सलोखा जपण्यासाठी पुढाकार घेतला. मंदिरात इफ्तार पार्टी आयोजित करण्याचे हे तिसरे वर्षे आहे.

परिसरातील मुस्लीम बांधव नवरात्रीचा सण साजरा करतात. मुस्लीम बांधव रोजे करतात. रमजानमध्ये रोजे करणे अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे पाच-सहा वर्षांच्या मुलापासून वयोवृद्ध व्यक्तीही रोजे करतात. ठाण्याचे शिंदे 40 वर्षांपासून रोजाचा उपवास करतात. त्यांच्या वडिलांनी मुस्लीम महिलेला बहीण मानले होते. त्यांच्याकडून शिंदे यांनी रोजे व रितीरिवाज समजावून घेतले होते. त्यांच्या या मानलेल्या आत्याचे कुटुंबीय सगळे सण साजरे करतात. गणेशोत्सवात गणपतीची स्थापना करतात. दोन्ही धर्मांत करुणा,

शांती आणि प्रेमाचीच शिकवण आहे, अशी भावना या कुटुंबाने व्यक्त केली. समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कट्टरतावादी व जहाल मतवादी व्यक्ती नेहमीच करीत असतात. सामाजिक सलोखा बिघडावा, यासाठीच त्यांचे प्रयत्न असतात. नेत्यांना जातीपातीचे व धार्मिकतेचे राजकारण सोयीचे वाटते. जातीपाती आणि धार्मिक तेढ हद्दपार झाली तर बहुतेकांची राजकीय दुकानदारी संपुष्टात येईल,

याची भीती नेते आणि पुढार्‍यांना वाटते. तथापि सामान्यांची सद्सद्विवेकबुद्धी, परस्पर सामंजस्य आणि धार्मिक सलोख्याच्या बळावर भारतात अनेक पंथ सुखाने नांदत आहेत. विविधतेतून एकतेचा आदर्श भारतातच जगाला आढळतो. येथे सर्व धर्म, पंथ आणि त्यांच्या धार्मिक नेत्यांचा आदर केला जातो. सर्वधर्मसमभाव व धार्मिक एकात्मता हे भारताचे बलस्थान आहे. सर्वसामान्य नागरिकसुद्धा आपल्या कृतीतून याचे आदर्श समाजासमोर ठेवतात, हे वर नमूद केलेल्या उदाहरणांनी सिद्ध होते. जनतेला कट्टरतावाद आणि त्यातून संभाव्य विभाजन नको असते. सध्याच्या स्थितीत देशातील अशा उदाहरणांचे सार्वत्रिक अनुकरण होण्याची गरज कोण नाकारील?

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!