सर्वांना सोबत घेत विकासाचा प्रयत्न

0

राम शिंदे , शासकीय ध्वजारोहण

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर भर देत आणि पायाभूत सुविधांचे जाळे बळकट करीत शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने बळ देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्याची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगती साधण्यावर भर असल्याचे प्रतिपादन जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी सोमवारी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम शिंदे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. येथील पोलीस संचलन मैदानावर झालेल्या ध्वजारोहण समारंभानंतर स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत 14 गावांना प्रोत्साहनात्मक 10 लाख रुपयांचे अनुदान वाटप, जिल्हा क्रीडा पुरस्कार 2016 चे वितरण, जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कार, विशेष सेवापदक, प्रशस्तीपत्र मिळालेल्या पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचा गौरव, जिल्हास्तर युवा पुरस्कार 2015-16 आणि 2016-17 चे वितरण पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.
शिंदे म्हणाले, टंचाईमुक्त महाराष्ट्र हे राज्य सरकारचे स्वप्न आहे. जिल्ह्यात 2015-16 या वर्षात 279 गावात जलयुक्त शिवार अभियानाची कामे झाली. या कामामुळे त्या गावात 59 हजार 333 टीसीएम इतका अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला आणि सुमारे 1 लाख 18 हजार 667 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. 2016-17 या वर्षात 268 गावात या अभियानाची कामे झाली. यामुळे 18 हजार 598 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आणि 37 हजार 196 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. यावर्षी जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील 241 गावांची निवड करण्यात आली असून गावांचे आराखडे तयार करण्याचेही काम सुरु आहे. या टप्प्यातही अधिक चांगले काम या अभियानात होईल आणि त्यामुळे अधिक क्षेत्र सिंचनाखाली येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे -पाटील, महापौर सुरेखा कदम, उपाध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह विविध पदाधिकारी, प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, डॉ. सौरभ त्रिपाठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, गणेश मरकड, जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त माधव वाघ यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार छायाचित्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली भावे यांनी केले.

खरीपाचे नियोजन करण्याच्या सुचना
येत्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना बी-बियाणे आणि खते यांची कमतरता जाणवू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. उन्नत शेती समृद्ध शेती या योजनेअंतर्गत पडीक जमीन लागवडीखाली आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सौर उर्जेचा अधिकाधिक वापर करुन वीजनिर्मितीला चालना देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

साथीच्या रोगापासून बचाव करा
सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट्य ठेवून जिल्ह्याच्या काना-कोपर्‍यामध्ये जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी विविध उपाययोजना कऱण्यात येत आहेत. जनतेनेही गॅस्ट्रो, हिवताप यासारख्या साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रा. शिंदे यांनी उपस्थितांना केले. समाजातील मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी बेटी बचाव- बेटी पढाओफ उपक्रम सुरु आहे. जिल्ह्यात यासाठी करण्यात येत असलेल्या जनजागृतीमुळे आगामी काळात मुला-मुलींचा जन्मदर आपल्या जिल्ह्यात समान असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*