सरस्वतीच्या प्रांगणात…

0
सगळे काही सुरळीत सुरू आहे असे म्हणता म्हणता कुठे तरी माशी शिंकावी तशी यंदाच्या साहित्य संमेलनाची गत झाली. पण या पार्श्वभूमीवरही साहित्यिकांचा मेळा भरणे, रसिकांना साहित्यिकांचे विचार ऐकायला मिळणे, ग्रंथ खरेदीची संधी या सकारात्मक बाबी आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज यवतमाळ येथे सुुरू होत आहे. संमेलन आणि वाद हे समीकरण यंदाही कायम राहणे आणि 92 व्या संमेलनाची सुरुवात याच वादाच्या पार्श्वभूमीवर होणे ही निश्चितच समाधानकारक बाब नाही. खरे पाहता यंदाच्या अध्यक्षांची निवड निवडणूक प्रक्रिया टाळून झाली होती. डॉ. अरुणा ढेरे यांच्यासारख्या रसिकमान्य आणि रसिकप्रिय लेखिकेला एकमताने हा बहुमान मिळाल्या मुळे संबंधित वर्तुळामध्ये सकारात्मक पडसाद अनुभवायला मिळाले. मात्र ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आमंत्रण देणे आणि नंतर दबावाला घाबरून ते मागे घेणे ही खचितच निंदनीय बाब आहे. याचा निषेध करत काही साहित्यिकांनी साहित्य संमेलनाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी राजीनामा दिला. पण समाधानाची बाब इतकीच की सगळी उलथापालथ घडूनही साहित्याचा हा उत्सव पार पडतो आहे.

साहित्य संमेलनाबाबत बोलायचे तर इथेही फक्त ‘साहित्य’ हा विषय केंद्रस्थानी नसतोच. हे व्यासपीठ साहित्य संमेलनाचे असले तरी या सगळ्यांच्या गर्दीत प्रत्यक्ष अध्यक्षाला बोलायला किती वेळ मिळतो? त्याचे विचार किती प्रमाणात ऐकून घेतले जातात? हीदेखील उघड गुपित असणारी बाब आहे. आताच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे व्यासंगी आणि अभ्यासू आहेत. ही स्वत:ची ठाम मते घेऊन पुढे जाणारी लेखिका आहे. मात्र या व्यासपीठावर त्यांना तरी किती वेळ मिळतो हे पाहावे लागेल.

या धर्तीवर साहित्य संमेलनाकडे सारासार विचाराने पाहायचे झाल्यास हा एक उत्सव आहे, असे आपण म्हणू शकतो. आनंदनिर्मिती हे कोणत्याही उत्सवाचे प्रयोजन असते. त्यामुळे संमेलन हा साहित्याच्या नावाने भरणारा एक मेळावा आहे आणि आनंदनिर्मिती हा त्यातला मूळ उद्देश आहे हे आपण गृहीत धरू शकतो. कारण उत्सवात कोणाला महत्त्व देण्याचा प्रश्न नसतो. सगळेच एकत्र येऊन आनंद लुटत असतात. संमेलनांकडे याच दृष्टीने पाहावे, असे मला वाटते. पूर्वी याकडे बघण्याची दृष्टी वेगळी होती. बाहेरगावच्या लोकांना साहित्यिक प्रत्यक्ष बघायला मिळतात, त्यांचे विचार ऐकायला मिळतात, साहित्याचा आस्वाद घेता येतो, अशी धारणा एकेकाळी बघायला मिळत होती.

आजही आडगावातले, शहरांमधले, साहित्य विश्वाशी संबंधित नसणारे काही लोक याच दृष्टीने तीन दिवसाच्या या साहित्य सोहळ्याकडे पाहतात. पण ही धारणा ठेवून कोणी संमेलनाला येत असेल तर ते चुकीचे आहे. कारण साहित्यिक बघायला मिळाल्याने काहीच साध्य होत नाही. इथे त्यांच्याशी फारसा संपर्कही येत नाही. परिसंवादामधून त्यांचे सगळे विचारही समजत नाहीत. त्यामुळे साहित्याच्या जवळ येण्याचा हा एक मार्ग असला तरी तो एकमेव नाही. साहित्यिकांशी वेगवेगळ्या मार्गाने संपर्कात राहणे, त्यांच्यात मिसळणे, त्यांच्यात उठबस वाढवणे या मार्गानेच साहित्याचा थोडाफार संस्कार होतो. त्यामुळे रसिकांनी उत्सवाचा आनंद लुटण्याबरोबरच हे संस्कार मिळवण्यासाठी संमेलनांचा आधार घ्यावा, असे मला वाटते.

