Type to search

आवर्जून वाचाच विशेष लेख

सर्वांचे करील आकर्षण… माझे घर, गाव, देश नंदनवन!

Share

‘घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
गाव असावेत बागेसारखे
स्वच्छंदी अन् इंद्रबन
जसे मागे गाव लाडली
वाटते मज नंदनवन…’

घराचे आणि गावाचे नंदनवन कसे करावे यावर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत सांगितले आहे. नंदनवन म्हणजे इंद्राची बाग. बाग तिथे कशाची उणीव? सारंच काही असणार. तिथे असणार आनंदाचे कारंजे, संतुष्टीचा सुगंध, सर्व सुखांचे हिरवेगार गालिचे, प्रेमाचे मोहक विविध रंग, दिवसा सुर्याची सोनेरी किरणे आणि रात्रीला आल्हाददायक चांदणे…

हे सुखमय स्वप्न साकारण्याकरिता गावातील प्रत्येकाने जिव्हाळ्याने श्रम आणि प्रयत्न करावे लागतील. तरच घरचे, गावाचे अन् देशाचे नंदनवन फुलविणे शक्य आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपली स्वत:ची जबाबदारी काय आहे ते समजून घेणे फारच आवश्यक आहे. माझ्या युवक मित्रांनो प्रत्येकाने आपल्या शरिरातील व मनातील आळस प्रथम फेकून दिला पाहिजे. कारण आळस हा असा शत्रू आहे जो आपले घर, गाव प्रगती पथावर नेण्यास मज्जाव करीत असतो. एका कवीने छान म्हटले आहे की,
‘आळस नको रे करू,
आयुष्याला नको रे मारू,
क्षणोक्षणी नकोरे हारू,
यशाची मुळे ध्येय धरू,
आपण सर्वांना एकत्रित तारू,
घर, गाव प्रगती पथावर उभारू’

तसे पाहायला गेले तर खरे कलाउद्योग खेड्यागावांमध्येच होते, पण हे कलाउद्योगी शहरांमध्ये गेले त्यामुळे गावाची दैनावस्था झाली आहे. असे संत महाराज म्हणतात. पण ही वास्तविकता आहे. शहरांमध्ये कारखाने उभारण्या गेलेत. खेड्यांतील कलावान उदरनिर्वाहास्तव शहरात गेेले. त्यामुळे ग्रामीण कला नामशेष झाली. खेड्यातील बुध्दी, समृध्दी, हस्तकला, कष्टाळूपणा हे सर्व शहरात गेले मग गावात, खेड्यात काय उरले? फक्त शेती… बिचारे म्हातारे माणसे शेतीकडे लक्ष देतात. ते कशी तरी हिम्मत करून शेती करतात… पण शिकलेले तरूण नोकरी करीता शहरात रस्तोरस्ती भटकतात. त्यामुळे मग गावातील खेड्यातील शेती आणि उद्योगधंदे यांची भरभराट कशी होणार?

आपले स्वत:चे घर, गावातील खेड्यातील जीवन सुखसमृध्द होण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी, युवकांनी स्वावलंबी होणे अत्यंत निकडीचे आहे. लोकांनी, युवकांनी उत्तम प्रकारे शेती करावी. शेतीची निगडीत असलेले लहान-लहान उद्योग करावेत. कच्चा माल खेड्यात विकतो आणि तोच शहरात जाऊन पक्का होतो. आणि तो चौपट भावात विकला जातो. त्यामुळे गावातील, खेड्यातील लोकांच्या हाती फारच कमी पैसा आणि शहरातील लोक होतात मालामाल…

या समस्येकडे खेड्यातील शिकलेल्यांनी लक्ष दिले तर कोणीच बेकार राहणार नाहीत. आपण पिकविलेला कच्चा माल शहरात जावून मातीमोल भावाने न विकता गावातच उद्योग निर्माण करावेत. एकमेकांचे सहकार्य घ्यावे. त्याकरीता त्या त्या उद्योगाची कला हस्तगत करावी. श्रम करावे आणि कुटुंबाचे पालन पोषण आनंदाने करावे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की, कला ही मानवाचे भूषण आहे. उत्तम जीवन जगण्यासाठी सुखसमाधानाने जगण्यासाठी ‘कला’ आहे ही जाणीव असायला हवी.