आता नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून आमंत्रण देणे आणि नंतर मागे घेण्याच्या मुद्याकडे वळू. 91 वर्षांच्या या सिद्धहस्त लेखिका मोठ्या साहित्यिक आहेत. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. पण यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे असहिष्णुतेच्या मुद्यावरून पुरस्कार परत करण्याचे धैर्य त्यांनी दाखवले होते. किंबहुना, त्यांच्यापासून पुरस्कारवापसीची सुरुवात झाली. त्यांना साहित्य संमेलनचे उद्घाटक म्हणून बोलावण्यात काहीही गैर नव्हते. पण नंतर अनेक मुद्दे उपस्थित झाले. त्यामुळे नाव निश्चित करण्यापूर्वी यावर विचार का केला नाही, असा प्रश्न रसिक आणि साहित्यिक विचारू शकतात. वरकरणी दाखवला जाणारा मराठी-अमराठी हाच मुद्दा ग्राह्य धरला तरी हे वादाचे कारणच असू शकत नाही, असे मला वाटते. असा भेद असूच शकत नाही कारण देशातलेच नव्हे तर विश्वातले साहित्यिक समस्त मानवजातीसाठी लिहीत असतात.

म्हणूनच त्यांचे साहित्य विविध भाषांमध्ये अनुवादित होते आणि त्याला उदंड प्रतिसादही मिळतो. त्यामुळे हा वाद निरर्थक होता, असे मी म्हणेन. आयोजकांना हे नाव नको होते हेच खरे सत्य आहे. अर्थात हस्ते-परहस्ते कानावर आलेल्या बातमीवरून कोणताही तर्क लढवणे योग्य वाटत नाही. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे रसिकांच्या मनातली महामंडळाची प्रतिमा आणखी खालावली तर आश्चर्य वाटायला नको.

शेवटी अशी मंडळे अथवा संस्था दहा-बारा जणांच्या कडबोळ्यावर चालत असतात. त्यामुळेच तिथे राजकारण, धोरणांमधील अस्पष्टता, हेवे-देवे, आमचा-तुमचा हा भाव, प्रभुत्व गाजवण्याची, आपलाच हेका सुरू ठेवण्याची वृत्ती हे सगळे आले. या सगळ्यात कल्पनाशील आणि प्रयोगशील साहित्यिकांना कुठेच वाव नसतो. कारण काहींच्या आग्रहामुळे पुढे आलेले संस्थेचे धोरण आपल्याला मान्य होईलच असे नाही. त्यामुळे काहींचे या वाटेला न जाण्याचे मत असते. त्यांच्या मतांचा आदर करायला हवा आणि या प्रक्रियेचा एक भाग बनून कार्यरत राहणार्‍यांचेही स्वागत करायला हवे. शेवटी यातूनही काही चांगले घडेल, असा आशावादच असे प्रयत्न जिवंत ठेवू शकतो.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे हा साहित्याचा तीन दिवसांचा उत्सव असतो. रसिक एका अपेक्षेने याकडे पाहत असतात. त्यांना यातून आनंद मिळायला हवा. तो मिळवून देण्यासाठी कंटाळवाणी भाषणे, निरस परिसंवाद, नियोजनशून्य आयोजन या त्रुटी टाळणे गरजेचे आहे. इथे प्रस्थापितांबरोबरच नवोदितांनाही व्यासपीठ मिळते. विचार जनांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. मात्र त्यावर समाधान न मानता अन्य मार्गांनी रसिक मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण इथल्या सादरकर्त्यांमधल्या काहींनाच ब्रेक मिळतो. या मांदियाळीतले एक-दोघेच त्या अर्थाने क्लिक होतात. त्यामुळेच रसिकांपर्यंत पोहोचण्याची ही केवळ एक पायरी आहे ही भावना नवोदितांनी मनात ठेवायला हवी.

विचारप्रक्रिया सुरू ठेवणे, विविधांगी वाचन, निरीक्षण आणि त्यातून उत्तम पद्धतीने व्यक्त होणे या पातळ्या पार करूनच साहित्यिकांना रसिकांच्या मनात अढळस्थान मिळवता येते. सर्जनशीलता हा साहित्यिकाचा स्वभाव असायला हवा. बाकी सभा, संमेलनांना जायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. केवळ उपस्थित राहिल्याने आणि मते व्यक्त केल्यानेच आपली भूमिका सगळ्यांना समजते असे समजण्याचे कारण नाही आणि इथे काहीच मिळत नाही असे मानून त्यांच्याकडे पाठ फिरवण्याचेही काही कारण नाही. एकदा संमेलन हा एक उत्सव आहे हे मान्य केले की तो अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पार पडावा ही इच्छा प्रत्येकानेच मनात धरायला हवी. त्याचे स्वरूप विधायक आणि वादविवादांपलीकडे राहावे एवढीच प्रामाणिक इच्छा.
– रत्नाकर मतकरी, ज्येष्ठ साहित्यिक

LEAVE A REPLY

*