‘कला असे मानवासि भूषण ।
परि पाहिजे जीवनाचे त्यात स्मरण ।
जगावे सुखसमाधान ।
धरोनिया अंती ॥

माणसात कोणती तरी कला अवगत असल्यास तो उपाशी राहू शकत नाही. कलेवरूनच माणसाची ओळख होत असते. आपल्यात कोणती कला आहे याचा शोध घेऊन त्यामध्ये प्रावीण्य प्राप्त करावे आणि तिला आपल्या जीवनाशी जोडावे. आपल्या कलेचा सदुपयोग स्वत:साठी व इतरांच्या भल्याकरिता करावा. त्यामुळे आपल्या घराचे, गावाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.

माझ्या तरूण युवक मित्रांनो लक्षात ठेवा मातीच्या घरालाही सुंदर करता येते. आपल्याच गावात तयार झालेली मडकी, सुया हस्तकलेतील वस्तू, कुंड्या यांचा उपयोग कलात्मकतेने करता येतो. घराभोवती बाग तयार करावी. ती सांडपाण्यावर वाढवावी. घरच्या घरी फळे, फुले, भाज्या पिकवता येतात. घरात आणि परिसरात स्वच्छता आणि टापटीप असावी. जिथली वस्तू तिथेच ठेवावी. आपल्या घरी जे असेल ते गावातच तयार झालेले किंवा स्वदेशी असावे. याप्रमाणे श्रम आणि कला यांच्या संयोगाने घरी सुबकता आणि सौंदर्य आणावे. जसे की, सुतारांनी बुध्दी आणि कौशल्य वापरून सजावटींच्या कलात्मक वस्तू तयार कराव्यात. गावातच हातोडे, खिळे, कुर्‍हाडी, कोयते, पावडे, कुदळ्या, वखर, नांगर, डवरे, सरते, फंडे, झाडण्या, चटया, पलंग, खाट, दोर, स्वेटर, अशा अनेक वस्तू ज्या शेतीसाठी उद्योग व्यवसायांसाठी संसारासाठी लागतात. त्या सर्व गावातील कलाकारांनी निर्माण कराव्यात. शेतकरी बांधवही आपल्या शेतात एका ओळीत झाडे लावून, शिस्तबध्द वाफे, धुरे, बंधारे तयार करून कला दाखवू शकतात. घरेही सुंदर झाडांनी सजविता येतात. अशी स्वत:च्या श्रमाची कला असावी. त्यामुळे स्वावलंबीपणा आणि उद्योगशिलता वाढेल. कलेने घराची आणि गावाची शोभा वाढेल. प्रत्येक गावाने जर अशा प्रकारे कला जोपासल्या माझ्या युवक मित्रांनो तर गावाचे भूषण वाढेल आणि पर्यायाने आपल्या देशाचेही वैशिष्ट्यपूर्ण भूषण वाढेल. इतर देशांच्या मानाने आपण प्रगती पथावर व सर्वात सुखी, समाधानी आपलाच भारत देश असेल. त्यामुळे युवकांनी आपली कला जोपासलीच पाहिजे.

युवक मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कलेने आपण घर सुंदर केले आणि जिवन सुंदर केले. पण गाव जर बिघडेल तर ते सौंदर्य बरे कसे टिकणार? म्हणून सर्वांनी मिळून आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण कलांनी गावही सुंदर आणि सुरेख करायला हवे. त्याकरीता युवकांनी सर्वांना एकत्रित करावे. नवीन योजना तयार करावी. जसे की श्रमदान सप्ताह घ्यावा. रस्ते दुरुस्तीसाठी, शोष खड्डे तयार करण्यासाठी गावातील सांडपाण्याची विल्हेवाट… गावातील काटे-झुडपे काढून टाकावीत. नव्या प्रकारे शौचगृहे निर्माण करावीत. नदी, तळे आणि काठावरची जमीन स्वच्छ करून त्यातील पाण्याचा उपयोग उत्पादनाकरीता करावा… गोठे दुरूस्त करावे. मुत्रीघरे बांधावीत. नाल्या खोदाव्या, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावावीत. नाल्या खोदाव्या, रस्त्यांच्या दोन्ही बाजुंनी झाडे लावावीत. मध्ये मध्ये कचरा कुंड्या ठेवाव्यात. सर्वत्र स्वच्छता असल्यास गावात मोकळी हवा येईल. ठिकठिकाणी सूचना फलक असावेत. रस्त्यांना थोर पुरूषांची नावे द्यावीत.

सर्वत्र प्रकाशाची व्यवस्था करावी. गावात मुला-मुलींवर आदर्श संस्कार करणारे निर्माण करावेत. सार्वजनिक भिंतीवर उद्बोधक वचने लिहावीत. स्वच्छ पाण्याच्या विहिरी असाव्यात. गावात छोटेसे विश्रामगृह असावे ते पाहुणे, प्रवासी यांच्यासाठी खुले असावे. गावात एक सुंदर ‘व्यायामशाळा’ असावी. व्यायामाने सुदृढ स्त्री-पुरूष तयार होतील. युवकांचे आरोग्य उत्तमरित्या वाढेल. तसेच गावात छोटेसे वाचनालय असावे त्यामुळे शाळेतील कॉलेजातील मुला-मुलींचे ज्ञान आणि सुबुध्दी विकसीत होईल. वाचनालयात देशाचे आणि जगाचे ज्ञान होण्याकरीता वर्तमानपत्रे असावीत. तसेच चौकाचौकात फळा असावा. त्यावर मुख्य बातम्या आणि सुविचार लिहावेत. निरक्षरांना ज्ञान देण्यासाठी ‘प्रौढ साक्षरता वर्ग’ भरवावा.

या सर्व कार्यामध्ये युवकांनी प्रथम जबाबदारी घ्यावी, कारण देशाचा विकास हा युवकांच्या हाती असतो. युवकांनी गावात व्याख्याने, किर्तने, कला पथकांचे कार्यक्रम, वादविवाद, राष्ट्रीय पोवाडे, बोधपर नाटके, असे मनोरंजनात्मक व संस्कारमय कार्यक्रम करावेत. तसेच आपल्या गावात प्रथमोपचाराचे मार्गदर्शन, गुरांसाठी प्राथमिक औषधी तसेच वनस्पती औषधांची माहिती जाणून घ्यावी.

गावातील युवकांनी घरादारात या गोष्टींचा प्रसार करायला हवा. त्यामुळे गावातील सर्व स्त्री-पुरूष, युवक स्वावलंबी होऊन परस्परांना सहकार्य करतील. प्रत्येकाचा वेळ, श्रमशक्ती, बुध्दीमत्ता याचा योग्य वापर होईल.

या सर्व गोष्टी अवलंबिल्या तर आपले घर, गाव नंदनवनासारखे सुंदर आकर्षक होईल. युवकांनो मनाशी बांध गाठ अन् म्हणा की
‘माझे घर, माझे गाव
सुंदर होईल देश भारत
मी होईल स्वावलंबी
घराला, गावाला बनवू आदर्श
धरती, भारत मातेला
बनवूया उज्वलतेचा स्पर्श
आज मी एक वचन घेतो की,
मी माझे घर, माझे गाव माझा देश यांच्या
प्रगतीसाठी सदैव प्रयत्न करेन
जय हिंद – जय भारत
किरण विठ्ठल पाटील

मो. 9270860296

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!